कोकणातला रातांबा, आंबा, काजूगर आणि मासे हे प्रमुख उत्पन्न

 

गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले...

बा.भ. बोरकरांनी या कवितेत म्हटल्याप्रमाणे जून महिना सुरू झाला की, अचानक एक दिवस आकाशात गडद निळ्या ढगांची दाटी होते, सोसाट्याचा वारा सुटतो. मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होतो आणि आपला लाडका पाऊस चार महिन्यांच्या मुक्कामासाठी आपल्याकडे येतो. तो येतो नेहमीसारखा आणि वातावरण भारून टाकतो. शहरात पावसाचं गणित ऑफिसच्या, शाळेच्या आणि लोकल ट्रेन-बसच्या वेळेशी जुळलेलं असलं तरी गावी मात्र ते शेतीच्या गणिताशी जुळलेलं असतं. साधारण मे महिन्यापासून, वळवाच्या पावसापासूनच कृषीवल अर्थात शेतकरी मित्र आपल्या तयारीला लागलेले असतात.

जिथे जसा पाऊस तिथे तसं पीक येतं, त्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी केली जाते. कोकणात जवळपास सगळी शेती पावसावर अवलूंबून असतो. बघताबघता पाऊस असा सुरू होतो की अक्षरशः घराबाहेरही पडायचीही पंचाईत होते. त्यामुळे या पूर्वीच शेतकरी राजा शेतीच्या तयारीला लागलेला असतो. बी-बियाणं गोळा करणं, नांगरणी करणं, फवारणीची रसायनं उपलब्ध करणं, गरज असेल तर शेत भाजणं अशी तयारी केली जाते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेताच्या काही भागात आग लावून शेत भाजलं जातं.

कोकणातलं मुख्य पीक म्हणजे भात अर्थात तांदूळ. शेताची नांगरणी करून पहिल्या पावसाच्या आधी मागच्या वर्षीचं राखून ठेवलेलं भात शेतात पेरलं जातं. भाताची रोपं साधारण वीत दीडवीत झाली की मग त्याची लावणी करावी लागते. लावणी म्हणजे उगवलेली भाताची रोपं ठराविक अंतरावर पुन्हा रोवायची/लावायची. त्यानंतरच रोप वाढून पुढे त्याला लोम्ब्या धरतात आणि मुख्य म्हणजे लावणीचा हा कार्यक्रम भर पावसात, चिखलात उभा राहून करावा लागतो. चिखल ओला असेल तेव्हाच त्यात लावणी करता येते. या सगळ्या श्रमांचं चीज होतं आणि सुवासिक असा तांदूळ आपल्या हाती येतो. यासह कोकणात कुळीथ, नाचणी यांचंही पीक घेतलं जातं. कुळीथ हे धान्य थंडी आणि तापावर, तर नाचणी हे उष्णतेवर रामबाण असतं. काही प्रमाणात मक्याचही उत्पन्न कोकणात होतं. 

कोकणातलं आणखी महत्त्वाचं उत्पन्न येतं ते हापूस आंब्यातून. त्याविषयी आपण मागे वाचलं आहेच. 

एक हापूस झेलू बाई....

तिसरं महत्त्वाचं उत्पन्न देणारं साधन म्हणजे नारळ. कोकणात नारळाचं उत्पन्न मुबलक प्रमाणात येतं. मुळात जिथे समुद्र किनारा लागून आहे अशा सर्वच प्रदेशांत साधारणपणे नारळ आणि सुपारीच्या झाडांना चांगलं पीक येतं. नारळ आणि सुपारीच्या झाडाची आणि फळाची रचना आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की, एकसारखी दिसणारी पण भिन्न आकाराची आणि भिन्न गुणधर्म असणारी ही दोन फळं आहेत. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. या झाडाच्या मूळांपासून शेंड्यापर्यंत सर्वच भागांचा वापर होतो. कोणताही भाग वाया जात नाही. या नंतर नंबर येतो तो काजूचा. आपण जे काजू आवडीने खातो त्याची कोकणात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. काजूच्या लाल-पिवळ्या रसरशीत फळाला राखाडी रंगाची बी असते. ही बी भाजली आणि फोडली खमंग चवीचा काजू आपल्याला खायला मिळतो, पण काजूइतकंच त्याचं फळही चविष्ट असतं बरं का! फक्त चिक अंगावर सांडू न देता खाता आलं पाहिजे. कोकम अर्थात रातांबा, फणस, केळी, पेरू अशी अन्य काही उत्पन्नाची साधनं कोकणात आहेत.

मागे एका लेखात म्हटलं, त्याप्रमाणे जवळपास प्रत्येक घराच्या मागे स्वतंत्र बाग असतेच. तिथे घरापुरत्या भाज्या लावल्या जातात. कोकणात वांगी, टोमाटो, मिरच्या, भेंडी, चवळी, माठ, शेवगा; तसंच पडवळ, भोपळा, तोंडली अशा वेलभाज्याही कोकणात पिकतात. मिरीसारखा मसाल्याचा पदार्थही पिकतो. यातल्या काही भाज्या त्या घराला आर्थिक उत्पन्नही मिळवून देतात.

आणि आता शेवटचं पण महत्त्वाचा पीक म्हणजे मासा. कोकणवासीयांच्या आहारातील भातानंतरचा मुख्य घटक. माशाचं पीक म्हटलं म्हणून चक्रावून जाऊ नका. पूर्वीच्या काळी परंपरेने हा व्यवसाय निवडला जात असला तरी आज अनेक धडपडे उद्योजक व्यवसायासाठी मत्स्यशेतीचा पर्याय निवडत आहेत, त्यात यशस्वीही होत आहेत. पापलेट, कोलंबी, सारंगा अशा अनेक माशांना आज देशा-परदेशात मागणी आहे. या आणि अशा अनेक उत्पादनांमधून आजवर कोकणाला आर्थिक पाठबळ मिळालं आहे.

मित्रांनो! कोकणाला निसर्गाने भरभरून दिलंय. समृद्धीची लयलूट केली आहे. आज गरज आहे ही संपदा जपण्याची, हा सांस्कृतिक वारसा चिरंतन ठेवण्याची. हातात हात घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे. तरंच कोकण जगाच्या पाठीवर दिमाखात मिरवत राहील. करणार ना एवढं?