योग निद्रा 

मागील भागात आपण योगनिद्रा, तिचं स्वरूप, विद्यार्थ्यांसाठी तिची उपयुक्तता, संशोधन याविषयी मनोरंजक माहिती बघितली.

या भागापासून आपण ही योगनिद्रा वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना प्रत्यक्षपणे कशी देता येईल हे पाहू या.

वयोगट १ महिन्यापासून ते ५ वर्षांपर्यंत 

आई आपल्या छोट्या बाळाला कौतुकाने तीट लावताना “अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीट लावू.", हे बालगीत म्हणते. योगनिद्रेच हे अगदी सोपं, बाळबोध स्वरूप आहे. हे वाचताना आश्चर्य वाटतंय ना? आणि लहान मुलांच्या आयांना तर, आपल्या तान्हुल्यावर इतक्या लहान वयातच योगसंस्कार करता येतात हे ऐकून आश्चर्याबरोबरच खूप आनंदही होईल. योगनिद्रेमध्ये अवयव ध्यान (आपल्या शरीरातील अवयवांविषयी जाणीव निर्माण करणे) हा टप्पा असतो. या गीतात तीट लावताना, बाळाला होणाऱ्या स्पर्शातून त्याची शरीराविषयीची संवेदना आणि जाणीव हळूहळू जागृत होते.

या प्रक्रियेत आईने बाळाच्या भ्रूमध्यावर (तीट लावतो तिथे) आपल्या हाताचं बोट गोल गोल फिरवत म्हणायचं -

“अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीट लावू." असं ५ वेळा म्हणायचं. प्रत्येक वेळी कपाळावर तीटीच्या जागी बोट टेकवावं.

लहानपणी आपण खेळताना “करंगळी मरंगळी मधलं बोट चाफेकळी", हे गाणं म्हणायचो तो या क्रियेचा दुसरा टप्पा. यामध्ये आईने मुलाच्या उजव्या हातापासून एका एका अवयवाला हलकेच स्पर्श करत पुढील गाणं म्हणावं -

“करंगळी अरंगळी मधलं बोट चाफेकळी, अंगठा, तळहात, मळहात, मनगट, कोपर, ढोपर, गालगुटी, हनुवटी, भाताचं बोळकं, वासाचं नाक नळकं, देवाच्या समया (दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर अलगद बोटे टेकवावी), सूर्यदेव (तीटीच्या जागी बोट टेकवावं) ... आणि मस्तकावर ... भगवंताचं विश्रांतीचं स्थान... (टाळूवर हलकेच हात ठेवावा.)

आता याच क्रमाने डाव्या हातापासून एका एका अवयवाला हलकेच स्पर्श करावा. एकावेळी डावा व उजवा हात मिळून एक आवर्तन होतं. बाळ तीन महीन्याचं होईपर्यंत, एका वेळेला एक आवर्तन, असं दिवसातून तीन वेळा करावं. (हे करताना बाळ मजेत खेळत असतानाची वेळ किंवा त्याच्या झोपेच्या आधीची वेळ निवडावी). तीन ते सहा महिन्यांच्या वयात प्रत्येक वेळी दोन आवर्तनं, असं दिवसातून तीन वेळा करावं. सहा महिने ते एक वर्षापर्यंत प्रत्येक वेळी तीन आवर्तनं, असं दिवसातून तीन वेळा करावं.

बाळ एक वर्षाचं झाल्यावर यात थोडा बदल करायचा बरं का ! दोन्ही हाताची आवर्तनं झाल्यावर आईने मुलाच्या उजव्या पायापासून एका एका अवयवाला स्पर्श करत म्हणावं -

“करंगळी, मरंगळी, मधलं बोट, पहिलं बोट, अंगठा, तळपाय, टाच, घोटा, पिंढरी, गुढघ्याची वाटी, मांडी, ओटीपोट, बेंबी...ब्रह्मदेवाचं स्थान, छाती...भगवान विष्णूंचं स्थान, गळा...गणपतीचं स्थान, तोंड...सरस्वतीचं स्थान, नाकपुड्या...चंद्राचं स्थान, दोन्ही डोळे...सूर्याचं स्थान, ... आणि... मस्तकावर...भगवंताचं विश्रांती स्थान.

(काही ठिकाणी मुद्दाम  “ ... “ अशी टिंब दिली आहेत. त्या ठिकाणी, अगदी किंचित थांबत-पॉझ घेत म्हणाल्याने त्यात सुरेलता, गेयता येईल, संगीताचा वापर सहजपणे होईल. हाच नादयोग किंवा लययोग. त्यामुळे ही प्रक्रिया बाळासाठी अधिक हवीहवीशी, प्रभावी ठरेल.)

याच क्रमाने डाव्या पायाकडून सुरुवात करून म्हणावं.

म्हणून झाल्यावर बाळ स्वस्थ झालं, असेल तर त्याला थोडा वेळ तसंच राहू द्यावं. नंतर हलकेच, लाडाने हाक मारून त्याला हलवावं आणि मग इतर गोष्टींना सुरुवात करावी.

अशा प्रकारे योगनिद्रा संस्काराची सवय अगदी लहानपणापासून लागली, तर मुलांचं मन, मेंदू, इतर महत्त्वाचे अवयव, संपूर्ण शरीर यांची वाढ उत्तम होते. मुलं अधिक खेळकर, समंजस, शांत होण्यास मदत होते.

(लेखातील काही संदर्भ डॉ. नंदकुमार प्रधान यांच्या योगनिद्रेवरील पुस्तकातून घेतले आहेत.)

वाचा या लेखातून योगनिद्रेचं महत्त्व.  

विद्यार्थ्यांसाठी योगनिद्रा – भाग १

 

- मनोज पटवर्धन

[email protected]