पाल्यांसह खरेदी करताना सजगता निर्माण करणं
‘पालकत्व आणि समाज ’या लेखात आपण समाजाने नव पालकांसाठी सपोर्टिव्ह असायला हवं, असा आशावादी समारोप केला होता. मुलांच्या विविध संवेदना विकसित करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी सहज करता येतील ते आजच्या लेखात पाहू. या ठिकाणी नोंदवलेल्या बऱ्याच गोष्टी या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत.
आमच्या अनुभवातून कल्पकतेने नवनवे प्रयोग करणाऱ्या आई-बाबांना प्रेरणा मिळावी, काही नवं सुचत राहावं, हीच या लेखना मागची  प्रेरणा.    
 
 तान्ह्या बाळाच्या स्वागतासाठी आपले नातेवाईक, मित्रमंडळी विविध भेटवस्तू घेऊन येतात. या भेटवस्तूंच्या चकचकीत, रंगीत,आकर्षक वेष्टण कागदांचे विविध डिझाईनचे पुंजके बांधून बाळाच्या नजरेसमोर आम्ही बांधून ठेवत असू. बाळ या गडद, भडक रंगांकडे त्यांच्या होणाऱ्या फडफडीकडे, हालचालीकडे पाहून खुदकन् हसत असे. इथे त्याच्या रंग, नाद या संवेदनांसाठी नकळत वातावरण तयार होत असे. आपली दैनंदिन कामं करत असताना सतत बाळाशी संवाद सहज शक्य आहे. 
 
आम्ही सात महिन्यांच्या आमच्या बाळाला कांगारू बॅगेत ठेवून ‘अपना बाजार’सारख्या मोठ्या डिपार्टमेंट स्टोरमध्ये महिन्याचे सामान आणण्यासाठी जात असू. तिथल्या स्टाफलाही याचे भारी कौतुक वाटत असे. तूरडाळ, मसूरडाळ, मूगडाळ इ.वाणसामान त्याला दाखवत-बोलत खरेदी करत असू. पुढे त्याला नर्सरीमध्ये असताना फिल्ड ट्रिपसाठी शाळेतून एका मोठ्या डिपार्टमेंट स्टोरमध्ये नेले होते. तिथे वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याच्या टिचरना तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ अचूक ओळखून दाखवल्या. हा किस्सा त्याच्या नर्सरीच्या शिक्षिका फार कौतुकाने सांगत होत्या. पुढेही हा दैनंदिन कामांसोबतचा संवाद त्याला त्याच्या औपचारिक शिक्षणास आनंददायी करणारे अनेक अनुभव देण्यास साहाय्यक ठरत होता हे आमच्या लक्षात आले. 
 
‘डू नॉट अंडररेस्टिमेट पावर ऑफ अ टॉडलर’, असे एका प्रसिद्ध सिनेमाच्या डायलॉगमध्ये थोडा फेरफार करून म्हणता येईल. मध्यंतरी व्हॉटस् ॲपवर प. वसंतराव देशपांडेंची नात, राहुल देशपांडेंची जेमतेम अठरा महिन्यांची मुलगी शास्त्रीय संगीतातील रागाचा रियाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘दिड वर्षाच्या बाळाला शास्त्रीय रागातलं काय कळतयं !’ असा विचार न करता आपल्या ज्ञानाचे, कलेचे बीज लहान वयातच आपल्या पुढच्या पिढीत रुजवण्याचा संस्कार खूपच महत्त्वाचा वाटतो. लहान मुलांना काय कळतंय असं म्हणून आपण त्यांना वैविध्यपूर्ण अनुभवांपासून दूर तर ठेवत नाही ना हा विचार सूज्ञ पालकांनी केला पाहिजे. 
 
आमचा मुलगा सिद्धार्थ लहान असताना त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडत असे. वाचनवेड्या, आवाजाची जाणकारी असणाऱ्या त्याच्या बाबाने त्याला नाट्यमयरीतीने अनेक  गोष्टी सांगितल्या. एकदा सत्यजित रे यांच्या वडिलांनी लहान मुलांसाठी संपादित केलेले भारतीय लोककथांचे एक पुस्तक आमच्या हाती आले. त्यातली ‘इंडी मिंडी किंडी’ नावाची कथा त्याचा बाबा आवाजात पात्रानुरूप, प्रसंगानुरूप योग्य चढउतार करून सांगू लागला की, सिद्धार्थ पंधरा-वीस मिनिटं जागचा हलायचा नाही. त्या वेळी त्याचं वय अडीच-तीन वर्षं असेल. एखाद्या गोष्टीत एकाग्रचित्ताने मुलांना गुंतवून ठेवणे हे धेय्य साध्य करण्यासाठी  अशा प्रभावी कथाकथन शैलीचा वापर करून, गंमतीदार गोष्टींच्या मदतीने निश्चितच यशस्वी प्रयत्न करता येतील. गोष्टी सांगण्यासाठी आपण हॅन्डग्लोव्हज्, पपेटस् यांचाही उत्तम वापर करू शकतो. सिद्धार्थच्या लहानपणी त्याच्या मित्रांसोबत हा ‘पपेट स्टोरी टेलिंग शो’ जाम रंगत आणत असे. पाण्याच्या बाटल्या, चमचे, कढई यांच्यावर मार्करने डोळे, तोंड रंगवून आमच्या गोष्टीतील पात्रं एकमेकांशी लढाया करणे, बोलणे, उड्या मारणे इ. अनेक कृती लीलया करत असतं. पुराणातील कथानकावर आधारित नाट्यत्मकतेने भरलेले  मालवणी जत्रोत्सवातील दशावतार तसेच राष्ट्रीय पातळावरील पपेट शो त्याने समरसून अनुभवले. नाटकासारख्या प्रयोगशील कलाकृती या  मुलांच्या भाषिक विकासासोबतच सृजनशीलतेलाही चालना देतात.
या गोष्टींमध्ये कल्पनाशक्ती, शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपल्या पूर्वापार काळापासून चालत आलेल्या काऊ-चिऊच्या गोष्टीपासून ते प्लास्टिक पिशव्या खाऊन मरणाऱ्या गाईपर्यंत विषय वैविध्य आपण आणू शकतो. सिद्धार्थ पाच वर्षांचा होईपर्यंत घरात टी.व्ही. नव्हता. आम्ही संगणकावर गोष्टी, गाणी, कथाकथन इ.सीडीज् लावत असू. त्याला प्रत्यक्ष बागेत फिरायला नेणं, ‘दुर्गा झाली गौरी’, रस्किन बॉन्डची बालनाटकं आवर्जून दाखवणं. नॅशनल पार्कमधील रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये मार्गदर्शकासोबत भटकंती करणं – त्यात खेकडा नर-मादी ओळखणं, जंगलातील सिग्नेचर स्पायडरचं खरंखुरं जाळं पाहणं, धुव्वादार पावसात जोरदार ओहळांतून भिजत-तोल सावरत चालणं, वयाच्या पाचव्या वर्षी राजगडावर बालेकिल्ला सर करून रात्रभर मुक्काम करणं, कान्हेरी गुंफा, कार्ले लेणी फिरणं, फणसाडचे गर्द जंगल अनुभवणं, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आकाश निरीक्षण करणं, ‘शब्द गप्पा’मध्ये आयोजित जब्बार पटेलांपासून ते साहित्यसंमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, नितीन गडकरी, अनिल अवचट अशा विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींच्या प्रकट मुलाखती ऐकण्यासाठी त्याला आवर्जून नेणं, राजदिप सरदेसाई, भालचंद्र नेमाडे यांचे अनुक्रमे  पत्रकार – साहित्यिक क्षेत्रातले अनुभव त्यांच्यामुखी ऐकणं इ.गोष्टी रोजची घरकामं – नोकरी सांभाळून केल्या. यातून समाजकार्य, राजकारण, नाटक, पत्रकारिता, साहित्य इ. जीवनातील विविध अंगांचं कळत-नकळत भान मुलांना येते. चांगले चित्रपट पाहण्यासाठी आम्ही आवर्जून थिएटरमध्ये जातो. ‘टिंग्या’पासून ते ‘कोर्ट’पर्यंत सिनेमे तो सजगतेने पाहतो. त्यावर चर्चाही करतो. जयंत नारळीकरांचं व्याख्यान ऐकण्याची संधी तेराव्या वर्षी  त्यामुळेच त्यांने मोलाची मानली.
 
प्रत्यक्ष अनुभवावर आधारित  अध्ययनाची सुरुवात पालकांच्या सजगतेने, खेळीमेळीने होऊ शकते. मुलांच्या बौद्धिक, भावनिक, मानसिक, शारीरिक विकासासाठी; तसेच पुढील शिक्षणासाठी त्यांना सज्ज करण्यासाठी यासारख्या अनेक गोष्टी आपण सहजतेने करू शकतो ही खूप छान प्रक्रिया आहे. करू तितके कमी. आवश्यकता आहे ती आपल्यातील उत्सुकता खळाळती ठेवण्याची! पुढील लेखात वाचनगोडी वाढवण्यासाठीचे प्रयत्न.          
 
- सुजाता राणे.