पुस्तकांचं गाव
खूप दिवस आपण एखादी गोष्ट ठरवतो तरीही ती जमत नाही आणि एक दिवस अचानक काही सुंदर भारलेले क्षण आपल्या ओंजळीत पडतात,  मग अवचित मन गुणगुणतं 'मेरे घर आना जिंदगी, जिंदगी.' 
    मुंबईच्या असह्य उकाड्याने त्रस्त झालेलं, कुठे थंड हवेच्या ठिकाणी जाऊ म्हणावं तर प्रत्येक ठिकाणी जत्रा भरावी एवढी गर्दी. गर्दी टाळावी म्हटलं तर मुलांची सुटी संपून जाते असा विचित्र पेच. 
  काय करावं या विचारांच्या चक्रात गरगर फिरून शिमला, चंबा, नैनिताल, सापुतारा अशी ठिकांणांची वैचारिक पायपीट करत गाडी शेवटी नेहमीच्याच ठिकाणी लागली आणि मेक माय ट्रीपवर महाबळेश्वरच बुकिंग करून टाकलं. 
"आजकाल महाबळेश्वरलाही उकडतं", "केवढी गर्दी असते तिथे", "पैसेवाल्यांसाठी मुद्दाम घडवलेली ठिकाणं"  इथपासून सायबाची कृपा  इथपर्यंत अनेक प्रतिक्रिया आल्या, पण मुलांना घेऊन निघालेच. रस्ता उत्तम होता, त्यामुळे अपेक्षेपेक्षाही लवकर पोहोचलो. छोटसं टुमदार रिसॉर्ट. कमालीचं स्वच्छ, भवती स्टॉबेरीचं सुरेख फार्म. एका अंगाला कोबी फ्लॉवर, गाजर, मुळे, टोमॅटो अशा देशी भाज्या (यांना आता देशीच म्हणायचं), तर दुसऱ्या बाजूला चवळी, माठ आणि पालक त्यापलीकडे झुकीनी, सेलरी, अॅस्परॅगस, अशा तुरळक विदेशी भाज्या लावलेल्या मध्येअधे सूर्यफूलं, डेलिया यांची दिमाखदार पखरणं. कुंपणाला उलट्या लोलकांसारखी फुलं मिरवणारा धोतरा. कडेला दाट वस्ती करून उभा. फुलांचे पिवळे सुवर्णालंकार ल्यालेला सोनचाफा, एक्या अंगाला फणस आणि दुसऱ्या अंगाला हिरव्या कैऱ्यांचे घोस लगडेलेला आंबा. एवढीशी प्राॅपर्टी पण अगदी निगुतीनं सजवलेली. 
  गाडी पार्क करता करताच मनावर छाप सोडणारं सुरेख  चित्र उमटून गेलं. 
  वातावरणात खूप  गारवा नसला तरी ताप नव्हता, एक निसर्गसुंदर प्रसन्नता मात्र होती. फ्रेश होऊन चहा घेतला. मुलांनी सॅन्डवीच, पिझ्झा मंडळींना जवळ केलेलं. त्यांची हातातोंडाची लढाई रंगलेली. चहा घेताघेता सहज लक्ष गेलं तर एक सुरेख देखणी पाटी लक्ष वेधून घेत होती. 'स्टॉबेरीचं आणि पुस्तकांच गावं आपलं सहर्ष स्वागत करतं आहे' . 
 म्हणजे आपणं भिलारमध्ये आहोत. गाडीने येताना पाचगणीपासून पुढे  येताना हे  जाणवलं होतं. साहाजिकच माझे पाय तिकडे वळले. दुसऱ्या मजल्यावर एक हजार पुस्तकांचा तो राजस खजिना मांडून ठेवलेला. मुख्य विषय जरी विज्ञान  होता, तरी विज्ञानाबरोबर नानाविध पुस्तकांची जंतरी होती. उबदार सोफ्यात टेकले तोवर मंदार नावाचा उत्साही तरूण तिथे हजर झाला. 
समोरच्या कपाटाकडे बोट दाखवत म्हणला, "हवी तेवढी पुस्तकं चाळा, चावी कपाटालाच आहे." 
कमर्शियल रिसोर्टमध्ये चक्क ही मराठी सारस्वती मेजवानी मला फार सुखावून गेली. मनसोक्त पुस्तकं चाळली. मुलांनीही उत्साहाने आठ-दहा पुस्तकं जमवून घेतली. रात्री आता मलाच ती वाचून दाखवावी लागणार होती. 
रात्रीच्या जेवणानंतर सकाळी नेलेलं पुस्तक क्रॅडलवर ठेवलं  आणि एक गोड धक्का बसला. भोवती काही स्त्रिया आणि पुरुष चक्क वाचत होते, मुलं पुस्तकं हाताळत होती, कोणी रात्री रुमवर ही दोन नेऊ का? अशी विचारणाही करत होतं. कशालाच आडकाठी नव्हती. 
  राजकारण्यांना एरवी आपण नाव ठेवतो. त्यांच्या उपक्रमांना तर त्याहून. पुस्तकांच्या गावाची निर्मिती झाली आणि उद्घाटनाला साहित्यिकांची अनुपस्थिती असल्याबद्दल  फेसबुकवर चर्चाही झडल्या, पण  आज समोरच दिसणारं चित्र खरंच उत्साह वाढवणारं होतं. सुदृढ भारताकडे नेणाऱ्या वाटेवरील पाऊल होतं.  
 पुस्तकांचा संग्रह चाळताना या नव्या उपक्रमाचं आणि ते तडीस नेणाऱ्याचं  विशेष कौतुक वाटलं. त्याला कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणी असलेली एक हजार पुस्तकं ही एखाद्या विशिष्ट विषयावरची होती. त्यामुळे त्या विषयांवर मराठीत प्रसिद्ध झालेलं सगळं साहित्य एकत्रितपणे वाचता येणार होतं.  त्याचा फायदा चोखंदळ वाचक आणि लेखक, अभ्यासू यांना होणार होता. 
 भिलारभर प्रत्येक घरावर रंगवलेल्या पुस्तकांची देखणी मुखपृष्ठ, घरागणिक केलेले कादंबरी, नाटक, ललित असे विभाग. त्या त्या विभागात फक्त त्याच विषयाची हजार पुस्तकं. नीटनेटके मांडलेले ग्रंथ हे सर्व बघताना अगदी सुख सुख वाटत होतं. घरं, देवळं, हॉटेल, वाचनालय, मंगल कार्यालय, किराणा दुकानं, होमस्टे, रिसॉर्ट सगळी सगळीकडे व्यापून  राहिलेली ही सरस्वतीची आशीर्वचनं पाहिली आणि वाटलं, मराठी जगणार का? म्हणून विचारणाऱ्यानो पाहा मराठी जगणारच नाहीतर फोफावणार आणि दिमाखानं मिरवणारं. . . . . . . . . पण आपण सगळ्यांनी मात्र त्यासाठी एक करायला हवं, ते म्हणजे आवर्जून या गावाला भेट द्यायला हवी आणि महाराष्ट्रात  सगळ्याच ठिकाणी अशा पुस्तकं खजिन्याची आग्रहानं मागणी करायला हवी. महाराष्ट्रात सगळीकडे ही पुस्तकं दालनाची सोय हवी. 
आपल्या मातृभाषेला जर असं महत्वाचं स्थान तिच्या घरीच मिळालं तर इंग्रजीच्या चरकात पिळल्या जाणाऱ्या आमच्या नवीन पिढ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यातला आनंद मिळेल. महाराष्ट्रात मराठी साक्षरांच प्रमाण वाढेल. 
- मैत्रयी केळकर