पालकत्व

दिंनाक: 25 Jun 2017 11:35:12
पालकत्व : एक आव्हान

 समीर व राधा त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या म्हणजे साहिलच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करायला  गेल्यानंतर नेहमीप्रमाणे साहिलसाठी त्यांना आवडणारे कपडे शोधू लागले. तेवढ्यात साहिलने एक शर्ट आणि जीन्स शोधून आणली आणि म्हणाला चला आई-बाबा, झाली आपली खरेदी. मी हा ड्रेस घेतोय, आता आपण जाऊ या.

‘‘अरे पिल्लू, असला कसला रंग तू शोधून काढलास. आणि असली भडक जीन्स तू घालणार? अरे, या ड्रेसपेक्षा कडक ड्रेस घ्यायचा आहे आपल्याला हा ड्रेस परत करून टाक बरे.’’

‘‘नाही, मला हाच ड्रेस घ्यायचा आहे.’’

‘‘आपण हा घेणार नाही, कळतंय तुला.’’

राधाने आवाज चढवताच साहिलने रागाच्या भरात दुकानातील काचेच्या काउंटरवर जोरदार लाथ घातली आणि जमिनीवर लोळायला सुरुवात केली.

साहिलच्या अशा वागण्याने वैतागून कपडे खरेदी न करताच तिघेही घरी निघून आले. नेहमी आपण घेतलेले कपडे आनंदाने घालणारा साहिल आज अचानक असा हट्टाला का पेटला हे दोघांच्याही लक्षात न आल्याने ते बेचैन झाले.

समीर फ्रेश होऊन हॉलमध्ये येताच त्याला बेडरूममधून साहिलचा एकट्याचाच बोलण्याचा, खिदळण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून त्याने बेडरूममध्ये हळूच डोकावले, तर समीर त्याच्या संतोष नावाच्या काल्पनिक मित्राबरोबर गप्पा मारत आणि खेळत बसला होता.

समीर थेट राधाकडे गेला आणि हे सगळे भराभरा राधाला सांगून टाकले. राधाने शांतपणे सगळे ऐकून घेतले आणि म्हणाली, ‘‘अहो, हे मीच तुम्हाला सांगणार होते. हल्ली साहिल सतत संतोष, संतोष करून एकटाच गप्पा काय मारतो, खेळत काय असतो. शाळेत आणि सोसायटीत त्याचा संतोष नावाचा मित्रच नाही हो. हल्ली प्रत्येक बाबतीत त्याच्या आवडीनिवडी पण वाढतच चालल्यात. मित्रांना हळूच चिमटा काढणे, मारामारी पण वाढतच चालली आहे.  ग्राऊंडवर गुंतवावा म्हणाले तर तिथेही आता जायचे नाही म्हणतो. अवघड वाटतयं सगळचं.’’

दोघांचे असे बोलणे सुरू असताना दारावरची बेल वाजली आणि साहिलचा काका प्रसाद हजर झाला. साहिलची चिंता समीर आणि राधाच्या चेहर्‍यावर अगदी स्पष्ट दिसत असल्यामुळे, प्रसादने विचारले, ‘‘काय रे, कसला विचार करत होतात तुम्ही आणि पोराच्या वाढदिवसाची तयारी करायची सोडून असे गंभीर चेहरे करून काय बसता.’’

‘‘प्रसाद तुझ्यापासून काय लपवायचे. खरं  सांगू का आम्ही साहिलच्या आजकालच्या वागण्याने फार बेचैन झालो आहोत रे. सतत चिडणे, ओरडणे, जेवताना मला हीच भाजी पाहिजे म्हणून अडून बसणे या सगळ्याला कसे तोंड द्यायचे तेच कळत नाही.’’

‘‘अच्छा, पण तुम्ही कुणीही मुद्दाम असे वागत नाही , हे लक्षात घ्या. साहिल आता मोठा होतोय. त्याच्या शरीराची वाढ आपल्याला दिसते म्हणून लक्षात येते, पण त्याचे मन, त्याच्या भावना, त्याचा आजूबाजूच्या जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतोय, मोठा होतोय हे आपल्याला दिसत नाही किंवा लक्षात येत नाही, म्हणून हे सगळं होतंय.’’

‘‘पण आम्ही त्याच्या या मोठ्या होण्यामध्ये त्याला काय मदत करू शकतो?’’ राधाने आता हा तिढा सुटायची शक्यता निर्माण झाल्यामुळे एकदम उत्साहाने विचारले आणि समीरने सुद्धा हो, ‘‘सांग ना असे म्हणत राधाला पाठिंबा दिला.’’

‘‘समीर, वाहिनी, तुम्ही त्याचे वजन वाढावे , उंची वाढावी म्हणून प्रयत्न करता ना, अगदी तसेच त्याच्या भावनिक गरजा ओळखून, त्याला शरीराबरोबर मनाने सुद्धा वाढण्यासाठी दोघांनी मिळून मदत करायची. तीन ते सहा वयाच्या मुलांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची नुकतीच ओळख होऊ लागलेली असते, त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी तयार होऊ लागतात. त्यांचे मन फँटसीमध्ये जास्त रमते, काल्पनिक मित्र, विश्व तयार होते. आनंद, ुदुःख, निराशा या भावना निर्माण तर होतातच, पण त्या व्यक्त कशा कराव्या हेच त्यांना कळत नाही त्यामुळे त्यांचा मूड पटापट बदलत राहतो. आजूबाजूच्या जगाने एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपली दखल घ्यावी, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागते.’’

‘‘तुम्ही आता घरातले छोटे छोटे निर्णय घेताना, जसे की, आज फिरायला जाऊ या का?, आज भाजी कोणती करू या?, साहिलचे मत विचारायला सुरुवात करा. त्याला गोष्टी वाचून दाखवा, त्याचबरोबर गाणी म्हणा म्हणजे त्याची फँटसीची भूक आपोआप भागेल. त्याला आनंद, दुःख व्यक्त करताना कसे वागायचे हे त्याच्या एखाद्या आयडॉलचे अर्थात पोकेमॉन किंवा डोरेमॉनचे उदाहरण देऊन सांगा.’’

‘‘प्रसाद, तुझे आभार कसे मानावेत, तुझ्याशी गप्पा मारण्याच्या नादात साहिल जसा मोठा होतोय तसे पालक म्हणून आम्ही पण मोठे झाले पाहिजे, हे आज आम्हाला समजले.’’

समीर उद्या सकाळीच आता कपड्याचे दुकान गाठू या आणि साहिलला त्या दुकानात बिनधास्त सोडून त्याच्याच आवडीचे कपडे घेऊ या.

-- चेतन एरंडे

 [email protected]