संगीत आवडतंय?

माझ्या छोट्या दोस्तांनो 

आणि मोठ्या मित्र-मैत्रिणींनो ( पालकांनो )

      आपल्या लहान मुलांना संगीताची गोडी कशी लावता येईल याबाबतीत मी आधीच्या लेखांमध्ये सांगितलं. 

साधारणत: २ ते ५ वयोगटातील मुलं खूप चळवळी, सतत काहीना काही उद्योग करण्यात रमणारी असतात. त्यातून आजच्या पिढीतील या वयोगटातील मुलं खूपच स्मार्ट असतात. मोबाईल, आय पॅड, टी.व्ही.चा रिमोट सहजपणे हाताळतात. सिनेमाच्या गाण्यांवर नाचतात, तर कुणी गाण्याची नक्कलही करतात. कुणी टेबलावर हात आपटतात, चमचा वाटी आपटून निरनिराळे आवाजही काढतात. यात काहीच नवल नाही. वाढल्या वयातल्या या गोष्टी आहेत, तर कधी कधी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठीही अशा गोष्टी ते करत असतात. पालकांना मात्र या सगळ्या गोष्टींचं खूप कौतुक असतं. ( आणि ते स्वाभाविकच आहे ). 

      पण यावरून जर कुणी त्याला जन्मजात गवई किंवा तबलावादक किंवा डान्सर ठरवायला लागलं, तर मात्र ही गोष्ट खूप चुकीची ठरू शकते. एखाद्या लहान मुलाला टी.व्ही.वर गाताना किंवा नाचताना पाहिले म्हणून, आपल्याही पाल्याला चौथ्या-पाचव्या वर्षीच तसं गाता - नाचता येईल म्हणून आग्रह धरणारे पालक मला भेटतात.

एखाद्याला जन्मजात हे कौशल्य मिळालेलं असतंही किंवा घरात कुणी कलाकार असेल तर मुलाच्या रक्तातच हे संस्कार असू शकतात. एरवी पाच वर्षांपेक्षा लहान मुलामुलींचा कलेतील कल ओळखणं थोडे कठीण असतं. एक दोन वर्षांनी त्यांची आवड बदलूही शकते. त्यामुळे पालकांना कोणतेही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये.

      या काळात मुलांना गायन, वादन, नृत्य, चित्रकला अशा विविध गोष्टींची तोंडओळख करून द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे मुलांची बडबडगीतं ( नर्सरी -हाईम्स) ऐकवणं, म्हणायला सांगणं, ड्रम, कॅसिओ अशी खेळण्यातली छोटी छोटी वाद्यं वाजवायला देणं, लहान मुलांच्या गाण्यांवर ( चित्रपटगीतं नाही) नाचू देणं, चित्रं रंगवणं, आवडत्या प्राण्यांची, वस्तूंची चित्रं काढणं आणि त्यांना जमणारे इतर खेळ खेळू देणं अशा अनेक गोष्टी त्यांना करू द्यायला हव्या.

        त्यांच्या बरोबरची मित्रमंडळी काय काय करतात, याचाही प्रभाव त्यांच्यावर किंवा पालकांवर पडण्याची शक्यता असते. एकाला एक गोष्ट जमली म्हणजे दुसऱ्यालाही ती जमेलच असं नसतं. तसंच प्रत्येकाची आकलनशक्ती सारखीच असेल असं नाही. तेव्हा आपल्या मुलाची इतर कोणाशीही तुलना करू नये. त्याला स्वत:च्या आवडीनं आणि गतीनं शिकू द्यावं.

       सहाव्या वर्षानंतर मात्र मुलं हळूहळू आपली मतं व्यक्त करू लागतात. त्या वेळी त्यांची आवड निवड आपल्याला समजू शकते. अशा वेळी आपली मतं त्यांच्यावर लादू नयेत. किंवा आपल्याला नाही करायला जमलं, वेळ नाही मिळाला तेव्हा आता माझ्या मुलांनी त्या गोष्टी कराव्यात असाही आग्रह धरू नये. 

        मुलं एखाद्या क्लासला जायला लागली की, त्याला ते जमतंय का?, आवडतंय का? असेही प्रश्न तुम्हाला पडायला लागतील. क्लासच्या दिवसाची आतुरतेनं वाट पहात, जराही कंटाळला न करता जायला लागली की समजावं त्यांना तिथे त्या विषयाची गोडी लागली. मग ती आपणहून तिथल्या गमतीजमती सांगायलाच लागतील. त्यांना किती आलंय हे समजण्यासाठी मात्र चार-सहा महिने वाट पाहा. लगेच त्यांना सर्वांसमोर गायला, वाजवायला, नाचायला सांगू नका. आता कुठे त्यांचं ए  बी सी डी गिरवणं तिथे सुरू झालेला असतं. आणि तुम्ही त्यांना फाडफाड इंग्लिश बोलायला सांगताय, अशी त्यांची अवस्था होते. तीन चार वर्ष झाल्याशिवाय कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायला लावू नका. योग्य तयारी झाल्यावर, त्यांचे शिक्षकच त्यांना स्पर्धेत भाग घ्यायला परवानगी देतील. 

         अशा गोष्टींची काळजी घेतलीत की, ते शिकत असलेल्या कलेचा आनंद त्यांना घेता येईल. इतर विषयांसारखा अभ्यासाचा ताण येणार नाही. बालवयात शिकताना त्यांना कलेची गोडी लागणं महत्त्वाचं. मग मोठेपण त्यांना त्यातील मेहेनतीचं, रियाजाचे महत्व जरूर सांगा.

            एकूण काय तर जे त्यांना शिकवायचं, ते त्यांचा कल पाहून, आवड पाहून. त्याचा आनंद घेऊ द्यायचा इतकंच महत्वाचं.

                                                                                                               - मधुवंती पेठे

-[email protected]