आनंददायी सोबत

दिंनाक: 24 May 2017 11:16:54

 

सोबत 

‘मे’ महिना म्हटला की आमरस, आंब्याचं आईसक्रीम, मॅगो मिल्कशेक, फणसाची भाजी, गरे हे पदार्थ हवेतच. या पदार्थांशिवाय आपण ‘मे’ महिन्याची कल्पनाच करू शकत नाही. ‘आंबा’ आवडत नाही असा माणूस विरळाच. आपण आंबा, आईसक्रीम चवीचवीने खातो. तृप्त होतो, पण इतकं रसाळ फळ देणाऱ्या आंब्याच्या झाडाशी आपण कधी मैत्री करतो का? ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी आंब्याच्या झाडाशी मैत्री केली आहे. आंब्याचं झाडं त्यांच्याशी बोलतं, हसतं आणि रडतंही. केवळ आंब्याच्या झाडाशीच नाही, तर निसर्गातल्या विविध घटकांशी असलेलं नातं अगदी हळुवारपणे आणि तन्मयतेनं मधुभाईंनी उलगडून दाखवलंय त्यांच्या ‘सोबत’ या पुस्तकात.

कथाकार, कादंबरीकार; तसचं कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक म्हणून सर्वांना परिचित असलेले पद्मश्री मधु मंगेश कर्णिक. मधुभाईंचं १९६२ साली प्रकाशित झालेलं ९८ पानाचं छोटेखानी पुस्तक म्हणजे... ‘सोबत’. या पुस्तकाची २०१४ साली तिसरी आवृत्ती निघाली. ५ दशकांहून अधिक काळ लोटला. तरीही आजही या पुस्तकातलं लेखन ताजं, टवटवीत वाटतं.

पुस्तकाचं मुखपृष्ठ बोलकं आहे. दिनानाथ दलाल यांनी काढलेलं निसर्गाचं पुस्तक वाचत बसलेला, निसर्गातील विविध घटकांची सोबत लाभलेला छोटा मुलगा आपल्याला मुखपृष्ठावर दिसतो.

पुस्तकातील विषयही हटके, पण सुंदर... आणि ३ भागात विभागलेले. मधुभाईंनी आंबा, चिंच, शेवगा, पिंपळ, वड, औदुंबर, बकुळ, फणस, सोनचाफा, केळं, कावळे, चिमण्या, गाढव, पाऊस, झोपाळा, आकाश इ. निसर्गातील विविध घटकांवर जिव्हाळ्यानं आणि रसाळ लिहिलं आहे. सतीश भावसार यांची रेखाटनंही लक्ष वेधून घेणारी आहेत.

‘झाड’ म्हणजे मधुभाईंसाठी चालतीबोलती व्यक्तीच जणू. कधी खदखदून हसवणारं, कधी गंभीर झालेलं तर कधी लहान मुलासारखं हसवणारं आंब्याचं झाड, मधुभाई आपल्या डोळ्यापुढे उभं करतात. आंब्यातील  नर – मादी प्रकाराबद्द्लही माहिती देतात. ‘आंबा’ या लेखाचा समारोप तर मधुभाईंनी इतका सुरेख केलाय. मधुभाई लिहितात, "आंब्याच्या झाडाशी तुमचा स्नेह नसेल, तर तुम्ही स्नेह केलाच नाही. आंब्याच्या सावलीत तुम्ही घटकाभर पुस्तक वाचीत बसला नसाल, अंगाखाद्यावर तुम्ही बालपणी खेळला नसाल, तर तुम्ही काही खेळलाच नाही. नि आंब्याची बाठी भाजून तुम्ही खाल्ली नसेल तर तुम्ही  मिठाई कधी खाल्लीच नाही. आंब्याचे झाड हसताना, रडताना तुम्ही पाहिले नसेल, तर जगात तुम्ही काही पाहिलेच नाही.

‘आंबा’ हा लेख वाचल्यावर, आंब्याच्या झाडाशी आपणही मैत्री करायला हवी, असं अगदी असोशीनं वाटतं आणि मग निदान आंब्याचं झाड न्याहाळायला तरी आपण नक्कीच सुरुवात करतो.

चिंचेच्या झाडाबरोबर सुद्धा मधुभाईंचा दोस्ताना. चिंचेच्या झाडाचं व्यक्तिमत्वच मधुभाई आपल्या शब्दातून रेखाटतात. चिंचेच्या फुलांच्या अनुपम सौंदर्याकडे आपलं लक्ष वेधतात. चिंचा गाभूळल्याची सुरुवात झाली की, श्रीमंत झालेल्या चिंचेच्या झाडाचं इतकं मधाळ वर्णन मधुभाईंनी केलंय की, ते मुळातूनच वाचायला हवं. शेवग्याच्या शेंगांची आमटी, पिठलं याचा आपण आवडीन आस्वाद घेतो. या शेवग्याच्या झाडाशी पण मधुभाईचं सख्य. शेवग्यावर पण त्यांनी भरभरून  लिहिलंय.

‘पिंपळ’ या लेखात छोट्या पिंपळाच्या झाडाच्या मुंजीची आठवण रंगवून सांगितली आहे. वडाच्या झाडाबद्दल मधुभाई लिहितात, “रस्त्यावर वडाचे झाड नसेल तर रस्ता पोरका होतो. रस्त्याला पित्याची माया देणारं वडाचं झाड. या झाडाला मन असत माणसांचं आणि शरीर असतं झाडाचं. झाडं माणसांना जेवढी ओळखतात, तेवढी माणसं झाडांना ओळखत नाहीत. किती आतून आणि खरं लिहिलंय ना मधुभाईंनी!

बालकवींच्या कवितेतील ‘औदुंबर’ही आपल्याला ‘सोबत’ पुस्तकात भेटतो. ५ मे २०१७ पासून बालकवींच स्मृतीशताब्दी वर्ष सुरू झालं आहे. तेव्हा त्यांचं स्मरण करत, हा लेख नक्की वाचायला हवा.

खरं तर अनेक झाडांची मोहिनी मधुभाईंवर आहे. ‘बकुळ’ हे झाडही असंच, त्यांच्या मनात वावरणार. बकुळीच्या झाडाशी त्यांची अगदी गट्टीच जणू. त्यामुळे या झाडासंदर्भातल्या अनेक आठवणी त्यांनी जागवल्या आहेत. बकुळ फुलाला ‘ओवळी’ असंही म्हणतात. एका फुलझाडाचं नाव लावणाऱ्या ‘ओवळीये’ या गावाविषयीही मधुभाईंनी लिहिलं आहे.

माणसाला जशी दृष्ट लागते, तशी फणसाला दृष्ट लागते? सोनचाफ्याचा लाघवी स्वभाव, घराचं घरपण टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कावळे, नटण्या-मुरडण्याची हौस असणाऱ्या, तसंच भांडखोर आणि दक्ष गृहिणी असलेल्या मनस्वी चिमण्या, शहाणी गाढवं, पावसाची रूपं, मंतरलेलं आकाश, पाऊलवाटा हे सगळं मधुभाईंच्या शब्दातच वाचायला हवं.

झोपाळ्याबदद्ल तर मधुभाईंना इतका आंतरिक उमाळा आहे... की, झोपाळा म्हणजे त्यांच्या घरातील एक माणूसच जणू. आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारं, निसर्गाशी मैत्री करायला लावणारं, निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारं, मधुभाईंच्या नावाप्रमाणेच मधुर, मधाळ, रसाळ आणि कायम सोबत ठेवावं, असं हे पुस्तक.

विमल आनंदाची अनुभूती देणाऱ्या आणि शीर्षक सार्थ करणाऱ्या या पुस्तकाची सोबत घेऊन तर पाहा.

- दिपाली केळकर

[email protected]