निळ्या भुऱ्या चेहऱ्यातला तो दुय्यम म्हणून मागे राहिला नाही ते त्याच्या स्व च्या मानण्यामुळे

सन २०८६  स्थळ जिओ - ७ :

'जिओ- ७' हे ठिकाणचं नाव आहे?

हो तर! पृथ्वीवर असलेल्या १५ सेक्टर्सपैकी सातवा सेक्टर आहे तो.

नंतर चंद्रावरचे ९ सेक्टर्स - नील१ ते नील९.

नील??'

हो, चंद्रावर पाय ठेवणाऱ्या पहिल्या मानवाचं नाव आहे ना ते - नील आर्मस्ट्राँग! म्हणून नील१ ते नील९.

आणि पुढे लाल ग्रहावरचे १२ सेक्टर्स - मंगल१ ते मंगल१२.

त्यांना "मंगल" नाव मिळालं, कारण पहिल्याच प्रयत्नात या लाल ग्रहाची मोहीम यशस्वी करणाऱ्या पूर्वीच्या भारत नावाच्या देशात या लाल ग्रहाला "मंगळ" हेच नाव होतं!

सन २०६० मध्येच पृथ्वीवरच्या युद्धखोर नेत्यांना नेस्तनाबूत करून जाणत्याविद्वान लोकांनी ही व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे देशत्यांच्या सीमांसाठी होणारी युद्धेरक्तपातमनुष्यहानी आणि त्यासाठी होणारा अवाढव्य खर्च हे सारे बंद झाले. पृथ्वीचंद्र आणि मंगळ या तिन्ही मानवी वस्तीच्या ठिकाणी सेक्टर व्यवस्था सुरू झाली. प्रत्येक सेक्टरमध्ये विशिष्ट संख्येनेच मुले जन्माला घालायची परवानगी होती. त्यामुळे सगळीकडे योग्य लोकसंख्या होती. कुठेही निसर्ग ओरबाडून माणसे राहात नव्हती.

शिवाय आणखी एक मोठा बदल म्हणजे मानवाने जेनेटिक इंजिनीअरिंग क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. त्यामुळे माणसे भरपूर आणि सुदृढ आयुष्य जगत होती. खराब झालेले अवयव काढून टाकण्यात येत आणि नवे बसवले जात. निरोगी टिश्यू डीएनए आणि जिन्स घेऊन नवे चांगले अवयव 3D प्रिंट केले जात!

तसंच सुंदरसुदृढ आणि हुशार मुले सगळ्यांना होत असत.

ती कशी?

आपल्याला हवे ते १२ गुण आपल्या होणाऱ्या बाळासाठी निवडण्याचा आई-बाबांना चॉईस मिळत असे. म्हणजे प्रेमळधाडसी अशा काही गुणांपैकी एक निवडायचा. मग चित्रकलागायननृत्यअभिनय अशापैकी एक गुण निवडायचा. तसंच कोणकोणत्या भाषा बाळाला यायला हव्यात हेही निवडायचं. बाळ दिसायला कसं असावं याचेही खूप पर्याय! म्हणजे तुम्हीच तुमचं मूल डिझाईन करा. उंची ६ ते ७ फुटाच्या मधली कितीही निवडा. गोरा/पिवळसर/काळा/सावळा रंगकाळे/निळे/भुरे/हिरवे डोळेकाळे/ सोनेरी अन सरळ किंवा कुरळे केस असे इतरही अनेक पर्याय होते. केस आणि डोळे लालगुलाबीनिळे किंवा हिरवे वगैरे रंगाचे हवे असतील तर थोडे जास्त पैसे भरून तीही सोय व्हायची.

मात्र क्वचित प्रसंगी असं व्हायचं कीपालकांनी निवडलेल्या गुणांचं आणि शारीरिक घटकांचं कॉम्बिनेशन नीट होत नसे. बाळ तयार होताना हवे ते घटक हव्या त्या प्रमाणात येत नसत. मग ही मुलं थोडी कमी उंचीची असायची. या मुलांपैकी काहींना गणित तर काहींना भाषा शिकणे अवघड जायचे.  कुणाचा एक डोळा  निळा  अन भुरा असायचा , तर काहींच्या पायांमध्ये थोडं व्यंग असायचं. जिन्स मध्ये काही गडबड होऊन ही मुलं व्यंग घेऊन जन्माला येत !  या मुलांना "दुय्यम नागरिक" म्हंटले जात असे.

मग अशा "दुय्यम" मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवले जाई. त्यांच्या शाळाही वेगळ्या असायच्या. या मुलांना दुय्यम प्रतीची कामे शिकवली जात. खरं तर शारीरिक व्यंग असले तरी अनेक दुय्यम माणसे अतिशय बुद्धिमान असायची, पण त्यांना बुद्धीची कसोटी पाहणारी कामे कधीच करायला मिळत नसत. काही लोकांचा तर जागतिक कौन्सिलकडे असा आग्रह चालू होता की, दुय्यम लोकांना चंद्रावर एक वसाहत देऊन तिथेच राहण्याची सक्ती करावी! अर्थात याला पाठिंबा देणारे फार थोडे लोक होते हे खरं! पण त्यामुळे ही माणसे आपल्यापेक्षा कमी प्रतीची आहेत, असा गैरसमज नॉर्मल माणसांमध्ये विनाकारण तयार होत असे.

अरिहंत असाच "दुय्यम नागरिक" म्हणून जन्माला आलेला मुलगा होता. त्याला हा भेद पटत नव्हता. केवळ आपले शरीर नॉर्मल मुलांसारखे देखणे नाही किंवा आपल्यातले काही जण हुशार नाहीत, म्हणून आपण अगदी 'टाकाऊ वस्तूआहोत हे त्याला पटत नसे. शाळेत असल्यापासून मन अस्वस्थ झालं की, तो नेहेमीच आपलं गणिताचं पुस्तक काढून गणिते सोडवत बसे. गणितात त्याच्या इतका हुशार मुलगा क्वचितच बघायला मिळतो, असं सगळे शिक्षक मान्य करायचे. योर्मा हा त्याचा चांगला मित्र होता. योर्मा मात्र नॉर्मल मुलगा म्हणून जन्माला आलेला असल्याने वेगळ्या शाळेत शिकला होता. पण त्यांची मैत्री कायम होती. त्यालादेखील वेगाने गणितेभूमितीसमीकरणे सोडविणाऱ्या अन आलेखांचे अचूक विश्लेषण करणाऱ्या आपल्या या मित्राचं फार कौतुक होतं. अरिहंतला आजूबाजूला आपल्यासारखी मानाची वागणूक मिळत नाहीयाचे त्यालाही वाईट वाटत असे. त्याने अरिहंतला कधीच कमी प्रतीचा मानले नव्हते.

आता तरुण झालेले योर्मा आणि अरिहंत आपापल्या नोकरीत गुंतले होते. योर्मा पृथ्वीवरून चंद्रावर अन्नधान्य पाठवण्याऱ्या 'फूड व्हेईकल'साठी काम करत होता. हे स्पेस शटल ठराविक काळाने अन्नधान्य घेऊन चंद्रावर जाऊन परत येत असे. त्याचे पूर्ण काम कॉम्प्युटर्स आणि रोबोट्स करत. माणसांनी केवळ देखरेख करायची! योगायोगाने अरिहंतची ड्युटीदेखील सध्या याच डिपार्टमेंटला होती. त्याला फूड व्हेईकल सेंटरच्या सफाईवर देखरेख करायचं काम मिळालं होतं. योर्माला हे पाहून कित्येकदा खूप वाईट वाटायचं. अरिहंतची योग्यता याहून कितीतरी जास्त आहे हे त्याला नेहमी जाणवत असे. पण अरिहंत सतत हसतमुखाने काम करतो हे पाहून काही म्हणायचं तो टाळत होता.

'फूड व्हेईकल'च्या उड्डाणाची नेहेमीची तयारी सुरू झाली होती. योर्मा सगळं एकदा डोळ्याखालून घालत होता. अचानक त्याला स्क्रीनवर काही लाल अक्षरे दिसू लागली. ती वॉर्निंग होती. त्याने ती वाचली. तो थोडासा चक्रावला! ती वॉर्निंग सांगत होती कीहे स्पेस शटल चंद्रावर जिथे नेहेमी उतरते तिथे उतरू शकणार नाही तर ते थोड्या लांबच्या ठिकाणी लँड होईल! आणि तिथे लँड होणे धोक्याचे आहे, कारण आजूबाजूला विवरे आहेत. याचे कारण योर्माला काही लक्षात येईना. यापूर्वी असं कधीच झालं होतं का याची त्याने बरीच शोधाशोध करून पाहिली. पण फारसा काही उपयोग होत  नव्हता. शटलचे उड्डाण तो रद्द करू शकत नव्हता. त्याच्याकडे तो अधिकार नव्हता. शिवाय इतर अनेक उड्डाणे लाँच शेड्युलमध्ये दिसत होती. इतक्यात वॉर्निंग मेसेजेस प्राप्त झाल्याने त्यांच्याबरोबरचे सगळे तंत्रज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी पटापट लाँच कंट्रोल रूममध्ये जमले. या प्रश्नाचे नक्की कारण आणि उत्तर दोन्हीवर चर्चा सुरू झाली. लाँचला केवळ २० तास उरले होते.

दुसरीकडे सफाईवर देखरेख करणाऱ्या अरिहंतला मुख्य सेंटरवर काहीतरी गडबड उडाली आहे हे समजले. आपल्या मित्राच्याच विभागात गडबड आहे हे कळल्यावर तो तिकडे निघाला. बंद काचेतून त्याला चिंतित झालेले सगळे लोक दिसले. कंट्रोलरूममध्ये त्याला प्रवेश नव्हता. मात्र आतले भिंतभर उंचीचे मोठमोठे स्क्रीन्स तो पाहू शकत होता. फूड शटलची नेहेमीची ट्रॅजेक्टरी त्याला दिसली. गेले अनेक महिने ती नेहमी पाहून त्याला पाठ झालेली होती. स्पेस शटलची अपेक्षित ट्रॅजेक्टरी मोठ्या स्क्रीनवर नेहमी झळकत असे. शटलचे उड्डाण कुठून होणार आहे आणि ते चंद्रावर जाऊन कुठे उतरणार आहे याचे तपशील दाखवलेले असत. ही ट्रॅजेक्टरी जर अपेक्षेप्रमाणे उमटली नाही तर शटल भलतीकडेच जाऊ शकते. अरिहंतच्या गणिती मेंदूने नेहेमीच्या आणि आताच्या ग्राफमध्ये फरक पडला आहे, हे लगेच ओळखले. त्याने आपल्या मनगटावरच्या स्मार्ट बँडला सांगितलं, "योर्माला मी बोलावलं आहे हे सांग".

आत योर्माला अरिहंतचा निरोप पाहून नवल वाटलं. "आधीच इथे प्रश्न निर्माण झालेत आणि अरिहंतला या वेळी काय बोलायचं असेल?" असा विचार करत तो दाराबाहेर उभ्या असलेल्या अरिहंतकडे आला. अधीरपणे उभ्या असलेल्या अरिहंतने पटकन विचारले,

 "योशटल ट्रॅजेक्टरी नॉर्मल नाही ना?" 

योर्मा चमकला.

"तुला कसं समजलंआता आम्ही सगळे त्याच चिंतेत पडलो आहोत..."

"मला माहीत आहे ते. म्हणूनच मी तुला बाहेर बोलवलं. मी तुला मदत करू शकतो..."

तूती कशी?"

मग अरिहंतने योर्माला काय चुकतेय ते सांगितले. दर वर्षी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर अगदी किंचित वाढते - काही सेंटीमीटर. मात्र काही वर्षे लोटली की, एकूण फरक मोठा असू शकतो. दर वर्षी अंतराचे करेक्शन न केल्याने आता ट्रॅजेक्टरीमध्ये मोठा फरक होत होता. म्हणूनच शटलचे लँडिंग हवे तिथे न होता लांबवर होणार होते. ते टाळण्यासाठी ट्रॅजेक्टरीमध्ये करेक्शन आवश्यक होते.

हे ऐकून योर्मा म्हणाला, "अरितू भन्नाटच आहेस रे! पण लाँच थांबवणं खूप त्रासदायक ठरू शकेल. हे करेक्शन करण्यासाठी मोठी आकडेमोड लागेल. इतका वेळ आणि ट्रॅजेक्टरी मास्टर कमी वेळात कसा मिळवू?"

"मी मदत करतो... यासाठी लागणारी समीकरणे मी बनवून देतो. तू ती तुमच्या कॉम्प्युटर्सकडून सोडवून घे." अरिहंत म्हणाला.

योर्माने सगळी परिस्थिती इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगितली. अरिहंतला परवानगी देण्यात आली. त्याने पटापट इक्वेशन्स मांडली. नक्की कुठे करेक्शन करायचे आहे हे मुख्य इंजिनिअर्सना समजावून दिले. एकदा ते कळल्यावर माणसे आणि मशिन्स असे सगळेच उत्साहाने कामाला लागले. थोड्याच वेळात सगळे व्हेरिफाय होऊन दुरुस्त केलेली ट्रॅजेक्टरी स्क्रीन्सवर झळकली. वरिष्ठांकडून मान्यता मिळाली आणि शटल उड्डाणाला तयार झाले. सुमारे १५ तास अथक काम करून झाल्यावर अखेर शटल योग्य मार्गाने निघालेले सगळ्या टीमने पाहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला!

****

नंतर शांतपणे कॉफी घेत असताना योर्माने अरिहंतला म्हंटलं, "अरितू होतास म्हणून आज हे शक्य झालं. तुझी योग्यता खूप जास्त आहे रे !”

अरिहंतला गंमत वाटली. तो उत्तरला"योमला माझ्या कामाची सवय झाली आहे! कोणतंच काम कमी नाही असं मी मानतो. आम्ही दुय्यम मुलं शाळेपासूनच स्वतःला कमी समजायला लागतो. आपण विचित्र आहोतनॉर्मल नाही असं वाटायला लागतं. खरं तर सगळ्यांच्या पालकांनी चॉईस दिलेले असतात. पण जिन्समध्ये काहीतरी गडबड होते आणि आमच्यासारखी वेगळी दिसणारी मुलं जन्माला येतात. पण आमच्यापैकी बहुतेकजण तुमच्याइतकेच हुशारप्रेमळ आणि मनमिळाऊ असतात…

त्यांचं बोलणं चालू असतांनाच योर्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अनेक जण कॉफीटेबल भोवती पोचले. अरिहंतचं बोलणं त्यांच्या कानावर गेलंच होतं. त्यातल्या वयस्क चीफ इंजिनीअर सायरा जोन्स अरिहंतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत म्हणाल्या, "अरिहंततुझं खरं आहे. पण हा फरक किती चुकीचा आहे हे आज सगळ्या जगाने पाहिलं. मला खात्री आहे कीमाणसांमध्ये भेद करणारी आपली चुकीची धोरणं आता नक्की बदलतील. आपण पृथ्वीचंद्र आणि मंगळातलं अंतर पार केलं आहे, पण माणसातलं अंतर अजून पार व्हायचं आहे!  मी तुला लाँच सेंटरच्या टेक्निकल टीममध्ये आमंत्रण देतेय. तुला काही कोर्सेस पूर्ण करून या टीमचा भाग होता येईल. आवडेल तुला?”

हे सगळं ऐकून योर्माने आपल्या आश्चर्यचकित झालेल्या जिवलग मित्राला आनंदाने मिठीच मारली आणि कॉफी लाउंज टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला!

 

-अपर्णा जोशी

[email protected]

(लेखिका संगणकतज्ज्ञ आणि खगोल अभ्यासक आहेत.)