नैतिकता आणि संस्कारक्षमता

‘नैतिकता’ म्हटलं तर खूप अवघड संकल्पना आहे, पण रोजच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाशी जोडलेली. मुलांच्या नैतिक विकासाबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पालक कार्यशाळेत नेहमी चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे “मुलांचा नैतिक विकास आम्ही करू तरी कसा?” त्यादृष्टीने या लेखाद्वारे केलेला हा एक प्रयत्न.

     पोळ्या करायला येणारी बाई प्रत्येक घरातून थोड्याथोड्या पोळ्या घेऊन जाते. असा व्हिडीओ मध्यंतरी वॅाट्सअपवर पाहण्यात आला. त्या बाईला असं का करावं वाटलं असेल? कदाचित तिची परिस्थिती नसेल म्हणून. पण म्हणून काय झालं? तिने अशी चोरी करावी? कोणी बघत असो-नसो तिचं तिला काही वाटलं कसं नाही? असे अनेक विचार मनात येऊन गेले. त्याच वेळी अजून एक गोष्ट आठवली. आपल्या दोन मुलींना घेऊन एकदा बाबा बागेत जातो. बागेत भरपूर खेळून झाल्यावर ते तिघे नेहमीच्या भेळवाल्या काकांकडे भेळ खायला येतात. भेळ खाऊन झाल्यावर बाबा त्या काकांना पैसे देतो. उरलेले पैसे काका परत बाबाला देतात. थोडं पुढे आल्यावर बाबाच्या लक्षात येतं की, भेळवाल्या काकांनी उरलेले पैसे परत देताना ३० रु जास्त दिलेत. बाबा आपल्या मुलींना हे सांगतो. तिघे ही परत मागे फिरतात व त्या काकांना जास्तीचे पैसे परत करतात. तेव्हा ते काका बाबाला म्हणतात, “राहू द्यायचं न साहेब. पुढच्या वेळेला आला असतात तेव्हा दिले असतेत.”तेव्हा बाबा म्हणतो, “काका, प्रश्न तुमच्या माझ्यावरच्या विश्वासाचा नाहीय, तर माझ्या मुलींचा माझ्यावर असलेल्या विश्वासाचा आहे. आज मी कसं वागतोय हे ते बघताहेत. त्यातूनच पुढे कसं वागायचं असतं, हे त्यांना कळतंय.”

 वरील दोन्ही गोष्टींचा विचार केला, तर आपल्याला लक्षात येईल की नैतिकता ही रुजवावी लागते. हे ‘रुजणं’ जितकं खोलवर तितकी नैतिकता बळकट होते. पोळीवाल्या बाईला हळूच पोळ्या उचलाव्याश्या वाटतात. कारण तिच्यातली नैतिकतेची मूळं खूपच वरवर आहे. उद्या हीच बाई आपल्या मुलाला शाळेतून मित्रांची पेन्सिल पळवून आणल्यास ओरडली तरच नवल; पण दुसऱ्या गोष्टीतल्या या दोन मुलींच्या मनात मात्र त्या एका प्रसंगाने प्रामाणिकपणाची पाळंमुळं घट्ट रोवली गेली, एवढं मात्र खरं.

व्यक्तिमत्त्व घडविण्यात अनुवंश व परिवेश (आजूबाजूचं वातावरण) हे दोन घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मुलांमध्ये नैतिकता जोपासली जाणं हे  मुख्यत्वे परिवेशावर अवलंबून असते. प्रत्येकावर होणारे संस्कार, शिकवण, आजूबाजूची परिस्थिती या सगळ्यांतून नीतिमूल्ये रुजत जातात. त्यातूनच मग प्रभावी व्यक्तिमत्त्व साकार होते.

     ‘तुमची मूल तुमचं ऐकत नसतात, तर ती आम्हाला बघत असतात. हे वाक्य नैतिकतेच्या बाबतीत आपण पालकांनी नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. प्रामाणिकपणा, निष्ठेने काम करणे, सहनशीलतेने एखाद्या कामाचा योग्य मार्गाने पाठपुरावा करणे, आनंदी राहणे, कामावर प्रेम करणे, अन्याय सहन न करणे, कोणावरही स्वतःहून अन्याय न करणे हेही घटक नैतिकतेच्या संकल्पनेत समाविष्ट होतात.

नैतिकता ही लहानपणापासूनच इतरांच्या वागण्याच्या निरीक्षणातून आत्मसात केली जाते, तेव्हा काय आपल्या पालकांची जबाबदारी नक्कीच जास्त आहे. आपण काय करू शकतो? ही नैतिकता मुलांमध्ये रुजण्यासाठी?

आपल्या वागण्या-बोलण्यात मेळ ठेवू या. जसं बोलतो तसं वागून दाखवू या. यातूनच प्रामाणिकपणा रुजवू या.

* आपल्या हातून चुकून घडलेल्या चुकांची मुलांसमोर कबुली देऊ या.

कोणावरही अन्याय झाल्यास लगेच क्षमा मागू या.

मुलांकडून घडलेल्या योग्य वर्तनाचे जरूर कौतुक करू या.

त्यांच्याकडून झालेल्या चुकांना पदराआड न घालता त्यावर त्यांच्याशी चर्चा करू या.

कधीकधी मुलांना दिलेला स्पष्ट नकारसुद्धा गरजेचा असतो.

आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांच्या चुकांना योग्य वळून लावू या.

भरपूर गोष्टी सांगू या (नीतिकथा) पण त्यातून मिळणारा संदेश न सांगता तो मुलांना स्वतःलाच ठरवू द्या. 

थोडक्यात, "पेराल तसं उगवेल" ही  म्हण आपण लक्षात ठेवूच या.

- रश्मी पटवर्धन

[email protected]

वाचकहो, या लेखकाबरोबरच ‘घडण पालकत्वाची’ या सदराद्वारे तुमच्याबरोबरचा हा प्रवास थांबवत आहे. तुम्हाला पालकत्वाच्या पुढील वाटचालीकरीता मनापासून शुभेच्छा!!!!

धन्यवाद.

'घडण पालकत्वाची' या सदरातील लेख आपल्याला एक मानसोपचारतज्ञ म्हणून सल्ला देतील.

'घडण पालकत्वाची'

 'घडण पालकत्वाची'