भावनिक कंगोरे 
रमा : आई, आपण रोज एक नवा खेळ आणू या. 
आई :  का गं ? 
रमा : अगं मला तेच तेच खेळ खेळून कंटाळा येतो. 
आई : नवीन खेळ आणले तर काय होईल? 
रमा : मग खूप मज्जा येईल, मला बोअर होणार नाही. 
 
चार वर्षांच्या रमाचे आणि तिच्या आईचे हे संवाद. वयाच्या चौथ्या वर्षी रमा कंटाळा आणि आनंद या दोन भिन्न भावानांमधील फरक नेमका ओळखू शकतेय, याचं कारण रमाच्या लहानपणापासूनच तिच्या भावनांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न तिची आई करत आली आहे. 
लहानपणापासूनच भावना? हो, जन्माला आल्या क्षणापासूनच रडणं आणि हसणं या प्रतिक्रिया बाळ देऊ लागतं. सुरुवातीला दुपटं ओलं झालं की, भूक लागली की, रडायचं आणि कधी कधी झोपेत हसायचं या प्रतिक्रियांपासून सुरू झालेली भावनांची बैठक पक्की करायचं काम मात्र त्या बाळाच्या पालकांचं असतं. 
अगदी तान्हेपणी आईने जवळ घेतले की, आनंद, समाधान आणि झोप आली, भूक लागली की रडून व्यक्त व्हायचे इतके सरळ, साधे असे बाळांचे भावनिक विश्व असते. बाळ जसजसे मोठे होऊ लागते तसतसे त्यांचे भावनांचे विश्वही समृद्ध होऊ लागते. मनाविरुद्ध घडल्यास चिडचिड, राग, आक्रस्तळेपणा तर मनाप्रमाणे घडल्यास आनंद, समाधान, प्रेम व्यक्त करणे, बाळ हळूहळू शिकत जाते. अर्थातच हे 'शिकणे' म्हणजे इतरांच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण असते. म्हणूनच मुलांच्या भावनिक विकासात लहान मुलांच्या आसपास वावरणाऱ्या माणसांची भूमिका, त्यांचे प्रतिसाद देणे खूप महत्त्वाचे असते. 
महुषची आजी एकदा त्याला म्हणाली की, "तू असाच त्रास दिलासा तर आई तुझ्याशी कट्टी घेईल, मग तू आईचा दोडका आणि ताई मात्र लाडकी होईल." सहज, मजेत म्हटलेलं हे वाक्य महुषच्या मनावर मात्र कोरलं गेलं. त्याचा आक्रस्ताळेपणा वाढला. सतत आईच्या मागे लागणं, आईकडूनच प्रत्येक गोष्ट करून घेणं, हट्टीपणा करणं इ. वर्तनप्रकार दिसू लागले. महुषच्या या वागण्यामागचं कारण म्हणजे आजीच्या असं बोलण्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली असुरक्षितता. ही असुरक्षितता लहानपणीच कमी झाली नाही तर मोठेपणी न्युनगंड, दुसऱ्यावरचा अविश्वास, भीती वाटणे इ. दूरगामी परिणाम महुषवर होऊ शकतात. याउलट लहानपणीच ज्या मुलांना प्रेम, सुरक्षितता, विश्वास मिळतो; ती मुले मोठेपणी विश्वासास पात्र तर होतातच पण ती भावनिकदृष्ट्याही अधिक निरोगी असतात. 
 IQ gives you a job but EQ gives you a promotion, हे वाक्य मनापासून समजून  घेण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. जगातील माणसांची संख्या झपाट्याने वाढते आहे, पण माणुसकी कमी होतेय, मुलांना गुण कमी मिळतात, पण त्यांना शहाणपण येत नाही. फेसबुकवरची फ्रेंडलिस्ट मोठ्ठी असली तरी ऐनवेळी खांद्यावर हात ठेवणारा मित्र मात्र आता दुर्मीळ झाला आहे. हे सर्व परिणाम माणसांमधला भावनांक कमी झाल्यामुळे दिसून येत आहेत. 
स्वतःच्या भावना ओळखणे, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे, इतरांच्या भावना ओळखणे व त्यानुसार प्रतिसाद देणे या साऱ्या गोष्टी भावनिक बुद्धी या संकलनेत समाविष्ट होतात. लहानपणापासून मुलांची ही भावनिक बुद्धी समृद्ध होण्यास पालकांनी हातभार लावल्यास भावनांची बैठक नक्कीच पक्की होऊ शकेल. 
मुलांमधील भावनिक बुद्धी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? 
लहानपानपासून मुलांच्या भावनांना शब्दरूप देऊ या. 
  • मुलांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यास संधी देऊ या. मुलांनी व्यक्त केलेल्या नकारात्मक भावनांचाही स्वीकार करू या आणि नंतर त्यांच्याशी याबाबत संवाद साधू या. (शिबिरामध्ये एक मैदानी खेळ न आवडल्याचे अक्षरा एकदम ताईला म्हणाली, "शी. कसला फालतू खेळ घेतलास ताई, पायाला सगळी माती लागली नं माझ्या." यावर ताई त्या वेळी शांत राहिली आणि दुसऱ्या दिवशी तिच्याशी अशी नकारात्मक प्रतिक्रिया देण्याविषयी मोकळेपणाने बोलली. परिणामी अक्षराकडून "सॉरी ताई" असा सहज प्रतिसाद मिळाला.)
  • मुलांना नकारात्मक भावनांचाही अनुभव घेऊ दे. जेणेकरून त्यांना त्या भावनांशी सामना करण्यास आपण मदत करू शकतो. 
  • मुलांना 'नाही' ऐकायचाही अनुभव घेऊ दे. 
  • इतरांच्या भावना समजून घेण्याची संधी देऊ या. 
  • आपली भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्याचं वळण लावू या. 

घडण पालकत्वाची या सदरातील लेख. खालील लिंकवर नक्की वाचा  

घडण पालकत्वाची : गट्टी समाजाशी

- रश्मी पटवर्धन 
- [email protected]