बाल नाट्य

एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होणारी बालनाट्ये अगदी मे महिन्याच्या अखेरपर्यंत विविध नाट्यगृहांमध्ये सुरू असलेली दिसतात. अगदी व्यावसायिक-धंदेवाईक नाटकांसारख्या त्यांच्या जाहिराती वर्तमानपत्रातून झळकताना दिसतात. तेव्हा टि.व्ही.  मालिका त्यातही छोटा भीम, निन्जा हातोडी, राजू, मोटू-पतलू या कार्टून्सना (यांना कार्टून्स म्हणावे का? हा चर्चेचा आणि वादाचा  प्रश्न आहे.), हाणामारीच्या सिनेमांना कंटाळलेला आणि नाटकाचा चाहता पालकवर्ग मुलांना बालनाट्य दाखवायला घेऊन जातो. पण अनेक पालकांकडून सध्या काही प्रश्नवजा तक्रारी ऐकायला येताना दिसतात की, आजची बालनाट्ये ही खरंच बालनाट्ये आहेत का? ती मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीने योग्य आहेत का? ती दाखवून काय हशील होणार आहे? वगैरे वगैरे. याच प्रश्नांवर विचार करण्याच्या दृष्टीने हा लेखनप्रपंच.

 आज आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारची बालनाट्ये रंगभूमीवर दिसतात. एक : विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त केलेली किंवा नावाजलेली. आणि दोन : विविध बालनाट्य शिबिरांमध्ये फायनल प्रोडक्ट म्हणून सादर होणारी. पैकी पहिल्या प्रकारच्या नाटकांना एखादा निर्माता किंवा प्रयोगांचे आयोजन करणारा लाभला, तर त्या नाटकांचे रंगभूमीवर (सातत्याने?) काही प्रयोग होतात. आणि दुसऱ्या प्रकारात शिबिर संचालकांना शिबिरार्थी मुलांचा पालकवर्ग हा हक्काचा प्रेक्षकवर्ग मिळतो. शिवाय इतर प्रेक्षक म्हणजे बोनसच असतो, म्हणून त्याचे मात्र खरंच सातत्याने प्रयोग होताना दिसतात.

या अशा वातावरणात चांगलं बालनाट्य कोणतं, ते ओळखावं कसं, मुलांना कसं दाखवावं म्हणजे दाखवत असताना त्यांना काय मार्गदर्शन करावं असे काही प्रश्‍न पालकांच्या डोक्यात येत असतात. अनेक बालनाट्यांमध्ये टि.व्ही.वरील तीच वर उल्लेखलेली कार्टून्स असतात. त्यांच्या त्याच हाणामाऱ्या टि.व्ही.ऐवजी नाटकात पाहायला मिळतात. मग असं नाटक का पाहावं असा रास्त सवाल ते उपस्थित करतात. पु.ल., रत्नाकर मतकरी, सई परांजपे आदी जुन्या जमान्यातील महत्त्वाच्या नाटककारांची नाटकंही रंगभूमीवर नव्याने सादर होतात. पण नवं काही पाहायचं असेल तर काय करावं? याबाबत पालक संभ्रमित आहेत, तर मुलं पदरी पडलं ते पवित्र झालं या भूमिकेत आहेत.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर आज बालनाट्यांची अवस्था खरंच दयनीय आहे. अर्थात याला जबाबदार पालकवर्गच आहे. आज व्यावसायिक बालरंगभूमीवर जी बालनाट्ये दिसतात, ती वर म्हटल्याप्रमाणे विविध शिबिरार्थी बालकलाकारांची सादरीकरणं असतात. एक आठवडा किंवा पंधरवड्याच्या शिबिरातून चांगली कलाकृती घडणे कसे शक्य आहे? आजचा अगदी थोडकाचा पालकवर्ग चांगल्या कलाकृतीच्या शोधासाठी किंवा आपल्या पाल्यात चांगल्या कलागुणांची जोपासना व्हावी यासाठी धडपडताना दिसतो. फक्त निकालाला महत्त्व देणारा विद्यार्थी आणि पालक शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद कसा घेणार? आणि जे या प्रक्रियेपासून दूर आहेत ते चांगली कलाकृती कशी निर्माण करणार?

पालक आणि विद्यार्थी प्रेक्षक यांनी चांगल्या बालनाट्याची गरज या शिबिर संचालक किंवा लेखक-दिग्दर्शक-निर्मात्यांपुढे ठेवावी. तर ते त्याप्रमाणे शोध घेतील. कारण गरज ही शोधाची जननी असते. फक्त आपल्या पाल्याला रंगमंचावर वावरायला मिळालं आणि त्या संबंधित संस्थेकडून एखादं प्रमाणपत्र मिळालं म्हणून बालकलाकारांच्या पालकांनी हुरळून जाऊ नये. कारण प्रमाणपत्र हे तुमच्या पाल्याच्या कलागुणांचं प्रमाण ठरवत नाही. ते डोक्यावर सजवून तो बाहेरच्या जगात वावरणार नाहीये. तर त्या शिबिरात तो काय शिकला?, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किती विकास झाला? हे त्याच्या वागण्याबोलण्यातून कळणार आहे. म्हणून पालकांनी प्रमाणपत्रापेक्षा त्याचा भाषिक विकास, रंगमंचावरचा आत्मविश्वासपूर्वक वावर, संहिता आणि भूमिकेची जाण या नाटकाच्या प्रमुख अंगांना महत्त्व द्यावं.  

प्रेक्षक पालक किंवा मुलांनी असंच बालनाट्य पाहण्यावर जोर द्यावा जे खरंच मुलांसाठी आहे. खरं बालनाट्य म्हणजे काय तर ज्यात मुलांच्या भावविश्वाचा वेध घेतला आहे. मुलांच्या समस्या, त्यांच्या भावना, त्यांचं आयुष्य हा ज्यांचा विषय आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर आईवडिलांच्या भांडणाचा मुलांवर होणारा परिणाम हा बालनाट्याचा विषय नसून आईवडील भांडतात; पण अशा परिस्थितीत मुलं आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण कसं लावतात हा बालनाट्याचा विषय होऊ शकतो. केवळ बालकलाकार आहेत म्हणून कोणतंही नाटक बालनाट्य होत नाही. ’बालविश्व’ हा त्यातील आशय-विषय असला पाहिजे हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवं.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर उल्लेखलेले नाटकाचे घटक यांचाही नाटक पाहताना विचार व्हावा. संहितेतील साहित्यमूल्य, सौदर्यस्थळे यांबाबत पालकांनी नाटक पाहून आल्यानंतर पाल्याशी चर्चा करावी, तरच एक चांगला बालप्रेक्षक तयार होईल आणि पर्यायाने चांगले बालनाट्य निर्माण करण्याची गरज!

माध्यम साक्षरता हा आजच्या मुलांच्या विकासातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यासंदर्भातला हा लेख नक्की वाचा 

चला टीव्ही पाहायला शिकू

                - सुरेश बा. शेलार

[email protected]