दिनेश जाक्कर शिक्षण विवेक तर्फे युवा शिक्षक पुरस्कार स्वीकारताना

शिक्षकाचे नाव : दिनेश काशिनाथ जाक्कर  (मुख्याध्यापक)

शिक्षण : बी.ए., डी.एड.

शाळेचे नाव : जि.प. आदर्श शाळा कोतळूक, कावणकरवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी.

 

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतळूक गावातल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश काशिनाथ जाक्कर हे शिक्षणाबरोबरीनेच सामाजिक कामातही अग्रेसर आहेत. शाळेतले विद्यार्थी आणि त्यांच्याशी जोडलेला समाज त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. शाळेसाठी, विद्यार्थ्यासाठी पायाभूत काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच त्यांच्या शाळेचा निकाल १०० टक्के आहे, विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्याना यश मिळत आहे. शाळेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून ३,५०,००० रु. जमा झाले. या निधीचा वापर त्यांनी शाळेसाठी सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी केला. तसेच विद्यार्थ्यांसाठी संगणक, बेंचेस, कपाटे इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या. जि.प. आदर्श शाळा कोतळूक या शाळेला शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात दिनेश जाक्कर यांनी उत्तम प्रयत्न केले. शालेय विकास प्रकल्पातही या शाळेचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आहे.

प्राथमिक शाळांमध्ये अनेक शिक्षकांकडे जोडवर्ग असतो. एका वर्गाला अध्यापन करत असताना दुसऱ्या वर्गाला गुंतवून ठेवण्यासाठी दिनेश जाक्कर यांनी विविध उपक्रम राबवले. त्यापैकी ‘जादूचा चौरस’ हा विद्यार्थ्यांच्या आवडीचा उपक्रम आहे. शाळेच्या सभागृहातील जादूच्या चौरसात गणित, मराठी, इंग्लिश, परिसर अभ्यास अशा सर्व विषयांचे स्वयंअध्ययन होते. पाढे, बेरजा, वजाबाक्या, अंकांची स्थानिक किंमत याबरोबरच इतरही विषय शिकले जातात. प्रश्नांची व शब्दांची सापशिडी हा विद्यार्थ्यांचा आवडता खेळ आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी कृतीशील बनले. त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा विकास झाला. खेळाच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने अभ्यास होऊ लागला.

विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्य नाते अधिक दृढ करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिनेश जाक्कर झटत आहेत. आजच्या संगणक युगात विद्यार्थी अग्रेसर राहावेत, त्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून लोकसहभागातून शाळा डीजिटल करून घेतली. आज सर्व पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे असताना स्वतःच्या मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून एक वेगळाच आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला.

दिनेश जाक्कर यांनी मनोरंजनासह कृतीशील शिक्षणावरही भर दिला आहे. त्याव्यतिरिक्त मुलांच्या विविध गुणांना वाव देणे, त्यांना शेती; अन्नप्रक्रिया; बंधारा बांधणे अशा समाजपयोगी कामात सहभागी करून घेणे, ग्रामस्थांना शालेय आणि सामाजिक उपक्रमात भाग घ्यायला उद्दयुक्त करणे अशा अनेक कामांमध्ये दिनेश जाक्कर सतत मग्न असतात. शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट काम करतानाच पल्स पोलिओ, साक्षरता अभियान, कुटुंब कल्याण केसेस, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, ग्राम स्वच्छता अभियान, चावडीवाचन आदी कामांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी शाळेत अल्पबचत योजना सुरु केली.

जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्गम भागात असल्यामुळे तेथे शाळेसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा नसते, त्यामुळे हे विद्यार्थी विज्ञानाच्या प्रयोगापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांकरिता वीस शाळांमध्ये बाराशे विद्यार्थ्यांसाठी फिरती प्रयोगशाळा हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाचे प्रमुख म्हणून दिनेश जाक्कर काम पाहतात.

या उपक्रमशील मुख्याध्यापकांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कामासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार व ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर विविध संस्थांनी त्यांच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय असे पंधरा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

 - रुपाली सुरनिस 

[email protected]