पालकत्व आणि समाज

दिंनाक: 09 May 2017 12:05:30

 

पालकत्वासाठी द्यावा लागतो पुरेसा आणि चांगल्या प्रतीचा वेळ

लिहिते राहा असा संदेश देणाऱ्या गुरूजनांना स्मरून! बऱ्याच वर्षांनी लिहिण्यास घेतलं आहे. शिक्षणविवेकया नावात बरंच सामर्थ्य आहे. तसं पाहिलं तर माणसाचं शिक्षण जन्मापासून ते सरणावर जाईपर्यंत सुरूच असतं. जीवनातील विविध अनुभव हे तर समृद्ध गुरूच! आपण किती जागरूकपणे कोणत्या अनुभवाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावर ज्याचं-त्याचं शिकणं अवलंबून असतं. या प्रक्रियेत विवेकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. विवेकाच्या गाळणीतून आपण जर अनुभव गाळून घेत असू तर, जीवनात दुःख, असमाधानाला काही स्थानच राहणार नाही. खरी मेख इथेच आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कळतंय पण वळत नाहीया अवस्थेचाच अनुभव येत असतो. 

सध्याच्या शहरी जीवनातील विभक्त कुटुंबातील वा एकत्र कुटुंबातील नोकरी करणाऱ्या स्त्रिया, त्यांचे प्रश्न आणि त्यांचे बालसंगोपनातील अनुभव; जेव्हा मी जवळून पाहते तेव्हा एक शिक्षक म्हणून, आई म्हणून मला नानाविध गोष्टी लक्षात येऊ लागतात. त्यातल्याच थोड्या अनुभवांना या लेखात शेअर करावं म्हटलं. 

 मी माझ्या लेकाला चौथ्या-सहाव्या महिन्यापासून बाळा, मी कांदा चिरत आहे. हे बघ  त्याच्या सालाला आवरणही म्हणतात. गुलाबीसर रंगाचं आहे ना! असं सतत कॉमेंट्री करत छोट्या छोट्या क्रियांचं वर्णन करत माझ्या घरकामात त्याला संवादाच्या पातळीवर सामील करून घेत असे. तोही एक दोन मिनिटं तेव्हा माटमूट डोळ्यांनी स्वत:च्या बोटांचे चाळे करत, त्या सगळ्या क्रियांना समजून घेण्याचा त्याच्या पातळीवर प्रयत्न करत असे. मज्जा येत असे तेव्हा! माझ्या महाविद्यालयातील समवयस्क मैत्रिणींशी या गोष्टी शेअर करताना त्यातील एका मातेचा इतनी बात कौन करेगा? तू कितना बोलती हैं!या प्रकारची प्रतिक्रिया ऐकून मी सुरूवातीला थोडी गडबडलेच, पण त्या उच्चशिक्षित शहरी मातेला यातली गंमत व आवश्यकता समजावून सांगण्याचा व्यर्थ प्रयत्न करून मी माझ्या आनंदयात्रेला तसेच सुरू ठेवले.

आताही नव्याने आई बनलेल्या मैत्रिणींशी, जेव्हा बाळामध्ये वाचनगोडी कशी वाढवावी, आपली दैनंदिन कामं करताना त्यात बाळाला सहभागी कसं करून घ्यावं, बाळाच्या विविध संवेदना समृद्ध करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग कसे करता येतील इ. अनुभव सांगते तेव्हा उत्साहाने त्या  ऐकतात मात्र आताच्या इंटरनेटच्या जमान्यात व्हॉटस्अपच्या, फेसबुकच्या गडबडीत कामानिमित्त वा विरंगुळा म्हणून अडकून पडणाऱ्या  या नवमातांना ते प्रयोग अंमलात आणणे आव्हानात्मकच वाटते.  

कमावती स्त्री हे महात्मा फुलेंच्या स्त्री शिक्षणाने समाजाला दिलेले वरदान आहे. मात्र स्त्रीचा नोकरी, घर, मुलं, नातेसंबंध यांसारख्या विविध आघाड्यांवरील धारदार होणारा संघर्ष हे निरोगी समाजाचं लक्षण आहे का? विभक्त कुटुंबातील चांगलं पाळणाघर मिळवण्यापासूनची लढाई ते एकत्र कुटुंबातील आजी-आजोबांच्या पालकत्वाविषयी असणाऱ्या दुराग्रही मतांशी असहमत असल्यामुळे करावी लागणारी लढाई यांतील घर्षण सहन करत आपल्या वैयक्तिक सवयी, उणीवा यांना समजून घेत जोडीदाराच्या साथीने किंवा नोकरी कामाधंद्यानिमित्त त्याच्या घरापासून, घरातील दैनंदिन जबाबदाऱ्यातील त्याच्या सहभागशून्य अस्तित्वासह झुंज देणे हे एक कठीण आव्हानच आहे. शक्य असतानाही आपल्या पिलाला वेळ देण्याऐवजी इंटरनेटवर गुंतून राहणे, खरेदी, विंडो शॉपिंग करत राहणे असा सुटकेचा मार्ग पत्करताना, जेव्हा या मैत्रिणी दिसतात तेव्हा वाईट वाटते. हो, आई असणाऱ्या या मैत्रीणींना विरंगुळा, त्यांचा स्वत:साठीचा वेळ आवश्यक आहे हे मान्य आहे मला. मात्र चलाखीने मुलापासून दूर राहणाऱ्या माता पाहिल्या की, काळजी वाटते. अर्थात यालाही अपवाद आहेत. मुंबईसारख्या महानगरात लांब पल्ल्याचा लोकल ट्रेनचा प्रवास करून आपल्यातील उत्साह, चैतन्य जिवंत ठेवणाऱ्या, आपल्या तान्हुल्यासाठी खासकाही करण्यासाठी धडपडणाऱ्या मैत्रिणींही दिसतात. तेव्हा मनात विचार येतात की समाजाने या आजच्या आई-बाबांवर उद्याचे नागरिक घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे, तर अत्यंत संवेदनशीलतेने, परिणामकारकपणे व ज्यांच्यावर निर्धास्तपणे अवलंबून राहता येईल अशी सपोर्ट सिस्टीमया नव माता-पित्यांना उपलब्ध करून देणे, समाजाची जबाबदारी नाही का?

अशा समाजात सकारात्मक दिशेने पालकत्वात प्रयोगशील राहू इच्छिणाऱ्या नव माता-पितांना नक्कीच उमेद मिळेल. शिस्त-प्रेम यांचे योग्य संतुलन साधणारे आजी-आजोबा असतील. निरोगी निकोप पाळणाघरं, जिथे सहज उपलब्ध होतील. विवेकाने कोणताही अतिरेक टाळून अधिक प्रभावी व परिणामकारकपणे आपल्याला बालसंगोपनासाठी विचार व्यवस्था अंमलात आणणे शक्य होईल. अनुभवसमृद्ध बालपण देण्यासाठी झटणे ही काळाची गरज आहे. माझ्या मते पालकत्वाच्या दृष्टिकोनातून व्यापक पातळीवर हाच अर्थ शिक्षणविवेकात सामावला आहे. 

औपचारिक शिक्षणाआधी मुलांसमोर वैविध्यपूर्ण अनुभवांचं अंगण कसं सजवता येईल त्यासाठीच्या प्रयत्नांविषयी पुढील लेखात.

- सुजाता राणे.