भाषा शिक्षण

English भाषेशी ‘कौशल्यपूर्ण’ मैत्री!

कोणतीही भाषा ही महत्त्वाच्या चार कौशल्यांसह आत्मसात केली जाते. ही language skills म्हणजे – Listening, speaking, reading, writing आणि नंतर conversation (dialogue)

मातृभाषा शिकताना ही कौशल्य आपल्याला मुद्दाम शिकावी लागत नाहीत, तर ती आजूबाजूच्या वातावरणामुळे, ऐकण्यामुळे, अनुकरणामुळे आपोआप येत जातात. पण English ही परकीय भाषा शिकताना मुलांना लहानपणापासूनच घरी आणि शाळेत या Skills चा  सराव करावा लागतो.

केवळ English माध्यमामध्ये शिकण्यामुळे हे साध्य होणार नाही, तर त्यासाठी सराव केलाच पाहिजे. Listening Skill चांगलं असावं यासाठी सुधारित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात Stories, News, Items, Weather Reports, उतारे असे दिलेले आहेत. शिक्षकांनी योग्य आरोह-अवरोहांसह हे वाचून दाखवले किंवा English मधून instructions दिल्या की, विद्यार्थ्यांची Listening क्षमता किती आहे ते अजमावता येते. त्या वाचून दाखवलेल्या भागांवर छोटे छोटे प्रश्न विचारून विद्यार्थ्याला किती कळलं ती बातमी किंवा परिच्छेद कशाविषयी आहे. हे त्या विद्यार्थ्याला कळलं का हे आजमावता येतं. Listening Skill आणखी ‘विकसित करण्यासाठी English बातम्या ऐकणं, English गाणी किंवा लहान मुलांसाठी नर्सरी हाईम्स ऐकणं, हल्ली मोबाईलवरही शब्दांचे योग्य उच्चार ऐकण्यासाठी जी सोय आहे, त्याचा वापर करणं. त्यांमुळे श्रवण क्षमता वाढेल. क्रिकेटची कॉमेंट्री जेव्हा ऐकली जाते, तेव्हा त्यातला शब्द न शब्द कळतोच असं नाही; पण अंदाजाने समजतंच आपल्याला!

यानंतरच कौशल्य Speaking – भाषण कौशल्य English बोलता येणं, ही काळाची गरज आहे. पण केवळ एखाद्या Speaking Course मुळे हे विकसित होईलच असं नाही. त्याला सराव हवा. English बोलल्यावाचून पर्याय नाही, अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा English बोलता येतंच व्याकरण, वाक्यरचना, शब्दसंग्रह हे जरी आपल्याकडे असलं तरी गरज नाही, तोपर्यंत English बोलायला टाळाटाळ केली जाते.

हे Skill विकसित होण्यासाठी मुलांना वर्गात अशा Situations निर्माण करून दिल्या पाहिजेत. Englishच्या तासाला English मधूनच बोलणं, प्रतिक्रिया English मधूनच घेणं. Mannerism शिकवताना योग्य वेळी योग्य रचनेचा वापर करणं, उदा., Of Course, well, good Morning, Have a Nice Day, excuse me, pardon, ok अशी Exressions आणि शिष्टाचार दर्शक शब्द मुद्दाम वापरायला हवेत आणि शिकवायला हवेत. शिक्षकांनी, पालकांनी एक काळजी घ्यायला हवी की बोलताना चुकले तर अजिबात ना उमेद करता कामा नये. चुकलास तरी चालेल, बोल, English मधूनच उत्तर दे. असा धीर देणारा आग्रह केला पाहिजे. ज्याला बोलायचंय त्यानेही दडपण न घेता बेधडक बोलायला सुरुवात केली पाहिजे. पर्यायच नसेल तर बोलावं लागतंच ना! हळूहळू भीड चेपून आत्मविश्वास वाढतो आणि आपण English बोलू शकतो. English चांगल्या बोलल्यामुळे समोरच्यावर नक्कीच छाप पडते. भाषा वापरणं जास्त महत्त्वाचं आहे.

यानंतर English Reading. यात आपण नक्की मागे पडतो. कारण एकूणच आज वाचनाकडे कमी ओढा! मातृभाषेतलं वाचन कमी तिथे परकी भाषा कुठली वाचायला? विद्यार्थ्यांनी कमीत कमी त्यांच्या पाठ्यपुस्तकात दिलेले परिच्छेद गोष्टी, कविता उतारे घरी पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. English Newspapers मधल्या बातम्या वाचणे, पूर्ण बातमी नाही कळली तरी Headlines मधून विषय समजून घेणे, मुलांनी जाहिरातीचे बोर्ड्स, सूचनाफलक, छोट्या गोष्टींची पुस्तकं, मासिकं यातलं English वाचलं पाहिजे. आजच्या संगणकाच्या युगात संगणकाची  भाषा English आहे. तिचा सराव हळूहळू केला पाहिजे. यासाठी Dictionary चा वापर करावा. आज हाताशी सगळं काही उपलब्ध असताना Reading Skill विकसित करणं अवघड नाही!

Listenig, Speaking, Reading या तीनही कौशल्याचा परिपाक Writing म्हणजे लेखन कौशल्यात दिसतो. पुरेशी शब्दसंपती, आकलन, वाक्यरचना, व्याकरणाची जाणं, कल्पनाशक्ती, अभिव्यक्ती या सर्वांचा कस लेखनात लागतो. English लिहिताना मोठा धोका म्हणजे Spelling mistakes! पूर्वी घोकून घोकून शब्द पाठ केले जायचे पण बदलत्या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमात त्याची तेवढी गरज उरली नाही. योग्य प्रकारे शिकले व शिकवले तर शब्दाचे spelling चुकत नाही. असा विचार उदा., एकदा hall असे कळले की मग tall, mall, small आपोआप येते. अर्थात Doll हा त्यांचा अपवादही लक्षात घ्यावा लागतो. Vowel based शब्द, rhyming words, realated words यांचा भरपूर सराव पुस्तकांमध्ये दिलेला आहे. तो सराव वाढवत नेला पाहिजे. आपल्याला माहीत असलेल्या शब्दसंपत्तीचा वापर करून, मुद्देसूद लिखाण करणे, दिलेल्या विषयाला अनुसरून लिहिणे, वेगवेगळे शब्द, वाक्यप्रचार म्हणी यांचा वापर करणे हे सगळे खूप सरावाने जमेल. शिक्षक – पालकांनी मुलांकडून थोडा थोडा सराव करून घ्यावा. छोट्या वाक्याकडून मोठ्या वाक्यांकडे जायला मार्गदर्शन करावे. पत्रलेखन, कथालेखन, वर्णनात्मक, कल्पनात्मक लेखन-संवाद-लेखन यासाठी सराव केला पाहिजे.

या सर्व कौशल्यानंतर conversation म्हणजे संवादकौशल्य खूप महत्त्वाचे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या त्या भाषेत बोलता येणे महत्त्वाचे. यासाठी विविध Expression उदा., No Doubt, of course, well ok, see actually असे आज वापरले जाणारे अनेक शब्द उपयुक्त होतील. आपण chatting करताना हे करत असतो. आजच्या या तंत्रयुगात bold आणि confident मुलांची ही नवीन पिढी यात नक्कीच यशस्वी होईल. शिक्षक आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन असेल की काम फत्ते! चला होऊ या कौशल्याधिष्ठित!

इंग्लिश ही भाषा म्हणून शिकताना, या टिप्स नक्की वाचा. 

निबंध पाहावा लिहून!

- चारुता शरद प्रभुदेसाई

- [email protected]