मे महिना उजाडला की, आम्हाला वेध लागतात ते कोकणातल्या आमच्या गावाचे. गर्द झाडीत विसावलेलं मारवजन जवळचं करजुवे नावचं आमचं गाव म्हणजे साक्षात निसर्गदेवतेचं मंदिरचं! नदीकाठी एका बाजूला गर्द झाडीत लपलेलं, डोंगरउतारावर वसलेलं करजुवे म्हणजे आंब्या-फणसाचं आगरच. धुरळा उडवित येणारी आणि वस्तीला थांबणारी लाल-पिवळी एस्.टी. बस सोडल्यास या वाटेनं येणारी वाहन कमीच. सारं गाव शांत आणि निसर्गरम्य. सुट्टीत शहर सोडून इकडे गावी आलं की, महिना कसा संपतो ते कळतही नाही. सकाळी उठून गुरगुट्या भात आणि आंबे-फणसाची न्याहारी करून खेळायला घराबाहेर पडायचं ते जंगलभ्रमंती करून थेट नदीवरच्या पाण्यात डुंबायला जायचं. दुपारी परसदारी विविध खेळांचं आयोजन केलेलं असायचं, तर दुपारी जेवणानंतर पुस्तक वाचन! सांयकाळी पुन्हा दूरवरचा फेरफटका, सहल आणि पिकनिकही. सायंकाळी पाढे – परवाचा, रामरक्षा मग अंगणातल्या लोखंडी कॉटवरून बसून भूता-खेतांच्या गोष्टी व आकाश दर्शन! असा सगळा मस्त कार्यक्रम असतो. म्हणूनच करजुव्याला जायचं ठरलं की, आम्ही मुंबईतली मुलं आनंदानं अक्षरशः मोहरून उठतो.

... या वर्षी मात्र बातमी आली की, करजुव्याला वाघ पिसाळलाय्... त्यानं गावातील तब्बल चार गुरं मारलीत. त्यामुळे आजूबाजूला फिरणंही मुश्कील झालंय्... आणि त्यामुळे आमचं गावाला जाणं थोडं लांबलं. परंतु आम्ही हट्टच धरला. कुठेही जंगलात फिरायला जाणार नाही, असं वचन दिलं आणि मे महिन्याच्या अखेरीस का होईना पोहोचलो एकदाचे करजुव्यात!

गावात आलो तर वाघाची दहशत होतीच. अर्थात् वाघ म्हणजे बिबट्या किंवा पॅंथर! गावात बिबट्यालाच वाघ म्हणण्याची प्रथा आहे. नदीवर पाणी पिण्यासाठी किर्रर्र तिन्हीसांजेला डोंगरावरून खाली उतरणारा बिबट्या अनेकदा अनेकांनी पहिला होता. परंतु हा बिबट्या गावातून राजरोस फिरायचा म्हणे! आमच्या शेजारच्या विष्णूकाकांची पदी म्हणजे लहान गाय त्यानं नुकतीच मारली होती. पलीकडच्या वाडीतल्या कदमांच्या कोंबड्याही त्यानं फस्त केल्या होत्या. हा वाघ करजुवे गावतल्या घरा–घरातून यायला सवकला होता. सांयकाळी अंधार दाटू लागला की, तो वरच्या जंगलाकडून गावकडे यायचा. वनखात्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी चार दिवस पिंजरा लावला. परंतु पिंजऱ्यात अडकायला तो उंदीर होता थोडाच? तो होता बुद्धिमान बिबट्या. पिंजऱ्यात कुत्रा बांधून ठेवला तरी तो त्याला खाईना. त्याऐवजी कुणा एखाद्याच्या गोठ्याकडे लक्ष वळवून तो गाई गुरांचा फडशा पाडायचा.

विष्णूकाकांची पाडी वाघाने पळवून नेल्यापासून आम्ही आमच्या गुरांच्या वाड्यातही कडेकोट बंदोबस्त केला होता. वाड्याच्या दाराशी पत्र्याचे रिकामे डबे ठेवले होते. म्हणजे वाघ आला की, डब्यांचा आवाज होईल आणि मग साऱ्याना कळेलं म्हणून. रोज रात्री वाड्यात जाऊन नीट बंदोबस्त करणे आणि पहाटे जाऊन दूध वेगैरे काढून गुरांना सोडणे हे काम महत्त्वाचे ठरले होते. त्यासाठी मामाच्या सोबत पहाटे उठून आम्हीही जात असू.

त्या दिवशी आम्हाला उठायला थोडा उशीर झाला, म्हणून मामा एकटेच वाड्यात गेले. परंतु नेहमीची तांबू गाय जणू पिसाळल्यागत हंबरत होती. पाय झाडत होती. म्हणून मामानी ओरडून आम्हाला आंबवणाचं घमेल आणायला सांगितलं. ते घेऊन आम्ही जवळच असलेल्या वाड्याकडे निघाले. वाड्यात प्रवेश करणार तोच छपरावरून ‘गुर्रर्र’ असा आवाज ऐकू आला. वाड्याचं शाकारलेलं बैठ छप्पर हलू लागलं. आम्ही वर पाहिलं आणि आमची पाचावर धारण बसली. चक्क वाघोबा बसले होते छप्परावर आणि त्यामुळेच वाड्यातली गुरे बिथरली होती. मामा आत अडकलेले पाहून आम्ही जागच्या जागी किंचाळलो. वाघ आता मामांवर तरी उडी मारून हल्ला करणार किंवा आमच्यावर तरी. तेव्हढ्यात आम्हाला एक शक्कल सुचली. वाड्याच्या दाराबाहेर उंच उभे करून ठेवलेले पत्र्याचे डबे घेऊन आम्ही ते जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. मामा वाड्याच्या दाराशी आले, तेव्हा त्यानाही ओरडून दाराच्यावर छप्परावर वाघोबा असल्याचं सांगितलं. मामाही भांबावले मात्र आम्ही डबे बडवून आरडाओरडा सुरूच ठेवला. थोडं एका बाजूला गेलो, तसं वाघोबानं छाप्पारावरून थेट दुसऱ्या बाजूला उडी मारून जवळच्या पऱ्ह्याकडे पलायन केलं. मामा वाड्यातून बाहेर आलो व त्यांनी तो पडणारा बिबट्या पाहिला. त्यांची सुखरूप सुटका केल्याबद्दल आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांनी आमचं कौतुकही केलं.

या वर्षीचा मे महिना लक्षात राहिला तो या वाघोबाच्या दर्शनामुळं!

-    प्रा. सुहास द. बारटक्के

-    [email protected]