या गप्पागप्पीमध्ये गणवेशांच्या गप्पा

 इतके दिवस कपाटात कोंबून ठेवलेले शाळेचे गणवेश आईने बाहेर काढले. चांगले खसखसून धुतले. दोरीवर उन्हात वाळत घातले.

मुलाची गणवेशाची पँट, शर्ट आणि ताईचा शाळेचा फ्रॉक मस्तपैकी ऊन खात दोरीवर लोंबकळू लागले.

पँट म्हणाली, ‘बहुधा जून महिना आला असणार...’

ऑ? तुम्हाला कॅलेंडर बिलेंडर समजतं की काय? असं शर्टाने म्हणताच फ्रॉक म्हणाला, ‘तुमची तर कमालच आहे. आपल्याला उगाचच स्वच्छं धुवायला, या माणसांना का हौस आलीय?’

खरंय तुमचं. अहो, इतके दिवस आपल्याला त्या कपाटातल्या अंधारकोठडीत कोंडून ठेवलं होतं, नुसता जीव गुदमरून गेला.

अहो, हे तर काहीच नाही. प्रत्येक वेळी कपाट उघडलं की मला वाटे, हे आता मला बाहेर काढतील. आपल्या अंगाखांद्यावर बसवून मला जग दाखवून आणतील..

मग.. तसं काही झालं का?

छे! ते कपाट उघडायचे आणि आणखीन कपड्यांचे बोळे माझ्या नाकातोंडात ठोसायचे. अगं माझ्या एका हातात जुना टी शर्ट, दुसर्‍या हातात दोन बनियन आणि माझ्या गळ्यात त्यांनी तीन अख्ख्या पँटी कोंबल्या होत्या! आपल्यात म्हणतात ना, ‘गळा दाबून कपड्यांचा मार सहन करावा लागतो’, तो हा असा.

फार सोसलंत हो तुम्ही.

आता शाळा सुरू झाली की..

की.. आमचे शमि आणि पँमि आता भेटतील. आमच्या गप्पा होतील...

फ्रॉकने पट्टा फिरवत विचारलं, आता हे शमि आणि पँमि कोण? जरा मला समजेल असं बोला की.

हँ हँ. अगं शमि म्हणजे आमचे शर्ट मित्र. म्हणजे तुमचे जसे फ्रॉक मित्र असतात ना तसे हे आमचे शर्ट मित्र..! कळलं का? शर्टने असं म्हणातच पँट पाँक..पाँक पाँक पाँक करत इतकी हसली की, तिचा चिमटाच उडाला आणि ती एकाच पायावर दोरीवर लोंबकळू लागली.

फ्रॉक तर ठसाठूस, खसाखूस हसत दोरीवर झोकेच घेऊ लागला. आपल्या पट्ट्याने शर्टला टपल्या मारू लागला.

एक पाय नाचवत पँट शर्टला म्हणाली, ‘‘अरे पावट्या, तू येडा की काय? आपल्यात म्हणतात ना, सात सात बटणं तुला, पण अक्कल नाही नावाला.’’

‘माझी अक्कल काढायला काय झालं काय? उगाच उचलला पाय आणि लावला बटणाला’, असं करू नकोस.

कसाबसा पट्टा आवळत फ्रॉक म्हणाला, ‘अरे, सात बटणांच्या शर्टा, मगाशी तू मला म्हणालास की आमचे फ्रॉक मित्र’. अरे, आम्हाला फ्रॉक मित्र नसतात तर ‘फ्रॉक मैत्रिणी’ असतात...

‘अरे, सात बटण्या, वर्गातली मुले जर शाळेत फ्रॉक घालून फिरू लागली तर मुलींनी काय लुंगी डान्स करायचा का?’

दोन्ही हातांनी गळा धरत शर्ट म्हणाला, ‘ओह सॉरी सॉरी. काय झालं.. खूप दिवस शाळेत गेलो नाही, फळा पाहिला नाही, अभ्यास केला नाही आणि शमि-पँमिच्या गप्पा ऐकल्या नाहीत म्हणून जराशी चूक झाली.’

इतक्यात त्या तिघांना माणसांची चाहूल लागली.

माझी पँट, माझा शर्ट, माझा आवडता फ्रॉक.. असे आवाज घरातून ऐकू आल्यावर फ्रॉक म्हणाला, ‘दिवसभर उन्हात लोंबकळताना आपल्या पोटाला नाहीतर गळ्याला लावलेला चिमटा सतत टोचत असतो. पण खरं सांगू, जेव्हा मुलं आपल्याला हाका मारतात, शाळेची तयारी सुरू करतात तेव्हा चिमटासुद्धा मऊ वाटतो आणि शाळेची ओढ लागते.’

तुम्हाला काय वाटतं, मला कळवाल? मी तुमच्या ‘ओढ पत्रांची’ वाट पाहतोय.

 

- राजीव तांबे

[email protected]