आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे

दहावी-बारावीचे निकाल आता लागायला सुरुवात झाली आहे. जसजसे निकाल जाहीर होत जातील, तसतसं मुलांच्या घरातलं वातावरण तापत जाईल. मार्क कितीही मिळालेले असू देत अॅडमिशन, पुढे नक्की काय करायच यावर चर्चा, मतभेद, वादविवाद  होणारच घराघरातून. कोणत्याही घरातला मुलगा-मुलगी साधारण आठवी-नववीत गेल्यापासूनच या विषयाला हळूहळू तोंड फुटतं, पण अनेक घरातून यावर नुसत्या चर्चा होतात. नक्की काही ठरलेलं नसतं. अनेकवेळा मार्क कसे मिळतात यावर ठरवू असाही दृष्टिकोन असतो. पण दिवसेनदिवस सर्व क्षेत्रातली वाढती स्पर्धा लक्षात घेता, करिअरच्या विविध संधींची उपलब्धता लक्षात घेता वेळेवर निर्णय घेणं आवश्यक झालेलं आहे. आपण आजूबाजूला अनेकवेळा अशी उदाहरणं पाहतो की, दहावीत चांगले मार्क मिळाले म्हणून सगळ्यांच्या म्हणण्यानुसार विज्ञान शाखेत अॅडमिशन घेतली मग तिथे झेपत नाही, आवडत नाही म्हणून नंतर साईड बदलली. यात वेळ, पैसे या सगळ्याचा अपव्यय होतो. पालकांचीही भूमिका अनेकवेळा अशी असते की, पालकांच्या अपुऱ्या इच्छा मुलांनी पूर्ण कराव्यात. काही वेळा पालकांची इच्छा मुलं मान्य करतात. पण प्रत्येकवेळी असं होतंच असं नाही. पालकांची इच्छा, मुलांची इच्छा, मुलांची क्षमता याचा ताळमेळ बसतोच असं नाही. मग त्यातून परत वादावादी, नाराजी असं चक्र सुरू होतं. हे सगळं पूर्णपणे टाळता येईल, असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण करिअरचे निर्णय घेण्यापूर्वी पुरेशी माहिती जमा केली असेल, पालक आणि मूल यांच्यात थोडा संवाद असेल तर निर्णय घेणं सोपं जाईल. घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. अलीकडे सगळ्याच क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. आपल्या देशातल्या लोकसंख्येचा प्रश्न रोजगाराच्या संधींमध्येसुद्धा जाणवतॊच आहे. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती, बौद्धिक क्षमता, आवड या सगळ्याचा विचार करिअर निवडताना करावा लागणार. करिअर निवड करताना काय काय केलं पाहिजे हे एकदा पाहू या.  

१. मुलाची आवड, कल कोणत्या क्षेत्राकडे आहे ते पाहा. मुलाला जर स्वत:च क्षेत्र ठरवता येत नसेल तर अॅप्टिट्यूड टेस्ट करून घेता येईल. त्यामुळे मुलाच्या आवडीचा, क्षमतांचा अंदाज येईल. 
२. दहावीत गेल्यावर पाहू, परीक्षा झाल्यावर सुट्टीत पाहू, मार्कांवर ठरवू असा दृष्टिकोन योग्य नाही. थोडीफार माहिती जमा केली पाहिजे, निदान २-३ क्षेत्रांचा विचार करून  ठेवला पाहिजे. 
३. पालकांनी आपल्या इच्छा मुलांवर लादू  नयेत. पालकांनी आपल्या इच्छा, विचार मुलांना जरूर सांगावेत, पण जबरदस्ती करू नये. दहावीतली किंवा अगदी बारावीतली मुलंही तशी लहानच असतात. करिअरचे निर्णय स्वत: घेण्याइतकी प्रगल्भता त्यांच्याकडे नसते. तेही गोंधळलेले असतात. पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे. आवश्यक  माहिती मिळवण्यासाठी मुलांना मदत केली पाहिजे. 
४. ज्यांची आर्थिक स्थिती खास नाही, अशा पालकांनी शैक्षणिक कर्ज मिळू शकतं का? त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात याची आधीच चौकशी करून ठेवली पाहिजे. मुलांनाही याची कल्पना द्यावी म्हणजे त्यांनासुद्धा त्यासाठी काय करायला पाहिजे हे कळेल. 
 
कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी काय काय करायला लागतं हे पुढच्या काही लेखांमधून पाहू या. पुन्हा भेटूच करिअरच्या वळणवाटांवर . 
- सुप्रिया देवस्थळी