आवाजाची दुनिया

दिंनाक: 31 May 2017 12:57:47
मेघना एरंडे : कार्टूनच्या दुनियेचा आवाज

पोगो, डिस्ने, कार्टून नेटवर्क यांसारख्या वाहिन्यांवरिल नॉडी, निंजा हातोडी, डिझी, डेक्स्टर्स लॅबमधील डीडी; बच्चेकंपनीमध्ये लोकप्रिय असलेली ही कार्टून्स दिसतात तर अफलातूनच पण, या कार्टून्सना दिलेले विशिष्ट आवाज जास्त लक्ष वेधून घेतात. छोटुकल्यांच्या दुनियेतल्या अनेक कार्टून्सना आवाज हा मेघना एरंडे यांनी दिलेला आहे. मेघना एरंडे या मराठीतील आघाडीच्या डबिंग आर्टिस्ट आहेत. कार्टून्सशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे, डिस्कव्हरी चॅनेलवरील माहितीपटांचे डबिंगही त्या करतात. याशिवाय अनेक मराठी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केलेले आहे.

मेघना एरंडे गेली पंचवीस वर्षेएक उत्कृष्ट डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. मुंबई विद्यापीठातून ‘लोकसाहित्य’ हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. ही पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठात त्या पहिल्या आल्या. त्या विद्यापीठात गेस्ट लेक्चरर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. 

लहानपणापासूनच मेघना यांनी अभिनय करण्यास सुरुवात केेली होती. एकीकडे शालेय शिक्षण चालू असताना, त्यांनी अनेक नाटकांमधून कामे केली. मेघना यांना सत्यदेव दुबे व विद्या पटवर्धन यांसारख्या व्यक्तींकडून अभियनाचे बाळकडू मिळाले. डबिंगच्या क्षेत्रात त्या वेळी खूप कमी लोक काम करत, त्यामुळे आपण या क्षेत्रात अग्रेसर राहू शकतो, असा विश्‍वास वाटल्यामुळे आणि अभिनयापेक्षाही डबिंग क्षेत्रात काम करणे; हे एक आव्हान वाटल्यामुळेेेे मेघना यांनी या क्षेत्रातच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. पण त्यांची कारकीर्दीची खरी सुरुवात झाली; ती जेव्हा डिस्नेने त्यांच्या आवाजाला कार्टून नेटवर्कसाठी निवडले तेव्हा. भारतात नव्याने आलेली ही कार्टून कॅरॅक्टर्सचे (पात्रांचे) आवाज हिंदी भाषेत डब करणे आवश्यक होेते, आणि त्यासाठी डिस्नेला आवश्यकता होती लहान मुलांच्या लाडिवाळ, लवचीक आवाजाची. मेघना यांचा आवाज त्यातील पात्रांच्या देहबोलीशी अचूक जुळला आणि मग मात्र मेघना यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘निंजा हातोडी’, ‘मारूको चान’, ‘असारी चान’, ‘रोबोटान’, ‘डेक्स्टर्स लॅब’मधील ‘डीडी’, ‘बॉब द बिल्डर’मधील ‘डिझी’ यांसारख्या असंख्य कार्टून्सना मेघना यांनी हिंदीतून आवाज दिला आहे. आज आपण या कार्टून्सना ज्या आवाजाने ओळखतो, ती ओळखच मेघना यांनी निर्माण केली आहे. आपल्या आवाजाने या कार्टून्सना विशिष्ट अशी ओळख त्यांनी; दिली आहे.

वयाच्या आठव्या वर्षीच मेघना यांनी जब्बार पटेल यांच्या एका सिनेमात काम करून डबिंग केले होते. डबिंग करणे म्हणजे नक्की काय? हे त्यांना कळतही नव्हते; तेव्हापासून त्यांनी डबिंग करण्यास सुरुवात केली. संपूर्ण भारतात तेव्हा दहा ते बारा मुले डबिंग आर्टिस्ट म्हणून कार्यरत होती आणि त्यामध्ये मेघना या एक होत्या. त्यामुळे त्यांना अनेक व्यक्तिंकडून खूप काही शिकायला मिळाले. लीला घोष, गौरी शहा यांसारख्या डबिंग आर्टिस्टकडून डबिंग कसे करायचे, हे मेघना शिकल्या.

मेघना यांच्यामते, डबिंगसाठीचा आवाज ही एक दैवी देणगी आहे; पण आवाजाची काळजी घेण्याबरोबरच, सतत विविध आवाजांचा अभ्यासही त्या करतात. वेगवेगळ्या आवाजांचे अनुकरण करणे, बॉलीवूड, हॉजीवूडूध्ये जी अ‍ॅनिमेशन्स बनवली जातात; त्यांचा अभ्यास करणे, या गोष्टी त्या आवर्जून करतात. कारण कार्टून्सना आवाज देताना जॅपनिज, इंग्लिश इत्यादी भाषांतील आवाजांचे अनुकरण करावे लागते. याशिवाय वेगवेगळ्या भाषांमध्ये डब केलेले चित्रपट पाहणे, त्याचा अभ्यास करणे, विविध माहितीपटांना दिलेल्या आवाजांचा अभ्यास करणे, अशा पद्धतीने आवाजांचा अभ्यास करत मेघना यांनी आपला डबिंग क्षेत्रातला प्रवास चालू ठेवला आहे.

‘बालहनुमान’मधील ‘बालहनुमान’ या पात्रालाही मेघना यांनीच आवाज दिला आहे. कार्टून्सशिवाय अनेक हिंदी, मराठी चित्रपटही त्यांनी डब केले आहेत. माधुरी दीक्षित, करिष्मा कपूर, किम शर्मा, हृषिता भट, अनुषा दांडेकर, सोनाली बेंद्रे यांसारख्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रीसांठीही त्यांनी हिंदीमध्ये डबिंग केलेले आहे. ‘फॉरेनची पाटलीण’ या मराठी चित्रपटातील रशियन अभिनेत्रीला मेघना यांनीच मराठीत आवाज दिला आहे. पुणे आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ज्या ध्वनिमुद्रीत उद्घोषणा होतात. त्या घोषणा मेघना यांच्याच आवाजात  आहे.

डबिंगचे दोन प्रकार आहेत. पहिल्या ‘लिपसिंग डबिंग’ या प्रकारामध्ये चित्रपट, टि.व्ही. मालिका यांमधील जिवंत (लाइव्ह) पात्रांना आवाज दिले जातात. या पात्रांचे आवाजांचे डबिंग करताना त्यांच्या ओठांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे लागते. जर एखादी मालिका किंवा चित्रपट हा इतर भाषांमध्ये भाषांतरीत करायचा असेल; तर विशेष काळजी घेतली जाते. याउलट अ‍ॅनिमेशनपट बनतो; तेव्हा आधी त्याचा व्हॉइस ट्रॅक (आवाज) रेकॉर्ड करतात आणि नंतर व्हॉइस टॅ्रकनुसार अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर्सच्या ओठांची हालचाल निश्चित केली जाते. डबिंगचा दुसरा प्रकार म्हणजे- पॅराडबिंग. डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफी चॅनल्सवर आपण जे माहितीपट बघतो, त्यात या प्रकारचे डबिंग असते. कार्टून्समधील सर्व पात्रांना एकच व्यक्ती आवाज देत नाही; तर ऑडिशन घेऊन ज्या व्यक्तीचा आवाज त्या विशिष्ट पात्राच्या जवळ जाणारा असेल, त्याच व्यक्तीचा आवाज त्या-त्या पात्राला दिला जातो. व्हायसिंगमध्येसुद्धा  इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉइस सारखे बरेच प्रकार असतात. एका व्हायसिंगमध्ये इतके उपप्रकार असतात, की रोज वेगवेगळ्या प्रकाराचे आवाज काढावे लागतात, परंतु तरीही मेघना यांना कामाचा कंटाळा येत नाही. उलट, त्यामुळे रोज काहीतरी नवीन करायची संधी मिळते, असे त्यांना वाटते. एखाद्या क्षेत्रात काम करताना त्यात पुढे किती वाव आहे, हे तुम्हाला त्या क्षेत्रात काम करताना कळते आणि त्यात तुम्ही प्रगती करत राहिली पाहिजे, असेही त्या म्हणतात.

कार्टून्सना आवाज देताना त्यांची संवेदनशीलता जपण्याचा प्रयत्न मेघना करतात. निळ्या रंगाचे कपडे घालून, छोटीशी तलवार घेऊन उड्या मारणारा हातोडी खूप हुशार, प्रामाणिक आहे. त्याची समयसूचकता, त्याचा खरेपणा, त्याची समतोल साधण्याची पद्धत या गोष्टींचा अभ्यास त्या करतात. ही कार्टून्स सर्व लहान मुले बघतात, त्यामुळे बोलताना कुठलाही चुकीचा शब्द, चुकीचा आविर्भाव आपल्या आवाजातून जाणार नाही, याबाबत मेघना एक डबिंग आर्टिस्ट म्हणून जागरूक असतात; जेणेकरून त्यांनी आवाज दिलेले कार्टून्स बघणाऱ्या मुलांना चुकीची शिकवण मिळणार नाही. अशा प्रकारे पात्रांना आवाज देताना आपल्या नैतिक जबाबदारीचेही भान त्या ठेवतात.

डबिंगशिवाय मेघना यांनी ‘लोभ असावा’, ‘गाणे तुमचे-आमचे’, ‘मी आणि आई सॉलिड टीम!’ तसेच,  ‘मी मराठी’ वाहिनीवरील ‘मोगरा फुलला’, ‘स्टार माझा’ वाहिनीवरील ‘खमंग’ हा पाकसिद्धी कार्यक्रम, ‘साम’ या वाहिनीवरील आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्यासोबत ‘आयुर्वेद’ हा कार्यक्रम; यांसांरख्या अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. याबरोबरच काही कॉर्पोरेट शोज, तसेच अनेक सरकारी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही मेघना करतात.

बालकलाकार म्हणून डबिंग क्षेत्रात आलेल्या मेघना यांनी आज या क्षेत्रात स्वत:चे स्थान पक्के केले आहे. आज मराठीतील सर्वाधिक मागणी असणार्‍या डबिंग आर्टिस्ट म्हणून त्या ओळखल्या जातात. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा त्यांना कामाचे समाधान जास्त महत्त्वाचे वाटते. मेघना म्हणतात, ‘तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात, तरी अभ्यास हा महत्त्वाचा आहे. कारण, केेलेल्या कोणत्याही अभ्यासाचा तुम्हाला बाहेरच्या जगात आणि भविष्यात नक्की उपयोग होतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात; तर नक्कीच यशस्वी होता येते. कोणत्याही क्षेत्रात आपण असलो तरीही एक चांगली व्यक्ती बनणे जास्त महत्वाचे आहे. पैसा कमावण्यापेक्षाही माणसे जोडण्याने आयुष्य समृद्ध होते. स्वत:च्या आयुष्याचा समतोल कसा राखायचा हे शेवटी आपल्या हातात असते. ज्या क्षेत्रात तुम्ही  हुशार आहात, जे तुम्हाला चांगले येते, ते अधिकाधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करत राहा.’

- रेश्मा बाठे

[email protected]