अभ्यास कसा करावा?

नमस्कार मुलांनो, या जूनपासून आपण एक नवीन सदर सुरू करतोय ते म्हणजे ‘अ अ अभ्यासाचा’. तुम्ही सर्व मुलं आता माध्यामिक विभागात गेलात (5 वी ते 10 वी) त्यामुळे तुमच्या अभ्यासावर आता इतरांचच लक्ष जास्त असतं. हो ना? पण काय करणार ‘अभ्यास करणं’ हे तुमच्या शालेय आयुष्यातलं खूप महत्त्वाचं काम आहे. हे काम तुम्ही जितकं मनापासून कराल, तितका अभ्यासातला तुमचा उत्साह वाढत जाणार आहे बरं का.

अभ्यास म्हटलं की, आपल्याला बरेच प्रश्‍न पडतात. तो का करायचा? इथपासून तो किती करायचा? कसा करायचा? कुठे करायचा? इथपर्यंत. या प्रश्‍नांचीच उत्तरं आपण या अभ्यास कौशल्यांच्या सदरात शोधणार आहोत. जणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास हे एक ओझं न वाटता एक आनंददायी प्रवास वाटेल. या लेखमालेच्या निमित्ताने तुमच्या या प्रवासात मला तुमची मदत करण्याची संधी मिळाली आहे. मला अशी आशा आहे की, तुम्हीदेखील ही विविध अभ्यासकौशल्ये आत्मसात करून तुमची अभ्यासातील प्रगती वाढवाल.

नीरजा अभ्यास करताना न एका कोपर्‍यात बसते, जिथे तिला अभ्यास करताना अंधार येतो, त्यामुळे अभ्यास करताना चक्क तिला झोपच येते, समीर अभ्यास करताना एवढा पसारा घालून ठेवतो, त्यामुळे आई त्याला ओरडते आणि मग अभ्यास राहतो बाजूला, सगळा पसारा आवरण्यातच समीरचा सारा वेळ निघून जातो. आदित्यची अभ्यासाची जागा खिडकीजवळ आहे. त्यामुळे जरा काही खुट्ट आवाज आला की, याचं लक्ष बाहेर जातं आणि अभ्यास रेंगाळतो.

नीरजा, समीर, आदित्य यांच्याबाबतीत तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात येतेय? तर तिघांचाही काही कारणांमुळे अभ्यास होत नाहीए. ती कारणं कोणती असतील असं तुम्हाला वाटतंय? ‘अभ्यासाला बसायची जागा’ आणि ‘आजूबाजूचं वातावरण’ ही ती कारणं आहेत. तुमच्याही बाबतीत काहीसं असंच होत का? उत्तर ‘हो’ असेल तर आपल्याला या कारणांवर मात करणार्‍या बाबींचाही विचार केला पाहिजे. काय बरं करता येईल यासाठी?

या काही युक्त्या :

* अभ्यासाची जागा हवेशीर व मोकळी असावी. पण अगदीच खिडकीजवळची नको.

* त्या जागेवर व्यवस्थित उजेड असावा. जर नसेल तर दिव्याची सोय असावी. दिव्याचा प्रकाश पांढरा व सौम्य असावा. (बल्बचा पिवळा प्रकाश नको) जेणेकरून डोळ्यांवर फार ताण येणार नाही.

* प्रत्येकाच्या घरात अभ्यासाठी एक स्वतंत्र जागा असावी. वेगळी खोली, टेबल, खुर्ची अशी सोय नसली तरी आहे त्या जागेत एक स्वतंत्र स्थान असावे. त्याच जागेवर बसून नेहमी अभ्यास करावा.

* अभ्यास हा बसून करावा. परीक्षेला पेपर लिहिताना आपली जशी बैठक असते. त्याप्रमाणे अभ्यास करतानाची बैठक असावी.

* अभ्यासाच्या जागेच्या जवळपास आपले लक्ष विचलित होईल अशी चित्र, मोबाईल फोन असू नये. याउलट अभ्यास करण्यास प्रेरणा देतील अशी पोस्टर किंवा सुविचार लिहावे.

* ज्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या विषयाशी संबंधित सर्व साहित्य एकाच वेळी घेऊन बसणे फायदेशीर ठरते. बाकीचे साहित्य, पसारा आवरून ठेवावा.

* सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अभ्यासाची जागा शांत असावी. आजूबाजूच्या गोंगाटाचा त्रास होईल अशी जागा अभ्यासाला निवडू नये, तर जिथे बसल्यावर तुम्हाला शांतपणे, एकाग्र होऊन अभ्यास करता येईल अशी जागा अभ्यासाला निवडावी. पण हो भयाण शांतताही आपल्याला सहन होत नाही हे लक्षात ठेवून जागेची निवड करावी.

मग, काय मुलांनो, ठरवणार ना आजपासून स्वत:साठी एक स्वत:ची अभ्यासाची जागा? ज्या जागेवर तुमचं मन शांत आणि स्थिर असेल व जिथे बसल्यावर तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल अशी जागा निवडण्याचं काम आता तुमचं.

पुन्हा भेटू या पुढच्या सदरात एका नवीन कौशल्यासह. तोपर्यंत सर्वांना नवीन शालेय वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

     - रश्मी पटवर्धन

  [email protected]