अभिव्यक्ती 
अभिव्यक्ती. व्यक्त होणं ही माणसाची मूलभूत गरज. ते व्यक्त होताना प्रत्येकाचं माध्यम मात्र वेगळं असतं. लहानपणापासूनच आपल्याला भावना कशा व्यक्त करायच्या हे समजलं, भावभावनांना आपण योग्य दिशेने वाट करून देऊ शकलो, तर पुढे जाऊन तणावाचं व्यवस्थापनही  आपण योग्य पद्धतीने करू शकू. या उद्देशाने ५ - ६ वयोगटासाठी शिक्षणविवेकने   'अभिव्यक्ती' हे अभिनव उन्हाळी शिबिरे घेण्यात आली. 
 
'शिक्षणविवेक ' हे शालेय विद्यार्थ्यांसाठी ५ वर्षांपूर्वी सुरू झालेलं मासिक. अंकासोबतच गेले ४ महिने, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी www.shikshanvivek.com या वेबसाईटच्या माध्यमातून काम करत आहोत. मासिक व वेबसाईट यांच्या माध्यमाबरोबरीनेच मुलांबरोबर प्रत्यक्ष काम करणं हाही शिक्षणविवॆकचा एक उद्देश आहे. 
 

आजच्या पिढीसमोर निरनिराळे ताणतणाव आहेत. या ताणतणावाचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज ठरत आहे. त्यासाठी मुलांचा भावनिक गुणांक चांगला असणे गरजेचे असते. त्या भावनिक गुणांकावर या शिबिरामध्ये काम  करण्याचे  ठरले आणि झालेही. त्यासाठी नृत्य, नाट्य आणि दृश्य या माध्यमांच्या मदतीने वेगवेगळ्या भावना अनुभवता येतात आणि व्यक्तही  करता येतात, हे कृती-उपक्रमांतून मुलांना कळले. हे खाली दिलेल्या लिंक्स पहिल्या की लगेच लक्षात येईल. 
पारंपरिक कला तंत्र  शिकवण्याचा, त्याचे प्रशिक्षण देण्याचा हेतू यामागे नव्हता, तर प्रत्येक कलेनुरूप  स्वर, ताल, आवाज, रंग, रेषा, भाषा आदींचा उपयोग स्व-ओळख निर्माण करण्याकरता येतो हे मुलांपर्यंत पोहोचवले गेले आणि मुलांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. यातून तणावरहित, मोकळे होता येते, यातून आनंद मिळवता येतो, हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवता आले. या सगळ्याची परिणिती त्यांची अभिव्यक्ती बदलण्यात झाली हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शिबिराच्या सुरुवातीला बुजलेली मुले शेवटाकडे मात्र मनापासून रमलेली दिसली. त्यांच्यात सकारात्मक बदल होताना दिसले. त्याची पावतीही मुलांनी स्वतः अगदी नेमकेपणाने दिली, हे विशेष. 

 
शिबिराच्या शेवटच्या दिवशी मुलांमधील झालेले बदल पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही एक सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रालाही पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळेच भविष्यात अशा शिबिरांचं आयोजन करण्याचेही घाटले गेले.   
 
- प्रतिनिधी.