संगीत स्पर्धांमधून मिळणारा सकारात्मक अनुभव
 
खचाखच भरलेल्या सभागृहात एकदम शांतता पसरते. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आजच्या स्पर्धेत पहिला नंबर कोण पटकावणार याचा अंदाज खरं तर बऱ्याच जणांना आलेला असतो. फक्त परीक्षकांनीसुद्धा त्यालाच निवडलं असणार का? असा विचार प्रत्येकाच्या मनात असतो. आजची आंतरशालेय स्पर्धा अगदी अटीतटीची झालेली. त्यातून आपापल्या शाळेच्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचे मित्र-मैत्रिणीही उपस्थित होते. स्पर्धकांनी लोकप्रिय गाणी म्हटली की त्यांचे पाठीराखे सभागृह डोक्यावर घेत होते. अशा वेळी परीक्षकांची खरी कसोटी असते.
आणि प्रथम क्रमांकाचा विजेता आहे...........
प्रथम क्रमांकाच्या विजेत्याचं नाव जाहीर झालं आणि एकच जल्लोष झाला. त्या स्पर्धकाचे पाठीराखे आनंदाने नाचू लागले. सर्वांनी परीक्षकांचा निर्णय मान्य केला. बक्षीस समारंभ संपल्यावर बक्षीस मिळालेले आणि न मिळालेले अशा दोन्ही स्पर्धकांनी परीक्षकांशी संवाद साधला. आपण कुठे कमी पडलो याबाबत सल्ला घेतला. अशी निकोप स्पर्धा नवोदित कलाकारांना व संगीताच्या विद्यार्थ्यांना नेहमीच उपयोगी पडते.
"Competition leads to Perfection", असं म्हंटलं जातं.
कोणत्याही स्पर्धेत उतरणं म्हणजे आपण स्वत:ला अधिकाधिक चांगल्या रीतीनं लोकांसमोर पेश करणं, आपल्याला येत असलेली कला उत्तम रीतीनं श्रोत्यांसमोर सादर करणं. अशा स्पर्धांमधून नेहमीच नवोदित कलाकारांना सर्वांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते. आपण जे काही शिकलो आहोत, जी कला आत्मसात करत आहोत, त्यात आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत हे तपासून पाहता येतं. आपला सभाधीटपणा आणि आत्मविश्वास वाढवता येतो.
यासाठी निरनिराळ्या स्तरावरील स्पर्धांचा आपण विचार करू. आपण कुठे जाऊन गाणार आहोत, कुणासमोर गाणार आहोत अशा साध्या गोष्टींचा सुद्धा आपल्या सादरीकरणारावर परिणाम होत असतो. म्हणून सुरुवातीच्या काळात आपल्या वर्गात, आपल्या शाळेत, आपल्या सोसायटीत होणाऱ्या  स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. तो परिसर आपल्या परिचयाचा असतो, कौतुकानं ऐकणारे मित्र-मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक समोर असतात. त्यामुळे आपल्याला किमान भाग घेतल्याचं तरी समाधान मिळतं. अशा ठिकाणी सराव झाला की, मग पुढे आंतरशालेय सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा.
सुरुवातीच्या काळात स्पर्धेत भाग घेताना, एकदम बक्षिसाची अपेक्षा न ठेवता, आपलं सादरीकरण चांगलं कसं होईल अशी माफक अपेक्षा ठेवावी. त्यासाठी मेहनत घ्यावी. आपल्याला बक्षीस मिळणं न मिळणं, जसं आपल्या सादरीकरणावर अवलंबून असतं, तसंच ते इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्याबद्दल सविस्तर नंतर बोलू. 
सर्वांत गाण्याची निवड खूप महत्त्वाची असते. आपल्या आवाजाला आणि कुवतीला झेपेल असं गाणं निवडावं. त्याच्या सुर-ताला बाबत जाणून घ्यावं. ओरिजनल गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं. एखादं लोकप्रिय गाणं निवडलं, तर ते लोकांच्या मनांत ठसलेलं असतं. त्यामुळे नकळतपणे त्या मूळ गायकाशी वा गायिकेशी तुलना होते. अशा वेळी एखादं अपरिचित नवीन गाणं निवडलं तर ते सुद्धा परिणामकारक होऊ शकतं. 
हौसेनं भाग घेणाऱ्या स्पर्धकांमधे बहुतेकवेळी तालाची बाजू ठीक असली तरी सुरांच्या बाबतीत खूपच उदास असतात. कारण आपला आवाज सुरात मिळवण्यासाठी शिकावं लागतं, आवाजावर मेहनत घ्यावी लागते, याची त्यांना जाणीव नसते. कितीही सुंदर गाडी आपल्याजवळ असली, तरी ती वापरण्यापूर्वी ड्राईव्हिंग शिकावं लागतंच ना! तसंच आवाजाला सुरांत आणण्यासाठी शिकावं लागतं. त्यामुळे सुरा-तालाचा विचार सर्वांत महत्त्वाचा. 
स्पर्धकाला श्रोत्यांसमोर गाताना आणखी काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. स्टेजवर आत्मविश्वासपूर्वक प्रवेश करणं, माईकचा योग्य रीतीनं वापर करणं, समोर श्रोत्यांकडे पाहून प्रसन्न मुद्रेने गाणं, समोर कागद न ठेवता शब्द पाठ करून गाणं, श्रोत्यांसमोर गाताना शोभेल असा पेहेराव असणं याचा पूर्ण विचार करून तयारी करणं स्पर्धकाच्या हिताचं असतं.
आपल्या बरोबरीच्या इतर स्पर्धकांचं सादरीकरण ऐकणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्यापेक्षा चांगल्या तयारीचे स्पर्धक कसे गातात, त्यांच्यात आपण कुठे आहोत हेही समजते. 
एकदा पहिला नंबर आला म्हणजे तो नेहमीच श्रेष्ठ, असे नसते. त्याचप्रमाणे एखादे वेळेस नंबर नाही आला, तर त्याने पुन्हा प्रयत्नच करू नयेत असंही नसतं. आपल्यात अनुभवाने सुधारणा करत राहणं महत्त्वाचं.  
विचार करा.........
यापेक्षा उच्चस्तरावरील स्पर्धांसाठी कशा प्रकारे तयारी करायची, याचा विचार लेखाच्या उत्तरार्धात करू या.
 
( लेखिका गेली ४० वर्षे निरनिराळ्या स्पर्धांसाठी परिक्षक म्हणून काम करत आहेत )
- मधुवंती पेठे