मुके संवाद

दिंनाक: 01 Jun 2017 12:24:46
पक्षी प्राणीही संवाद साधतात 
 
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीव प्राण्यांमध्ये संवाद करण्याची क्षमता असते. क्षमता म्हणणं तसं चुकीचं ठरेल कारण ते त्यांच्या परीने संवाद साधतच असतात पण आपल्याला म्हणजेच माणसाला ते कळत नसतं. किंबहुना आपणच त्यांना अज्ञानापोटी मुके जीव ही संज्ञा दिलेली आहे. का बरं? आपण त्यांना मुके म्हणायचं? कारण आपल्याला त्यांची भाषा कळत नाही म्हणून? हे जर खरं मानलं तर बाहेर देशातले सगळेच मुके म्हणावे लागतील. अगदी आपल्या नेहेमीच्या लाडक्या pets बद्दल विचार करा. कुत्री आणि मांजरं हे कायम एकच आवाज काढतात का हो? त्यांना हावभाव नाहीत, हे म्हणणं एकवेळ ठीक आहे. पण हे दोन्ही प्राणी आपल्या गरजेप्रमाणे वेगवेगळे आवाज काढतात. पाळणाऱ्या लोकांना त्यांना काय हवं नको ते कळतं. कारण ते त्यांच्या घरातले असतात.
 
पण बाहेरच्या इतर प्राण्याचं काय? त्यांचा आणि माणसाचा संबंध फारच कमी येतो. ते आपल्या स्वजातीय प्राण्यांशी संवाद साधतातच की, पण त्यांच्या पद्धतीने. जी पद्धत आपल्यापासून कोसो दूर आहे. पशुपक्षी त्यांच्या सांकेतिक भाषेत स्वजातीय आणि विजातीय घटकांशी बोलतात. आपण फारतर त्यांची नक्कल करू शकतो. पण त्याचा अर्थ लावू शकत नाही. भल्या सकाळी पक्षी खूप किलबिलाट करताना दिसतात. आपल्यात जसं सकाळी मुलांच्या शाळा, ऑफिस, जेवणाचे डबे याची धावपळ असते. साधारण तशीच धावपळ पशू-पक्ष्यांची कशावरून नसेल? उदा., पिल्लं उठली की  नाही, उठली असतील तर त्यांना भरवण्याची धावपळ, हिरवळीवर आलेले किडे खाण्याची धावपळ, आई अन्न शोधायला बाहेर पडल्यावर घरट्यातली अंडी / लहान पिल्ले मटकवायला आलेले इतर पक्षी किंवा घोरपड यांची धावपळ अशा कितीतरी घटना घडत असतील. शहरात हल्ली सर्रास नाचण, तांबट, कोकीळ, भारद्वाज, पोपट, वेडा राघू, शिंजीर हे पक्षी दिसतातच आणि कधी कधी या सर्वांचा मिळून कोलाहल म्हणता येईल असा आवाज तयार होतो. ऊन वर येऊ लागल्यावर हा आवाज हळूहळू बंद होतो. नुसताच आवाज नाही तर हे सर्व पक्षी सुद्धा दिसेनासे होतात.
 
पक्ष्यांच्या आवाजाचे थोडे फुलांसारखे आहे. पांढरी-सफेद फुले सर्वाधिक गोड वास येणारी असतात आणि त्यामानाने रंगीबेरंगी फुले कमी वासाची असतात. त्याचप्रमाणे मातकट किंवा करड्या रंगांचे पक्षी हे अतिशय गोड आवाजात गातात. यामध्ये सर्व प्रकारचे cuckoo, नाचण, कस्तूर, बुलबुल, दयाळ हे पक्षी येतात. हे दिसायला छान नसले तरी उत्तम आवाजात गात असतात. याउलट दिसायला सुंदर असणारे पक्षी कर्कश्य वाटतात. उदा., मोर दिसायला सुंदर असला तरी तो ओरडला की दचकायला होतं. तांबट हा गूढ आवाजात ओरडतो. पोपटही काहीसा कर्कश्य वाटतो. धीवर, वेडा राघू असे कितीतरी सुंदर पक्षी यात मोडतात.
 
सस्तन प्राण्यांमध्ये पण आवाजाचे निरनिराळे नमुने ऐकायला मिळतात. माकडे दात विचकून अंगावर येतात, हूप हूप असा आवाज काढतात, पण वाघाची चाहूल लागल्यावर ते एक विचित्रच आवाज काढतात. तोच प्रकार चितळ आणि साम्बरांमध्ये. जणू काही ते इतरांना इशाराच देत असतात, सावधगिरीचा. वाघाची डरकाळीही भेदक असते, पण आसपास पिल्लं असतील तर ते गुरगुरणं लाडिक असतं. मांसाहारी प्राण्यांना या आवाजामुळेच शिकार करणं अवघड होऊन बसतं. हे आवाज जंगलामध्ये अगदी मैलभर लांबसुद्धा ऐकू येतात. आपल्याला जर ते ऐकू येत असतील तर तीव्र घाणेंद्रिय असणाऱ्या पशुपक्ष्यांना नक्कीच ऐकू जात असणार. गवतातून कितीही लपतछ्पत गेलं तरी सुगावा हा लागतोच आणि मग सगळी मेहनत फुकट. किंबहुना माझं तर असं म्हणणं आहे, की त्यांची ही भाषा आपल्यापेक्षा खूप प्रगत आहे. ती कळायला आपल्याला अजून शंभर पेक्षा जास्त वर्ष लागली ना तरी आश्चर्य वाटायला नको.
 
-अमोल बापट