वृक्षवल्ली आम्हा सोयरी ..
मित्रांनो, ५ जूनला जागतिक पर्यावरणदिन साजरा झाला. 'पर्यावरण' हा शब्द आला की, त्या अनुषंगाने आजकाल डोळ्यांसमोर येणाऱ्या गोष्टी म्हणजे जागरूकता, प्रसारमाध्यमांद्वारे येणारे वेगवेगळे संदेश (मेसेजेस) त्यात प्रामुख्याने प्रचलित असणारे व्हाट्स अप व टीव्हीद्वारे केले जाणारे पर्यावरणासंबंधीचे प्रबोधन.
 
आपल्या संतांनीही या संदर्भात खूप प्रबोधन केलं आहे. लोकांना एकत्र करूनही जागृती केली आहे आणि प्रत्यक्ष कामही केलं आहे. ते आपण पाहिलं तर, त्यांची दूरदृष्टी आपल्याला जाणवेलच, पण काय करायला हवं, हेही लक्षात येईल.  पर्यावरणाचा तेव्हाचा विचार हा वैश्विक आहे.
त्यासंदर्भात ज्ञानेश्वर म्हणतात,
"नगरेंचि रचावीं। जळाशये निर्मावीं।
महावनें लावावि। नानाविधें।।२३३।।" (ज्ञानेश्वरी अध्याय १४)
 
अर्थ: मोठी शहरे वासवावीत, विहिरी तळी निर्माण करावीत, नाना प्रकारच्या फळांच्या बागा, फुलांचे बगीचे, आंबराई व इतर झाडांची जंगले लावावीत.
 
मोठ्या शहरांबरोबर तळी आणि विहिरी निर्माण करणं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, शेतीसाठी (शेततळी ) किती आवश्यक आहे, फळ आणि फुलबागा निर्माण करणं हे पर्यावरण आणि सकस अन्नाच्या वाढत्या गरजेनुसार किती गरजेचं आहे, जंगल तयार करणं का आवश्यक आहे हे ज्ञानेश्वरांनी मांडलं आहे.
-------
 
"कल्पद्रुम हन पारिजातु। गुणें चंदनही वाड विख्यातु।
तरी ययां वृक्षजाताआंतु। अश्वत्थु तो मी।।२३५।।" (ज्ञानेश्वरी अध्याय १०)
 
अर्थ : कल्पवृक्ष आणि पारिजात हे दोन वृक्ष इच्छित फल देणे आणि स्वतः सुगंधी असणे इत्यादी गुणांनी प्रसिद्ध आहेत आणि स्वतः सुगंधी असून संगतीत असलेल्या वृक्षांना सुगंधित करणे या गुणाने चंदन देखील पुष्कळ प्रसिद्ध आहे, पण त्या सर्व वृक्षांमध्ये पिंपळ तो मी आहे. (इथे मी म्हणजे स्वतःश्री कृष्ण भगवान) म्हणजेच झाड, फांदी, फळं, फुलं यामध्ये परमेश्वराचे अस्तित्व स्वीकारून आपल्याला उपयोगी पडेल इतकाच त्याचा वापर करून त्या निसर्गाप्रति कृतज्ञ राहावे.
पूर्वीच्या काळी परमेश्वराचे अस्तित्व मानून एखादी गोष्ट सांगितली, तर ती जास्त पटायची. म्हणून तो उल्लेख असला, तरी त्याचा मूळ अर्थ मात्र तुम्ही निसर्गाप्रती कृतज्ञ राहा, झाडांची काळजी घ्या, असा आहे.
-------
"मग वाड धाकुटें न म्हणती। सजीव निर्जीव नेणती।
देखिलिये वस्तु उजू लुंटिती। मीचि म्हणोनि।। २२२।।" (ज्ञानेश्वरी अध्याय ९)
 
अर्थ :  ज्याला जीवनाचा खरा अर्थ कळला तो हा जीव लहान, हा जीव मोठा, असे म्हणत नाही एवढेच काय, पण सजीव आणि निर्जीव हादेखील भेद जाणत नाहीत. डोळ्याला दिसेल ती वस्तू मी परमात्माच आहे, असे समजून सरळ लोटांगण घालतो.
 
किती मोठा गर्भितार्थ आहे पाहा. सजीव-निर्जीव असा भेद न मानता त्याची काळजी घ्या. म्हणजेच आपण कोणतीही गोष्ट वापरताना ती काळजीपूर्वक, मनापासून वापरावी, तिची जपणूक करावी हेही ज्ञानेश्वरीत सांगून ठेवलं आहे. (हे सगळं सांगताना ज्ञानेश्वर हे जगतही होते हेही तितकेच महत्त्वाचे.)
-------
 
"जैसें ऋतुपंतीचें द्वार। वनश्री निरंतर।
वॊळगे फळभार। लावण्येसी।।१००।।" (ज्ञानेश्वरी अध्याय ३)
 
अर्थ : ज्याप्रमाणे वनलक्ष्मी आपल्या फलपुष्प वैपुल्याच्या लावण्यासह ऋतुराज वसंताच्या उंबऱ्यावर अखंड सेवा करते.
 
छोट्या ओव्यांमधून मोठा अर्थ प्रतीत होतो. वनलक्ष्मीचे महत्त्वच यात विशद केलं आहे. वनश्री आपल्यासाठी खूप काही देते हेच यात म्हटलंय.
--------
तुकोबांनी आपल्या सुंदर व सोप्या अभंगातून ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे’ असे देखील म्हणून ठेवलेले आहे. आपण आपल्या पाहुण्यांचे जसे आदरातिथ्य करतो, त्याचप्रमाणे निसर्गात असणाऱ्या वृक्षवल्लींचीदेखील काळजी घ्यावी, हा केवढा मोठा विचार तुकोबांनी आपल्याला दिला.
-----------
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही महाराष्ट्राच्या, देशाच्या बदलासाठी खूप काम केलं. काळानुसार ते आपल्याला अधिक जवळचे! त्यांनीही ग्रामगीतेत गावांच्या विकासासंदर्भात लिहिलं आहे तेही सर्वांना समजेल अशा भाषेत. 
"रामधूनपूर्वी गाव पूर्ण। व्हावे स्वछ, सौंदर्यवान।
कोणाही घरी गलिच्छपण। न दिसावे कोठे।।५१।।"
 
"श्रमदान सप्ताह घेवोनि। रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी।
शोषक खड्डे, मोरया करोनि। सांडपाणी थांबवावे।।६६।।"
 
"नदी, तळ्याकाठी स्वच्छता। तेथे पार, घाट आदींची व्यवस्था।
उत्पादन वाढवाया तत्त्वता। उपयोग घ्यावा जलचा।। ६९।।"
 
"चहू दिशांनी गाव सुंदर। वारे करोत जिवनसंचार।
कोठेहि घाण, कोणी घर। पाहताना न दिसावे।।७२।।"
 
या सगळ्या ओव्या आपण पाहिल्या, तर घरांची आणि गावांची स्वच्छता, चांगले रस्ते, सांडपाणी व्यवस्था, जलाशयांची स्वच्छता, पाण्याचा उत्पादनवाढीसाठी वापर, भरपूर वारा याविषयी किती सोप्या भाषेत लिहिलं आहे.
------------ 
 
ज्ञानेश्वरांची 'ज्ञानेश्वरी', तुकोबांचे अभंग, नाथांची 'गाथा', तुकडोजी महाराजांची 'ग्रामगीता', गाडगेबाबांचे प्रबोधन करणारे कीर्तन- प्रवचन यांचा अभ्यास केला व त्यांचे अनुकरण केले, तर आपण निसर्गाच्या, पर्यावरणाच्या खरंच जवळ गेल्याचा अनुभव येईल.
 
स्वच्छता, नीटनेटकेपणा, निसर्गाप्रति प्रेम, आदर हा संतांच्या शिकवण्याप्रमाणे  जर आपला स्वभावच केला तर आपण ५ जून रोज जगल्यासारखे होईल नाही का!!
आपण स्वच्छता ठेवतो, पण आपल्या घरापुरती, निसर्गप्रेम आपल्या बागेपुरतेच याच भावनेला थोडं मोठ करून बघा. जग खूप सुंदर आहे, या जगालाच आपलं घर केलं आणि त्याची काळजी घेतली तर ज्ञानोबांची ‘हे विश्वचि माझे घर’ ही ओवी सार्थ झाल्यासारखे होईल, चला तर मग संकल्प करू या पर्यावरण रक्षण्याचा!!!
गोपाळ गरुड यांच्या लेखणीतून उतरलेला लेख खालील लिंकवर नक्की वाचा. 
 
- गोपाळ रा. गरुड