नदीची सफर

दिंनाक: 29 Jun 2017 14:35:22


 

'शिक्षण विवेक' आयोजित  'नदी  फेरी'  या  उपक्रमाची काही क्षणचित्रे.... 

सिद्धेश्वर घाट ते बालगंर्धव पूल.... पुणे

दिवस  - २४ जून  २०१७  

वेळ - सकाळी ७.०० ते ९.००

एक सफर नदीची. वाचून छान वाटते. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला शिक्षणविवेक आयोजित 'एक सफर नदीची' या उपक्रमातून.
विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणविवेक टीम अशा २६८ जणांनी मुठा नदीची सफर केली. यामध्ये रेणुका स्वरुप प्रशाला, विमलाबाई गरवारे हायस्कूल, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शिशुविहार एरंडवणे, शिशुविहार कर्वेनगर या पुण्यातल्या  शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

नदीचा इतिहास, तिचं परिसंस्थेतलं स्थान, प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासंदर्भातलं प्रबोधन या फेरीतून झालं. सह्याद्रीची पर्वतरांग ६ कोटी वर्षांपूर्वीची आहे. मुठा नदीचा उगम १ कोटी वर्षांपूर्वीचा. तर तिचे प्रवाह १ लाख वर्षांपूर्वीचे. या नदीच्या आसपास पुण्यात किती वेगवेगळे प्राणी असतील याचा शोध उत्तखननात लागला. हत्ती, शहामृग, आरोच नावाचे पक्षी प्राणी इथे होते. कितीतरी वेगवेगळे पक्षी इथे आजही आहेत. फक्त ते आता लुप्त पावत चालले आहेत. कारण ते ज्या मुठा नदीतून अलगदपणे जलचरांची शिकार करायचे ती नदी आता प्रदूषित झाली आहे. तिच्यात दिसणारे बुडबुडे म्हणजे नदीच्या आत तयार होत असलेला वायू. हा प्रदूषित वायूच पुढे नदीबरोबर हडपसर पर्यंत जातो. जिथे आपण खात असलेल्या भाज्या पिकतात, त्या शेतीलाही हीच नदी पाणी पुरवते. म्हणजे आपल्या पोटात हे प्रदूषित पाणी जाते. पुढचे परिणाम सांगायला नकोतच. हे सगळे नदीच्या सफरीत सांगितले गेले. नेहमी आपण पाहत असलेल्या नदीकडे वेगळेपणाने पाहण्याची दृष्टी या वेळी मिळाली.

 

ही सगळी माहिती सांगत होते 'जीवितनदी' संस्थेचे ६ मार्गदर्शक. नदी परिसंस्था, नदीकाठावरील घडामोडी, झाशीची राणी वापरत असलेला रस्ता, श्री. केळकर यांची समाधी अशा माहीत नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती यातून मिळाली. ही माहिती घेत नदीचा पूर्वीचा परिसर व आजचा परिसर यांचे तुलनात्मक फोटो दाखवण्यात आले. सर्व मार्गदर्शक सविस्तर माहिती सांगत होते. विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारुन शंकांचे निरसन करुन घेतले. यावरुन विद्यार्थी मित्रही मनापासून नदी फेरीचा आनंद घेत होते, हे लक्षात आले. नदीच्या स्वच्छतेचं पटलेलं महत्त्व मुलांनी निर्माल्य टाकायला आलेल्या काकांना रोखून लगेचच दाखवून दिले. निदान आपल्यासाठी, नदीच्या आसपासच्या परिसंस्थेतल्या घटकांसाठी आपण या नदीची काळजी घ्यायला हवी, तिला प्रदूषणमुक्त करायला हवे ; हे जाणवल्याचे  विद्यार्थ्यांनी सांगितले.  


दोन तास झालेल्या या फेरीनंतर शिक्षणविवेक टीमने विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. पालक व शिक्षक यांनी 'या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा नक्कीच उपयोग होईल' असे सांगितले.  नदीचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे ठरवून विद्यार्थी आपापल्या शाळेत परतले.  

उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या विद्यार्थांचे, त्यांच्या पालकांचे, शाळांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे खूप खूप आभार.

या उपक्रमाची आखणी आपल्या रुपाली सुरनिस हिने केली आणि तिचे प्रयत्न सफल करण्यासाठी रेश्मा बाठे, चित्रा नातू, मानसी भागवत,  गायत्री वाड, शलाका, धनाजी जाधव, चेतन मँडम आणि चेतन यांनी मोलाचे सहकार्य केले.

जीवित नदी संस्थेच्या अदिती देवधर आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. आणि विशेष आभार मानावेसे वाटत आहेत, ते आपलाच विद्यार्थी असणाऱ्या आणि शिक्षणविवेकवर मनापासून प्रेम करणाऱ्या ओंकार गानू याचे.

- [email protected]

 

 

-