मजा. मस्ती. धमाल.

हुर्रे हुर्रे... सुट्टीच सुट्टी. मजा. मस्ती. धमाल. दोन महिने फक्त आपले. आईबरोबर, ताई-दादा आणि बाबाबरोबर नुसतं खेळायचं. काय धमाल येते माहितीय का? मी, आई-बाबा आणि ताई-दादा खेळताना इतकी मजा करतो, की काही विचारू नका. कसलीच बंधन नाहीत, अभ्यास नाही, फक्त स्वातंत्र्य. फिरायचं, खायचं, प्यायचं आणि मनमुराद राहायचं. आई गं, येणाऱ्या सुट्टीची रंगीबेरंगी स्वप्न बघतंय मन. नाचतंय. बागडतंय, खेळतंय नुसतं. पिंगा आणि धांगडधिंगा.

मित्र-मैत्रिणी जमवणार आणि धमाल फिरून येणार आजूबाजूला. आवडतं बुवा आपल्याला सायकलिंग करायला. रोज शाळेत जाताना-येताना सायकल चालावावीच लागते, पण त्यात काही थ्रील नाही. सकाळच्या रम्य पहाटेच्या वेळेस सायकलिंग करण्याची मजा काही औरच असते. आई-बाबांना न उठवता, आपलं आपण उठायचं आणि पळायचं सायकल घेऊन दूरवर.... धूम. माणसांची रहदारी नसतेच बहुदा. रस्त्यावर गाड्याही तशा कमी असतात आणि वाऱ्याची अलगद झुळूक येत असते अंगावर. मस्त वाटतं एकदम गारेगार, सुखावतो जीव त्याने. सायकलवरची ही मजा दिवसाच्या सुरुवातीला एकदम रंगत आणते आणि मग दिवस एकदम ताजातवाना होऊन जातो उन्हासारखा. मस्त असतं नाही हे उन्हाळ्यातलं उन्ह. छान, मऊ मऊ नसलं, तरी त्यातला कडकपणा भावतो मनाला. या कडक उन्हाचा तडाका गार करायला पुन्हा पुन्हा सायकलवर फिरायचं आणि तेही मस्त आपल्याला हवी असणारी गाणी, आपल्याला येत असणाऱ्या चालीवर म्हणत. काय सुख असतं म्हणता या फिरण्यात. मुक्तपण असतं त्यात, पण त्याच वेळी अनुभव घेण्यासाठी आसुसलेलाही असतो मनाचा एक कोपरा.  

सकाळी फिरून आलं की, अंघोळ उरकायच्या आत सायकलला धुवून काढायचं, तिला पण गार करायचं, पाणी पाजायचं आणि परत जायचं फिरायला. सारखं फिरायचं. कितीतरी रस्ते ओळखीचे होतात, कितीतरी पाठ होतात, जुने रस्ते नव्याने कळतात, दरवेळेस नवीन भासतात, जुन्याच आठवणी नव्याने वर येतात आणि मन एकदम प्रसन्न करतात. गोडवा असतो नाही या आठवणींमध्ये. मन छान गारगार करतात या आठवणी. वाटा, वळणं, आपले जुने मित्र-मैत्रिणी आपल्याशी नव्याने बोलतात या आठवणींमधून, नव्याने कळतात, अधिक आपले वाटतात. सगळं जग वेगळंच वाटतं या सगळ्या प्रवासात. आपलाही आपल्याशी एक छान संवाद घडून येतो, आपल्या मनात असलेल्या अनेक गोष्टी आपण नव्याने अनुभवतो, अनेक गोष्टींचे वेगवेगळे संदर्भ लावतो आपले आपणच. आपले आपणच सापडत जातो आपल्याला. आपले आपण आपल्याला सापडण्यात जे समाधान असतं ना ते असं सांगून समजत नाही ते अनुभवाव लागतं. भारी वाटतं एकदम..... ग्रेट असल्यासारखं. लय सापडते विचारांची आणि सायकलच्या गतीची पण. विचारांच्या तंद्रीत बेभान असल्यासारखं वाटतं.

आपल्या सायकल चालवण्यातल्या नवीन नवीन स्टाईल्स कळतात आपल्याला आणि किती भारी आहोत आपण ते ही कळतं, आपलं आपल्यालाच. दिवस असा हुंदडून झाला की, संध्याकाळीही अशीच हुंदडून काढायची. संध्याकाळी पण वाऱ्याच्या न येणाऱ्या मंद झुळुका अंगावर घ्यायच्या.... या वेळेसचे रस्ते आणखीन वेगळे वाटतात... वेगळे असतात.... आपल्याला दूर नेणारे... आणि परत आणून तिथेच सोडणारेही... गूढ. वेगळी गंभीर जाणीव मिळते या वेळेच्या फिरण्याने... वृद्ध आजी-आजोबा, लहान मुले आणि सगळेजण फिरत असतात रस्त्यांवर. त्यांच्या मधूनमधून वाट काढत सायकल फिरवताना जी कसरत करावी लागते ना तीही भारी असते... आपल्याला काही ‘वेळा’ पाळायच्या नसल्यामुळे निवांत असतो आपण असल्या क्षणी... न चिडचिडता सायकल चालवण्यात एक सहजपणा येऊन जातो त्यामुळे. ही स्टाईल एकदम भारी जमायला लागते आपसूकच. एकदम मोठे झाल्याचा एक छान फील येतो मनाला. मन निवांत आणि शरीररिलॅक्स करण्यासाठी एक छान व्यायाम असतो हा.

रात्र होत आली की, मात्र हा फिरण्याचा कार्यक्रम थांबवावा लागतो. रात्री जाम आराम द्यायचा सायकलला आणि आपल्यालाही. सायकलला छान तेलपाणी करायचं आईच्या मायेनं, खाऊ-पिऊही घालायचं तिला. जसं आई-बाबा आपल्याला घालतात अगदी तसंच..... उद्याच्या तिच्या  परफॉर्मन्ससाठी तिला सज्ज करायचं आणि आपणही सज्ज राहायचं..... निवांतपणे. 

-    डॉ. अर्चना कुडतरकर

-    [email protected]