टीव्ही बघताना मुलं काय आणि कसं  बघत आहेत आणि कोणाबरोबर याचंही महत्त्व आहे.

अंकिताला शोधत आई बेडरूममध्ये आली आणि वैतागलीच सुट्टीच्या पहिल्याच दिवशी अंकिता निवांतपणे युटूब(youtube) वर सिनेमा पाहत होती. सुट्टीतही सिनेमा पाहू देत नाही, म्हणून अंकिता जाम चिडली. मग आईने आणखीच रागवून अंकिताच्या हातातला मोबाईल घेतला. सुट्टीच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात अशी झाली.

    अंकिताचं वय १० वर्ष; ती युटुबवर टू स्टेटस नावाचा सिनेमा पाहत होती, तेही मोबाईलवर. मुळात आपणच बऱ्याचदा मुलांनी शांत बसावं, त्रास देऊ नये म्हणून खेळायला मोबाईल देणं हा पर्याय सहजतेनं स्वीकारलाय. टी.व्ही., दृकश्राव्य माध्यमांवर मुलांनी काय पाहावं आणि काय पाहू नये?? याला "माध्यम साक्षरता" असं म्हटलं जातं. लहान मूल रडू लागलं की, आपण त्याला टी.व्ही. चालू करून देतो. गाण्याच्या-चित्रांच्या आवाजाने आणि हालचालीने मूल काही वेळ शांतदेखील बसतं, पण वय वर्ष ३ ते ८ (तीन ते आठ) आपण दिवसांतून काही वेळ साधारण (अर्धा ते पाऊण तास) पालकांनी मुलांना जवळ बसवून टी.व्ही. पाहायला शिकवावं; हो शिकवावं.

    म्हणजे आपण पाहात असलेल्या दृश्यांमध्ये (चित्रपट-गाणी-सिरियल्स) काय चांगलं, काय वाईट याची जाणीव करून द्यावी. वेगवेगळे खेळ, प्राणी, लहान मुलांसाठी क्रुकरी शो, आर्ट अॅन्ड क्राफ्ट, हिस्ट्री, सायन्स अशा काही वाहिन्यांची माहिती द्याव्या. कार्यक्रमांच्या वेळा नोंदवून ठेवाव्यात किंवा मोबाईलमध्ये रिमांइडर तर असतोच. या प्रयत्नपूर्वक, निवडक कार्यक्रम पाहण्याच्या सवयीला अॅक्टिव्ह व्हुविंग (active viewing) म्हणतात.

 

    वय वर्ष ३ ते ८ यामधेच अॅक्टिव्ह व्युव्हिंग केले गेले पाहिजे. पालकांनी रोज जाणीवपूर्वक त्यासाठी वेळ काढला पाहिजे. 

    चित्रपटातील गाणी, सिनेमा, स्पोर्ट्स, किंवा सिरियल्स म्हणू हवं, आई-वडील ऑफिसला गेल्यावर, शाळेतून आल्यावर मुलं तासनतास पाहतात. घरातील वयस्कर मंडळीही विरंगुळा म्हणून सिरियल्स पाहतात. सोबतीला जाहिरातींचा मारा असतोच. तरीही सलगपणे कितीही वेळ टी.व्ही. पाहिला जातो. याला पॅसिव्ह व्युव्हिंग म्हणतात.(passive viewing) जसे दिसेल तसे मनोरंजनासाठी न थकता पाहणं यामध्ये येतं. मग साधारण ९ ते १६ या वयोगटासाठी नेमके काय प्रयत्न करता येतील? सर्वप्रथम म्हणजे (appoitment viewing) अपॉइंटमेंट व्युव्हिंगघरामध्ये असावे. आजी-आजोबा, आई–वडील, लहान मुलं असा विभागून टी.व्ही. पाहावा. त्यासाठी वेळापत्रक करावं लागलं तरी हरकत नाही. मुलांना सर्वप्रथम कितीही कंटाळा आला तरी रोज किमान इंग्लिश /हिंदी / मराठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्व बिट्सच्या म्हणजे खेळ सिनेमा, राजकारण, आरोग्य इ विषयांच्या बातम्या किमान दहा मिनिटे तरी पाहायला सांगाव्यात. याचा फायदा करिअर निवडीसाठी तर होतोच, पण व्यक्तिमत्वाचा पाया त्याने घडला जातो. अनेक गोष्टींची माहिती क्षणार्धात टी.व्ही.वर घरबसल्या मिळते. माहिती देणारे गेम शोज, ऐतिहासिक सिरिअल्स पाहताना इतिहासाचेही योग्य संदर्भ देत जावेत. वयस्कर मंडळी सिरियल्स पाहत असतील तर त्या पात्रांमधील भावना-भाव याचे आवश्यक-अनावश्यक कंगोरे मुलांना सांगावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाहिरातीमधल्या उत्पादनाची ओळख-उपयुक्तता समजावून सांगितल्यास अनेक बालहट्ट निश्चितच कमी होतील.

    एकदा साक्षरतेने टी.व्ही. पाहण्याची सवय लागली की, जसे पालकांकडून मुलांसाठी क्वालिटी टाईम दिला जावा असे वाटते, तसेच आपणही टी.व्ही.सोबत क्वालिटी टाईम द्यायला लागतो यात शंकाच नाही.

 

*active viewing (कृतीशील प्रेक्षक)

*passive viewing (कृतीशून्य प्रेक्षक)

 

- अमृता रा. धायरकर

उपसंचालक,

डी. ई. एस इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन

-[email protected]