शालेय विद्यार्थ्याचे पर्यावरणातील काम 

 

 

 

ग्रामविकास, स्वच्छता व पर्यावरण संरक्षण-संवर्धन यांसारखे विषय व उपक्रम शालेय जीवनापासून शालेय अभ्यासक्रमांपर्यंत सर्वच चर्चेचे व जिव्हाळ्याचे विषय असतात. विद्यार्थी-शिक्षक-पालक सारेजण त्यावर विचारविमर्श, चर्चा करतात. मात्र त्याला प्रत्यक्षात कृतिशीलतेची साथ मर्यादित स्वरूपात मिळत असते. परंतु याच चर्चा वा विचारविमर्शाला शालेय शिक्षण अभ्यासक्रमाच्या पल्याड जाऊन कृतिशीलतेची साथ दिल्यास शालेय विद्यार्थी ग्रामविकास व त्याच्या जोडीला पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काय विशेष काम करू शकतात याचीच ही दोन कृतिशील व यशोगाथेची उदाहरणे -

दक्षिण कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील कोप्पा विकास खंडात येणार्‍या चित्तेमळ्ळी या छोटेखानी खेड्यातील बालकांनी ‘बाल सभा’ या अभिनव मंचाद्वारे गावपातळीवरील त्यांना जाणवणार्‍या व भेडसावणार्‍या विविध प्रश्‍न-चर्चा करत असतानाच स्वत:चे असे वेगळे व्यासपीठच तयार केले आहे.

चित्तेमळ्ळी गावच्या या आगळ्यावेगळ्या बालसभेत गावची 18 वर्षांखालील मुले व मुली एकत्र येऊन विविध मुद्यांवर विचार करतात. त्यादरम्यान झालेली चर्चा व मुद्दे यांची सोडवणूक होण्यासाठी या मुद्यांचा पाठपुरावा गावच्या ग्रामस्थ वा ग्रामसभेकडे करण्याचे काम बालसभेच्या प्रमुखाचे असते. त्यामुळेच बालसभेच्या या प्रमुखाला ‘मुख्यमंत्री’ असे म्हटले जाते. या ग्रामसभेची प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री असणारी एम.वाय. काव्यश्री यासारख्या नवव्या इयत्तेतील विद्यार्थिनीने सुद्धा काम केले आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

अशा काव्यश्रीच्या ग्रामसभा मुख्यमंत्री पदाच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीतील एक प्रमुख कामगिरी म्हणून गावालगतच्या ओढ्यावर जवळच्या गावच्या विद्यार्थ्यांना चित्तमळ्ळी येथे विशेषत: पावसाळ्यात येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी बांधलेल्या पक्या पादचारी पुलाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. हा मुद्दा ग्रामसभेच्या एका सत्रात 10 वर्षीय सी.व्ही. रचिन या विद्यार्थ्याने मांडला होता. रचिनच्या मते चित्तेमळ्ळीच्या जवळच्या खेड्यातून तो आणि त्याचे सहकारी शाळेसाठी येताना ओढ्यावर पूल नसल्याने व कर्नाटकच्या त्या परिसरात पश्‍चिम घाट परिसर असल्याने या विद्यार्थ्यांना जवळजवळ निम्मे शैक्षणिक सत्र शाळेत येणे अशक्यच होत असे.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित अशा या जिव्हाळ्याच्या मुद्यांवर नोव्हेंबर 2012 मध्ये सर्वप्रथम चित्तेमळ्ळीच्या बालसेभेत सी.व्ही. रचिनने या विषयाला वाचा फोडून त्यावर चर्चा घडवून आणली. त्यामुळे बालसभेच्या सर्व सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर चित्तेमळ्ळीच्या बालसभेची ‘मुख्यमंत्री’ म्हणून काव्यश्रीने ग्रामसभेत या मुद्दांवर सविस्तर चर्चा घडवून आणली. मात्र केवळ चर्चेनेच प्रश्‍न सुटत नसल्याने ग्रामसभेत या मुद्दांचा पाठपुरावा केला व पंचायत सदस्यांना शाळेतील मुलांना 4-5 महिने शाळेत येण्यासाठी होणार्‍या अडचणींची जाणीव करून दिली व मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये, यासाठी आपल्या सर्व सहकार्‍यांसह साकडेच घेतले.

अशा प्रकारे सतत दोन वर्षे गावच्या बालसभेने केलेले प्रयत्न व पाठपुरावा याचाच परिणाम म्हणून चित्तेमळ्ळीच्या ग्रामसभा व पंचायतीने गावाजवळील ओढ्यावर सिमेंटचा पादचारी पूल बांधून दिला व पावसाळ्यामुळे मुलांची शाळेत जाण्यासाठी होणारी अडचण कायमची संपुष्टात आली.

तसे पाहता संपूर्ण देशात कर्नाटक हेच असे राज्य आहे. ज्या ठिकाणी खेड्यांमध्ये ग्रामसभेच्या धर्तीवर बालसभांचे पण आयोजन करण्यात येते. त्यासाठी राज्य सरकारने 2006 मध्ये एक विशेष अध्यादेशच काढला. या कायदेशीर तरतुदींना स्थानिकांची साथ मिळत गेली व राज्यातील बालगोपाळांना आपले प्रश्‍न आणि समस्या यांची सोडवणूक करून घेण्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शनपण मिळत गेले. चित्तेमळ्ळीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ग्रामसभा व पंचायतीने बांधलेला पूल हे यासंदर्भात विशेष उदाहरण ठरले आहे.

यासंदर्भात दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे कोलकता येथील अलिपारेची 500 सफाई कामगारांची डॉ. आंबेडकर वसाहत. एक काळ असा होता की, सार्‍या शहराची स्वच्छता राखणार्‍या या सफाई कामगारांच्या वसाहतीत स्वच्छतेचा अभाव असायचा. कचरा सर्वत्र पडलेला असे व दिवसभर सफाईचे काम करून दमून, भागून परतलेल्या या सफाई कामगारांच्या घराभोवती अस्वच्छता असायची. शहर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यार्‍यांच्या घराचा परिसर कोण स्वच्छ करणार? हा प्रश्‍न बरीच वर्षे अनुत्तरीतच होता.

नेमकी हीच बाब कोलकत्याच्या ‘जीएफआय’ म्हणजेच गार्बेज फ्री इंडिया या कचरामुक्ती व स्वच्छता क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या लक्षात आली व संस्थेने शहरातील आंबेडकरनगर या सफाई कामगारांच्या वसाहतीत कचरामुक्तीसह वसाहतीच्या स्वच्छतेबाबत काम करण्याचा संकल्प करून त्यानुरूप काम करण्यास सुरुवात केली.

यासंदर्भात अर्थातच मुख्य समस्या होती ती स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीची स्वच्छता कुणी करायची. घरची कर्ती मंडळीच इतरत्र स्वच्छतेच्या कामासाठी घराबाहेर जात असत. परिणामी त्यांचा बहुतांश वेळ घराबाहेरच गेल्यामुळे या सफाई कामगारांच्या घर आणि परिसरातील स्वच्छता राखणाच्या कामी ‘जीएफआय’ने आंबेडकर नगरातील शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची नामी शक्कल शोधून काढली.

याकामी खास स्वच्छता कामगारांसाठी कोलकाता पोलिसांतर्फे स्वयंसेवी तत्त्वावर चालवण्यात येणार्‍या ‘नवदिशा’ या शाळेचे सहकार्य घेण्यात आले व त्याचा परिणाम पण दिसू लागला. गार्बेज फ्री इंडियाचे कार्यकर्ते ठरवून नवदिशा शाळेत जाऊन शालेय विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी आपले घर आणि परिसराची स्वच्छता कशी राखावी यासंदर्भात मार्गदर्शन करू लागले.

‘नवदिशा’ शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व आधिक आकर्षक व प्रभावीपणे सांगण्यासाठी ‘जीएफआय’चे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांना भिंतीवरील चित्र, व्यंगचित्रे, कचर्‍यातून निर्माण होणारी घाण, त्यातून उद्भवणारे आजार व दुष्परिणाम याची माहिती देण्याबरोबच याकामी शाळेतील विद्यार्थ्यांना आवर्जून सहभागी करून घेऊ लागले. त्यामुळे आंबेडकरनगरधील विद्यार्थ्यांमध्ये आपापल्या घराच्या स्वच्छतेबद्दल जागृती तर निर्माण झालीच, त्याशिवाय ते शाळेत जीएफआयतर्फे देण्यात येणार्‍या धड्यांचा घरी अवलंब करू लागले.

अशा प्रकारे आंबेडकरनगरच्या स्वच्छता कामगारांच्या घरातील रोजची व आवश्यक सफाई घरातील लहानगी मंडळी मोठ्या उत्साहाने व स्वयंपूर्णतनेच करू लागली. परिणामी शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वसाहतीतील स्वच्छता कर्मचार्‍यांना आपल्या स्वत:च्या घरची स्वच्छता राखण्यात मदत तर झालीच शिवाय परिसरातील वातावरण पर्यावरणामध्ये कायमस्वरूपी सुधारणा होण्याचा मोठा फायदा पण झाला.

मित्रांनो, तुमच्याच वयाच्या मुलांनी आपल्या परिसरात स्वत: काम करून बदल घडवून आणल्याची ही दोन उदाहरणे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि स्वच्छतेसाठी त्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तुमच्या आजूबाजूलाही कोणी असे काम करत असल्यास त्याची माहिती जरूर घ्या.

- दत्तात्रय आंबुलकर

[email protected]