योगदिवस


नमस्कार, गेले पाच महिने आपण ‘विद्यार्थांसाठी योगाभ्यास‘ या विषयाच्या निमित्ताने भेटत आहोत. मुलांच्या मनामध्ये योगाविषयी आवड कशी निर्माण करता येईल हे आपण अगदी सोप्या, पण मुलांना आकर्षण वाटेल अशा तंत्रांचा वापर करून समजावून घेतले.

योगशास्त्र ही भारताने विश्वाला दिलेली अमोल अशी देणगी आहे आणि हे फक्त आपणच म्हणत नसून, जगातल्या सर्व देशांनी एकमुखाने मान्य केले आहे. २०१५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली. ज्याचा नुसता उल्लेख होताच प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी ही घटना आहे. या वर्षी २१ जून २०१७ रोजी तिसरा जागतिक योगदिन साजरा होणार आहे. जगातल्या सर्व देशांमध्ये त्यासाठी अगदी जोरदार तयारी सुरू आहे.

हजारो वर्ष जुन्या शास्त्राबाबत हे सगळे आजच का घडतं आहे???

आजच्या अत्यंत प्रगतिशील आणि तितक्याच वेगवान बनलेल्या जगात विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ ही चकीत करणारी आहे. त्याचबरोबर या गतिमान जगाशी जुळवून घेताना मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत अनेक गंभीर प्रश्नही समोर येत आहेत. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे ही समस्या कोणा एकट्यादुकट्याची नसून सर्व पालक, शिक्षक, बाल-मानसोपचार तज्ज्ञ यांच्या चिंतेचा विषय बनली आहे. या सगळ्या समस्यांचं मूळ हे आपल्या मनात आहे .

योग वासिष्ठ्यात वसिष्ठ ऋषी श्रीरामाच्या अनेक प्रश्नांना एकच उत्तर देतात, “योगः मनः प्रशमन इति उपायः“ योगशास्त्राने हजारो वर्षांपूर्वीच मनाला शांत, स्थिर ठेवून विकसित, प्रगल्भ करण्याचे अनेक प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. या प्रक्रियांचा वापर आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच करू शकतो.

रामायण आणि महाभारतातल्या रम्य कथा वाचताना लक्षात येतं की, पूर्वीच्या काळी मुलांना काही वर्षे दूर अरण्यात, गुरूंच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जायचं. निसर्गरम्य वातावरणात त्यांना अनेक ग्रंथांचं पाठांतर करतानाच, शौर्य निर्माण व्हावं म्हणून धनुर्विद्याही शिकवली जायची. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला, ‘तुला काय दिसतय?’, असं विचारल्यावर उत्तर आलं ‘मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय गुरुदेव!‘. यातून एकाग्रतेच्या शिक्षणावर दिलेला भर कळतो. भगवान श्रीकृष्णानीही मनाचे समत्व हरवून बसलेल्या अर्जुनाला गीतेतून सांगितले “समत्वं योग उच्यते.“ भारतात प्राचीन काळापासून मुलांच्या संतुलित विकासाला दिलेलं प्राधान्य लक्षात येतं.

आणि अगदी अलीकडे (म्हणजे फक्त २४०० वर्षांपूर्वी !!!) पातंजल योगदर्शन या ग्रंथात पतंजली मुनी म्हणतात, “योगः चित्तवृत्ती निरोधः“

आसनांच्या अभ्यासामुळे पौगंडावस्थेतील मुलांची उंची वाढते, महत्त्वाचे अवयव आणि अन्तःस्त्रावी ग्रंथीचा उत्तम विकास होतो, हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. प्राणायामाची अगदी मूलभूत पायरी म्हणजे श्वासाची ओळख. मुलांनी दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला तर त्यांची स्वतःच्या श्वासाशी ओळख तर होतेच, पण त्याबरोबर भरपूर प्रमाणात प्राणवायू रक्तात खेळवला गेल्यामुळे त्यांची मरगळ, अनुत्साह दूर होतो हे सत्यही अनेक शोधनिबंधांमधून कळते आहे. ओमकाराच्या उच्चारणामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होते हे तर अनेक योगसंस्थांनी शाळांबरोबर राबवलेल्या प्रकल्पातून लक्षात आले आहे.

मुलांच्या सैरभैर झालेल्या मनःस्थितीतून आत्महत्या, व्यसनाधीनता असे प्रश्न उग्र रूप धारण करताना दिसतायत. या मुलांना मन म्हणजे काय आणि ते शांत कसं करायचं हे समजावून सांगण अवघड आहे. पण त्याऐवजी योगासने, प्राणायाम, नादानुसंधान या प्रक्रियाच त्यांच्याकडून करून घेतल्या तर त्यांच्या शरीर-मन संकुलात निर्माण होणारी भावना आणि विचारांची वादळे अपोआपच शमतील.

योगदिनाच्या निमित्ताने या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक संस्थानी भरीव कार्य सुरू केले आहे आणि हाच योगदिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

योगाचे आपल्या आयुष्यातले महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा खालील लिंकवरील लेख. 

एकाग्रतेसाठी योगशिक्षण

- मनोज पटवर्धन

[email protected]