शाळा सुरू झाल्यापासून हा सतत शाळेच्या आवाराच्या आसपास भटकत असायचा. शाळेच्या वेळेत तर मुलं वर्गात बसेपर्यंत त्यांच्यात घुटमाळायचा. या मुलांपैकी कुणाचा नातेवाईक असेल म्हणून आम्हीही फार लक्ष दिले नाही. पण दिवसेंदिवस त्याचे घुटमळणं वाढत होतं. आम्हां शिक्षकांच्या हे लक्षात आलच होतं. काहीतरी निमित्त काढून तो आमच्यापैकी कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करी. पण मनातील गोष्ट सांगावी कशी? कदाचित हा प्रश्न त्याला सतावत असावा. शाळेत आमची पाऊले पडल्यावर त्याची नजर आमच्यावर रोखलेली असे. त्याच्या अपेक्षापूर्वक नजरेतून चेहऱ्यावर उतरलेले भाव सर्व काही सांगून जात होते. शेवटी त्याने मनाचा निर्धार केला असावा आणि तो चक्क सरांसमोर...... येऊन उभा राहिला. ‘मला बी शाळंत घ्या ना....’ त्याची ओढ पाहून सरांनी त्याला शाळेत बसण्याची परवानगी दिली. तसा तो वर्गात आला. बरं, या नवीन पाहुण्याचे म्हणजे विद्यार्थ्याचे वय १८ च्या आसपास असावे. एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाला वर्गात एकदम प्रवेश तारी कसा द्यायचा, हा विचार केला गेला. किमान काही दिवस याची वर्तवणूक पाहावी आणि त्याच्याविषयी निर्णय घ्यावा असे ठरले.

आठवडा उलटून गेला तरी या मुलाच्या वर्तवणुकीत काही वावगं आढळलं नाही. या पठ्ठ्याने आमची शंका खोटी ठरवली. जिद्दीची, आत्मविश्वाची, अतीव तळमळीची ‘ती नजर’ असणारा १८ वर्षाचा मोहन प्रभु काळे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा मोहन सातवी नंतर परिस्थितीमुळे शाळेत जाता आले नाही म्हणून हताश झालेला. कुटुंबासाठी सिग्नलवर व्यवसाय करत होता. पण त्याची जिद्द आम्हां शिक्षकांना त्याच्यासाठी काहीतरी करायला भाग  पाडत होती. सिग्नल शाळेतला वय वर्ष १८ असलेला अपवादात्मक मुलगा. शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अट नाही हे सिद्ध करणारा (शिक्षण हक्क कायदा सिद्ध करणारा या अर्थाने) सिग्नल शाळा चालू झाल्यापासून न चुकता तो वेळेत शाळेत येतो.

मोहनची अभ्यासातील हुशारी थोड्याच दिवसात शिक्षकांच्या लक्षात आली. शिक्षणात खंड पडूनही त्याचा शैक्षणिक बाज गेला नव्हता. शैक्षणिक पाया पक्का झाला तर तो दहावी उत्तीर्ण होईल या निष्कर्षापर्यत शिक्षक आले. बसवावे असे ठरले. त्यानुसार मोहनचा अभ्यास सुरु झाला. नित्यनियमाने मोहनची शिकवणी मोहन शाळेत चालू आहे. एकदा खंड पडला तो पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे. ब्रिजखालून पोलिसांनी हटल्यावर आठवडाभर मोहन दिसलाच नाही. वाटले, मोहन हा विषय बंद. पण त्याच्या डोक्यातल्या विचारांनी कदाचित त्याला स्वस्थ बसू दिलं नसणार. सातव्या दिवशी पुन्हा मोहन शाळेत हजर. इथून पुढे असे गैरहजर राहणार नाही, असा त्याचा केविलवाणा चेहरा सांगतच होता. तशी त्याची शाळा जोमात सुरु झाली.

सांगायचा मुद्दा असा कितीही प्रतीकूल परिस्थिती असली तरी आंब्याच्या झाडाला कणसं येत नाहीत. तस काहीसे तरी मोहनच्या बाबतीत जाणवते. आपल तुटलेलं तगंड सांभाळत सराईत अभिनेत्यासारखा मोहनचा बाप सिग्नलवर ‘मागायचा धंदा’ करतो. मोहन मात्र त्या जगामध्ये कुठेच घट्ट बसत नाही. त्याच्या वागण्या-बोलण्यात एक स्वच्छ, निर्मळपणा जाणवतो. वर्षानुवर्षे पुलाखाली राहून देखील त्याने कधी लोकांसमोर हात पसरले नाहीत. तो हमखास काखेला दोन-चार वह्या-पुस्तकं गुंडाळून सिग्नलच्या भोवताली निरव शातंता असताना शाळेच्या कंटनेरमध्ये उशिरापर्यंत अभ्यास करताना दिसतो. रात्री-अपरात्री शाळेच्या कंटेनरच्या बाजूने जाताना आतील लाईट चालू दिसली की हमखास समजावं मोहन तिथे सरस्वतीची आराधना करत आहे. त्याला कळत किंवा त्याला नेमक कळल आहे की दिवस कधी बदलत नसतात. ते बदलावे लागतात. पुलाखाली आपल्या बापाने ३५ वर्ष भीख मागितली. भीखेचा हा पैसा ना त्याच्या परिवाराला दोन वेळचं जेवण देऊ शकला, ना मान-प्रतिष्ठा पदरात पडली. आयुष्यात ही सगळी नकारात्मकता पुसून टाकण्यासाठी सिग्नल शाळा हा एकमात्र पर्याय आहे. अस त्याला जाणवलं तेव्हा मोहन इतके दिवस शाळेभोवती का घुटमळत होता हे समजले.

पुलाखालच्या दैववादाच्या रुढीपरंपरांविषयी, समाजाविषयी राग, मत्सर, लोभ अशा संमिश्र भावना घेऊन वावरणाऱ्या मोहनने आज जिद्दीने, चिकाटीने संगणकीय परीक्षा उत्तीर्ण केली. लहानग्यांच्या शाळेत स्वत:च्या ‘हसू’पणाची नाही तर भविष्याची पर्वा करत मनाने तो आज शाळेत शिक्षण घेत आहे. भूतकाळाला मागे सारत वर्तमानातून आज मोहन शिक्षणाने स्वत:चा भविष्यकाळ आत्मविश्वासाने रेखाटत आहे याबद्दल आम्हां शिक्षकांना खात्री पटली आहे. 

- आरती परब 

[email protected]