सुटीत धमाल, मुलांची कमाल

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला रे झाला की, बच्चे कंपनीचे निस्तेज झालेले चेहरे आनंदाने फुलू लागतात आणि बच्चेकंपनीसह संपूर्ण घराला सुट्टीचे वेध लागतात. बच्चेकंपनी एकीकडे आता सुट्टीत काय काय धमाल करायची याचे नियोजन करण्यात दंग होते, तर दुसरीकडे मुलांना सुट्टीत कुठे गुंतवायचे आणि त्यांच्या सुट्टीचा "सदुपयोग" कसा करायचा या चिंतेने आई-बाबा त्रस्त होतात.

आई-बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे आणि "मामाच्या गावाला जाऊ या", असे म्हणायचीसुद्धा सध्याच्या काळात सोय राहिली नसल्यामुळे मुलांना कुठेतरी समर कॅम्पमध्ये अडकवून स्वतःची सुटका करण्याकडे बहुतेक पालकांचा कल दिसून येतो.

सगळ्यात आधी तर आपण हे मान्य करू या की, मुलांच्या सुट्टीवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे सुट्टीत काय करावे, हा निर्णय घेताना मुलांना त्यात सामील करून घेण्याची सवय पालक म्हणून आपण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मान्य आहे, की मुले जे म्हणतील ते सगळेच आपण करू शकणार नाही, मात्र आपण सुट्टीत काय करावे याचा विचार करताना आई-बाबा आपले मत विचारात घेत आहेत, ही मुलांसाठी अत्यंत आनंद देणारी घटना असते, हे नक्की .

बहुतेक वेळा शाळेच्या व्यग्र दिनक्रमामध्ये अडकलेल्या मुलांना सुट्टीतील मोकळ्या वेळेत आपण काय काय करू शकतो, त्यासाठी कोणते कोणते पर्याय असू शकतात याचा विचार करण्याची संधीच मिळालेली नसते.  
बरं मुलांना स्वतःहून पर्याय निवडायची संधी देऊ या म्हटलं, तर पालकांनाचा ठोकळेबाज समर कॅम्पचे चार-पाच पर्याय सोडले तर बाकीचे अगदी सहज उपलब्ध असणारे पर्यायसुद्धा माहिती नसतात. त्यामुळे सगळ्यात आधी तर मुलांना सुट्टीत करता येतील अशा उपक्रमांची, मुले भेट देऊ शकतील अशा संस्थाची पालकांनी स्वतः माहिती करून घेतली पाहिजे.

मुल कोणत्याही वयाचे असो, त्याला आजूबाजूचे जग समजून घेण्याची प्रचंड ओढ असते, तसेच हे जग समजून घेण्यासाठी अनेक गोष्टी स्वत:च्या हाताने करून बघण्याची त्यांना तीव्र इच्छा असते. त्यामुळे मुलांना आपण असे उपक्रम सुचवू या ज्यामुळे त्यांना या सुट्टीत निर्मितीचा आनंद मिळेल.

सुदैवाने आज मुलांसाठी शून्य खर्चात आणि घरातील वस्तू वापरून करता येतील अशा अनेक उपक्रमाची यादी निरनिराळ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मुलांना या साईट्सची ओळख करून दिली, तर मुले स्वतःहून त्यांच्या आवडीचे उपक्रम निवडतील व सुट्टीत धमाल करतील. तसेच राजीव तांबे यांच्या गंमत शाळा भाग १,२ व ३ या  पुस्तकांमध्ये घराच्या घरी करता येतील असे अनेक उपक्रम दिले आहेत  त्याचीसुद्धा आपल्याला मदत घेता येतील.

आपल्या शहरामध्ये अशा अनेक सरकारी व खासगी संस्था असतात, जिथे आपल्याला मुलांना घेऊन जाता येईल. पुण्याचाच विचार करायचा झाला तर आयुका, एनडीए, राष्ट्रीय युद्ध संग्रहालय, वेगवेगळे कारखाने अशा ठिकाणी मुलांना घेऊन जाता येईल. अगदी तुमच्या घराशेजारी असलेले गॅरेज, टेलर, मोबाईल दुरुस्ती, घड्याळ दुरुस्तीचे एवढेच काय तर एखादी बेकरी आणि आपल्या घरातील किचनसुद्धा मुलांना संपूर्ण दिवस गुंतवून ठेवू शकते. या सगळ्या ठिकाणी मुलांना सुट्टीतील धमाल तर करता येईलच शिवाय अनेक नवीन गोष्टी समजतील.

आपण ज्या सोसायटीत किंवा ज्या गावात राहतो, तेथील आपले मित्र, आपले शेजारी  किती विविध क्षेत्रात काम करत असतात, त्यांच्याकडे मुलांना देण्यासारखे खूप काही असते. पण आपण याचा कधी विचारच केलेला नसतो .

यावर्षीच्या सुट्टीत आपण आणि आपल्या आजूबाजूचे पालक एकत्र येऊन आपणच आपल्या मुलांना वैविध्यपूर्ण उपक्रम देण्याचा प्रयत्न करू या का? सगळ्याच पालकांनी एकत्र प्रयत्न केले, तर कुणालाचा मुलांच्या सुट्टीचा बोजा वाटणार नाही. आपल्यापैकीच कुणीतरी मुलांना एखाद्या गडावर घेऊन जातं आहे, कुणी मुलांना पोहायला शिकवतोय, कुणीतरी संगणक उघडून मुलांना त्यातली माहिती देतोय. कुणी केक करायला शिकवतोय, तर कुणालातरी स्केटिंगमधली नवीनच ट्रीक कळल्यामुळे व इतरांना सांगितल्यामुळे तो भलताच खूश झाला आहे. सिनेमातील, पुस्तकातील गंमत मुले आता सोसायटीतल्याच काका, दादा आणि मामांकडून समजून घेत आहेत. अहो, म्हणजे झालाच की, आपला घरच्या घरी समर कॅम्प!

आपल्याच माणसांकडून शिकण्याचा, त्यांच्याशी मनसोक्त संवाद करण्याचा आणि अशा अनोख्या समर कॅम्पचा अनुभवमुलांना ही सुट्टी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी मदत करेल. 
तुम्हाला काय वाटते?

- चेतन एरंडे

-[email protected]