हे जोडशब्द पाहा आणि अजून जोडशब्द आठवण्याचा प्रयत्न करा

 

मित्र-मैत्रिणींनो, आज आपल्याला सहलीला जायचंय. पण ही सहल जरा आगळीवेगळी आहे बरं. आपल्याला जायचंय, शब्दांच्या गावाला. या गावाला जाताना आपल्याला शब्दांशी मैत्री करायची आहे. आपण शाळेत शिकतो की, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे 'बोलणं' हीसुद्धा माणसाची गरज आहे. रोज आपण आई-बाबा, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी, शेजारी असं कितीतरी जणांशी बोलत असतो. कधी गोड बोलतो, कधी रागावून, कधी हसत; तर कधी उद्धटपणे बोलतो आणि हे विविध प्रकारचं बोलणं होतं, अर्थातच शब्दांच्या साथीनं. आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या असंख्य शब्दांचं मन ओळखायचा प्रयत्न, आपण या सहलीत करणार आहोत. तेव्हा सगळेजण तयार?
शब्दांचे पण स्वभाव आणि प्रकार असतात बरं का. आधी प्रकारांबद्दल बोलू या. वरच्या परिच्छेदात मी दोन जोडशब्द वापरले आहेत. वाचा बरं पुन्हा एकदा. बरोबर ओळखलंत. आगळीवेगळी आणि अवतीभवती. असे अनेक जोडशब्द आपल्या भाषेत आहेत. उदाहरणं, द्यायची तर, ओबडधोबड, अक्राळविक्राळ, भाजीपाला, पैपाहुणे, चहापाणी इ. आता आपल्याला या जोडशब्दांची यादी करायची आहे.  ही सूची आपण बाराखडीप्रमाणे केली तर सोपे जाईल. बाराखडीप्रमाणे जोडशब्दांची सूची, हा एक प्रकारचा शब्दखेळच.
 जसे जोडशब्द असतात, तसे इतिहास घडवणारे शब्द असतात. हे शब्द आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळतात. उदा., 'जय भवानी, जय शिवाजी ', 'हर हर महादेव', 'चले जाव'.   इतिहास घडवणाऱ्या या शब्दांची पण यादी आपल्याला करायची आहे. करणार ना?
तुम्ही वर्तमानपत्रं वाचत असालच किंवा आई-बाबांबरोबर बातम्या नक्की पाहत असाल. राजकारणासंबंधी शब्द सांगायचे झाले तर, मंत्रालय, विधानसभा, विधानपरिषद, अर्थसंकल्प, निवडणूक इ.. आता उद्यापासून वर्तमानपत्रातील राजकीय शब्द नक्की शोधा आणि लिहून ठेवा.
     
काही शब्द द्विरुक्ती करणारे असतात. शाळेची स्कूलबस, 
खाली अंडरलाईन कर, केसांची हेअरस्टाईल, इ. असे शब्द पण तुम्हाला खूप मिळतील, तेसुद्धा लिहून ठेवा.
 काही शब्द अतिशयोक्तीचे असतात. जसं आई म्हणते ना, "हजारवेळा सांगितलंय तुला, पण तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही."  'हजारवेळा सांगितलंय', हे शब्द अतिशयोक्तीचे आहेत की नाही?
काही शब्द असभ्य असतात. टाळकं, तंगड्या, थोबाड, हे असभ्य शब्द. असे शब्द वापरायचे नाहीत बरं. पण त्यांची यादी करायला हरकत नाही.
शब्दांचे जसे प्रकार असतात ना, तसेच शब्दांचे स्वभावसुद्धा असतात, शब्दांना व्यक्तिमत्व पण असतं. बघा हं, 'आई गं' या शब्दात वेदना आहे ना? 'बाप रे ' या शब्दात भीती दडलेली आहे . 'शाब्बास!' असं कुणी म्हटलं की कौतुक जाणवतं. धडामधूम, वळवळ, टपोरा, भिकार, बुळबुळीत, गुळगुळीत, वात्रट, रिमझिम, धावपळ, दणदणीत, गुटगुटीत, ऐदी, असे असंख्य शब्द, आपल्यापुढे चित्रं उभं करतात. आता 'ढ' म्हटल्यावर, वर्गातील 'माठ' मुलगा आठवतो ना? अर्थात थंडगार पाण्याचाही माठ असतो आणि माठाची भाजी पण असते, तर अशी आहे शब्दांची गंमत. 
आपण मोबाईलमधले गेम खेळतो ना, तसेच हे शब्दखेळ. तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर या शब्दप्रकारांबद्दल गप्पा मारा. अनेक जोडशब्द, इतिहास घडवणारे शब्द, राजकीय शब्द, द्विरुक्त शब्द, अतिशयोक्तीचे शब्द, असभ्य शब्द , तुम्हाला नक्की सापडतील. शोधलं की सापडतंच, हो ना? इतर शब्दप्रकारही शोधा.शब्दांचे स्वभाव पण ओळखा.
 विद्यार्थी, पालक, शिक्षक, वाचक, सगळ्यांकडून शब्दांच्या विविध प्रकारांबद्दल, स्वभावाबद्दल, जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.
शब्दांच्या या प्रवासातील, हे होतं पहिलं स्टेशन अर्थात स्थानक. पुढच्या स्थानकावर भेटू पुढील लेखात.

- दीपाली केळकर
[email protected]