इंडो-जापनीज कल्चरल असोसिएशनचं वार्षिक स्नेहसंमेलन

(नेहा आणि रश्मी शाळेत बरोबर शिकणाऱ्या मैत्रिणी. पेठे बाई संगीताच्या गुरू. )

रश्मी : अभिनंदन नेहा! गाण्याच्या स्पर्धेत काल तुझा पहिला नंबर आला ना? 

नेहा : हो...थॅंक्यू रश्मी. तू आली होतीस काल?

रश्मी : नाही गं, नेमका क्लास होता मला तेव्हा. पण तुझं गाणं खूप छान झालं असं कळलं होतं. तुला गायला खूप  आवडतं ना ?

नेहा :  हो गं, खूप आवडतं. अगदी लहानपणापासून.... 

रश्मी : मग तू गाणंपण शिकतेस का?

नेहा : लहानपणी नाही, पण चौथीपासून शिकतेय. 

रश्मी : तुला कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं?

नेहा : ऐकायला तर सर्व प्रकारचं संगीत आवडतं, पण आता मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतेय.

रश्मी : मी काही संगीत शिकलेली नाही, पण मलाही ऐकायला खूप आवडतं. माझी आई अभ्यासाशिवाय मला काहीच करू देत नाही. ए, मला तुझ्या गाण्याच्या बाईंना भेटायचंय एकदा. नेशील मला तुझ्या क्लासमध्ये?

नेहा : हो, नेईन की. उद्या सकाळी मी बाईंना हे बक्षीस दाखवायला जाणार आहे, तेव्हा येशील?

रश्मी : हो चालेल. उद्या तर शाळेला सुट्टीच आहे. मी येईन तुझ्याबरोबर.

नेहा : चल मग... भेटू उद्या....

                                                   ******************************

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकवताना

 

(पेठेबाईंचा क्लास चालू आहे. एका विद्यार्थीनीला बाई शिकवत आहेत.)

 राग बिभास बंदिश 

जागो जागो लाला रे । भोर भई उठी गोपाला रे ।

पंछी बनमें मधुर बोले । जमुना तीरे गोपी आये । 

भोर भई उठी गोपाला रे ।।

(क्लास चालू असताना, नेहा आणि रश्मी येऊन बसतात. गायन संपल्यावर..... )

नेहा : (बाईंना नमस्कार करते) बाई, शाळेतल्या स्पर्धेत मला हे बक्षीस मिळालं. (बक्षीस दाखवते.)

बाई : अरे वा! अभिनंदन नेहा!

नेहा : बाई, ही रश्मी. शाळेत माझ्या वर्गातच आहे. तिला गाणं ऐकायला खूप आवडतं. आज ती तुम्हाला भेटायला म्हणून आली आहे.

बाई : हो का? ..... छान छान ........

रश्मी : (बाईंना नमस्कार करते.) मगाशी तुम्ही गात होता, तसं शास्त्रीय संगीत मला ऐकायला खूप आवडतं, पण ते खूप कठीण असतं ना?

बाई : (हसून) नाही गं, शिकल्यानंतर काहीच कठीण नसतं. 

रश्मी : मग बाई कधी अाणि कसं शिकलेलं चांगलं?

बाई : वयाच्या ८-९व्या वर्षी शिकायला सुरुवात केलेली चांगली. सुरुवातीला नेहमीच सा रे ग म प ध नी असे सात स्वर शिकायचे असतात. कारण तेच संगीतातील ए बी सी डी असतात.

नेहा : आणि त्यासाठीच गुरूंच्या समोर बसून शिकणं चांगलं असतं. कारण त्यांनी गायलेले स्वर ऐकून, आपण त्याचं अनुकरण करायचं असतं. हो ना बाई?

बाई : हो ना. या गोष्टीला तर खूपच महत्त्व आहे. प्रत्येक संगीत पद्धतीमध्ये, हे स्वर जरी सारखेच असले, तरी ते स्वर लावण्याची पद्धत वेगळी असते. पाश्चात्य संगीत, कर्नाटक संगीत यांच्यापेक्षा हिंदुस्थानी संगीतात आवाज लावण्याची पद्धत खूप वेगळी असते.

नेहा : आणि दररोज शिकलेल्या गोष्टींचा सराव करावा लागतो.

बाई : हो, या रियाजाला खूप महत्त्व असतं. नुसतं माहीत झालं म्हणून चालत नाही, तर ते गळ्यातून येण्यासाठी रियाज हा हवाच.

रश्मी : वाद्य वाजवायला पण असंच शिकतात का?

बाई : हो तर.... संगीतातील गायन, वादन, नृत्य या तिन्ही कला अशा शास्त्रशुद्धरीतीनं शिकता येतात.

रश्मी : मग मला वाद्यवादन शिकायला आवडेल... सतार, गिटार...कोणतं सोपं असतं?

बाई : गायन काय किंवा कोणतंही वाद्यवादन काय, सर्वांमध्ये तेच स्वर वापरले जातात. आधी काही दिवस गाणं शिकलं की, मग आपल्याला हव्या त्या वाद्यावर ते वाजवायला शिकतां येतं.

शास्त्रीय संगीत सोप्या पद्धतीने शिकवताना

       कोणतंही गाणं हेच स्वरवापरून तयार होतं. तुम्हाला माहीत असलेली हॅपी बर्थ डेची ट्यून कशी तयार होते, ते सांगू का? मी स्वर म्हणते, तुम्ही त्या चालीवर शब्द म्हणा.... .

बाई : सा..........रे..........सा.........म.............ग.........       नेहा व रश्मी - हॅपी बर्थ डे टू यू

         सा........रे..........सा......प........म...........                                   हॅपी बर्थ डे टू यू

         सा.......सां..........ध.......म.......ग.......रे.                                     हॅपी बर्थ डे डिअर मम्मी

         नी्........ध.........म.........प..........म......                                      हॅपी बर्थ डे टू यू

 

    ( नंतर बाई हेच गीत, वेस्टर्न म्युझिकच्या स्टाईलने म्हणून दाखवतात. आवाज लावण्याची वेगळी पद्धत सर्वांना जाणवते. नेहा आणि रश्मी दोघी टाळ्या वाजवतात.)

नेहा : हळूहळू शिकल्यावर हे सा रे ग म सुद्धा आवडायला लागतं. बाईंनी देस राग शिकवल्यावर, "मी वन्दे मातरम्"सुद्धा शाळेत म्हंटलं होतं.

रश्मी : हे राग म्हणजे काय असतं?

बाई : अगं, एकदा का सर्व प्रकारचे स्वर माहीत झाले, की मग त्यांचे वेगवेगळे समूह बनवतात. प्रत्येकात वेगळेवेगळे स्वर घ्यायचे आणि तेवढेच स्वर वापरून गाणं तयार करायचं. मग खूप निरनिराळ्या चाली तयार होतात. या समूहांना राग म्हणतात.

नेहा : आणि एकेका रागाचा जितका सखोल अभ्यास आपण करू, तितका तो राग आपल्याला जास्त वेळ सादर करता येतो. आपल्या विचारांनी मांडता येतो. त्यात पाठांतर अजिबात नसतं.

बाई : म्हणूनच हिंदुस्थानी संगीतातील राग गायन किंवा वादन हे जगातील सर्व रसिकांना ऐकायला आवडतं. प्रत्येक रागाच्या सुरांमधून, निरनिराळ्या भावना व्यक्त करता येतात. राग ही कल्पना जगातल्या इतर कोणत्याच संगीतात नाही आहे. ते फक्त पाठ केलेल्या रचनाच गातात किंवा वाजवतात. त्यांना कंपोझिशन्स म्हणतात.

रश्मी : म्हणजे बाई, शाळेत एकाच वर्गातली मुलं, एकाच विषयावर आपल्या मनाने निबंध लिहितात. तेव्हा विषय एकच असला तरी प्रत्येकाचा निबंध वेगळा असतो, स्वत:चा असतो, तसंच ना?

बाई : वा रश्मी, तुला बरोब्बर कळलं रागसंगीताचं वैशिष्ट्य. या स्वरांच्या परिणांमकारक सादरीकरणामुळे, भाषेच्या पलीकडे जाऊन, संगीताचा आनंद घेतां येतो.

रश्मी : बाई, साधारण किती वर्षे शिकल्यावर, लोकांसमोर थोडं थोडं गाऊन दाखवता येतं?

बाई : नियमितपणे रियाज केला, तर चार-पाच वर्षं तरी लागतात. आता नेहाचंच बघ ना...तुला पण चार एक वर्षं झालीच असतील ना?

नेहा : हो बाई. चौथीत असल्यापासून येतेय मी. पण बाई, शिकूनही जमत नाही, असं होतं काहो कधी.        

बाई : नाही....नियमित अभ्यास केल्यानंतर येत नाही असं होत नाही, पण त्याच वेळी आपण गाणं ऐकायचीही सवय लावून धेतलेली चांगली. ऐकण्यामुळे आपली सादरीकरणाची समज नक्कीच वाढते. शास्रीयदृष्ट्या शिकलेलं, कलात्मकरित्या मांडणं हेही महत्त्वाचं असतं. 

नेहा : म्हणजेच शिकणं, त्याचा सराव करणं आणि निरनिराळ्या कलावंतांचं गायन-वादन ऐकणं, या सगळ्यातून आपण कलाकार म्हणून घडत जातो. बाई, मागे तुम्ही शिकवलेलं भैरवी रागातलं ते लोकप्रिय गीत.....

मिले सुर मेरा तुम्हारा....मला खूप आवडले होतं. आपण म्हणू या का?

बाई : हो..अवश्य....म्हणू या की...

         (बाई, नेहा आणि विद्यार्थीनी सगळे मिळून गाऊ लागतात. रश्मीही हळूहळू त्यांच्या सुरात सूर मिसळते.)

 

          मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा । 

          सुरकी नदियां हर दिशासे बहते, सागरमें मिले ।        

          बादलोंका रूप लेकर बरसे हलके हलके ।

          मिले सुर मेरा तु्म्हारा, तो सुर बने हमारा ।।

 

 - मधुवंती पेठे 

-[email protected]

(मी वेगवेगळ्या देशांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीत संगीत ॲानलाइन शिकवते. टोकियोमधल्या विद्यार्थ्याला शिकवताना मला असं लक्षांत आलं की, पाश्चात्य देशांमध्ये जशी आपल्या संगीताबद्दल आवड निर्माण झाली आहे; तशी चीन, जपानसारख्या पौर्वात्य देशांमध्ये आपल्या संगीताबद्दल साधी तोंडओळखही नाही. त्यांच्यावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव आहे आणि ती तोंडओळख करून देण्याची मला एक संधी मिळाली.

मी गेली चार वर्षे, व्याकरणशुद्ध पद्धतीने, जपानी भाषा शिकते आहे. मुंबईत दर वर्षी इंडो-जापनीज कल्चरल असोसिएशनतर्फे, जपानी भाषा शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं वार्षिक स्नेहसंमेलन होतं. पहिल्या वर्षी मी ते फक्त पाहायला गेले. दुसऱ्या वर्षी मी त्यासाठी एक छोटीशी एकांकिका जपानी भाषेत लिहिली आणि बसवून दिली. तिस ऱ्या वर्षी मात्र मी आपल्या हिंदुस्थानी शास्रीय संगीताची ओळख करून देणारी एकांकिका जापनीज भाषेत लिहिली, बसवली आणि त्यात भूमिकाही केली. जपानी भाषेत बोलून काम करण्याचा एक वेगळाच अनुभव मला मिळाला. त्यात मी रागदारी बंदिशींच गायले, हॅपी बर्थ डेची ट्यून कशी तयार होते ते गाउन दाखवले. शेवटी मिले सूर मेरा तुम्हारा कोरसमध्ये  गायलो. टोकियोच्या शाळेतून, तसेच काॅलेजमधून विद्यार्थी आले होते. दिल्लीहून जपानी काउन्सिलेटमधून आलेले अधिकारी होते. त्या सर्वांना मी जापनीजमधून करून दिलेली आपल्या संगीताची ओळख खूप आवडली. आता मी याच विषयांवरचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.

मी जापनीजमधून लिहिलेली ती एकांकिका आपल्या छोट्या दोस्तांसाठी मराठीतून इथे देत आहे. त्यांनाही ती सादर करावीशी वाटेल.)