मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगात म्हणजे भू-गर्भात काय दडलयं याची उत्सुकता आपल्याला नेहमीच असते. भूगोलाच्या भू-अर्थशास्त्रात या शाखेतून आपण त्याचा आभ्यास करतो. ज्याप्रमाणे पृथ्वीचे अंतरंग जाणून घेण्याची इच्छा असते, त्याच प्रमाणे आपल्याला पृथ्वीपासून दूर असणाऱ्या, रात्रीच्या वेळी आकाशात चमकणाऱ्या ग्रह-ताऱ्यांविषयी देखील कुतुहल असतेच, परंतु आपण तिथपर्यंत पोहचतो, ते फक्त कल्पनेतूनच आणि स्वप्नातूनच! आणि या कल्पनेच्या आणि स्वप्नांच्या जगात आपण अगदी त्यांच्याशी संवाददेखील साधतो.

आई जेव्हा बाळाला चांदोमामाच्या, ताऱ्यांच्या गोष्टी सांगते, तेव्हा हे सर्व तारांगण जणू आपल्या घरातच नांदत असते.

या सर्व चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, उल्का यांचा अभ्यास भारतात फार प्राचीन काळापासून केला जात आहे. या अभ्यासालाच खगोलशास्त्र असे म्हणतात. खगोलशास्त्रात भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी केलेले कार्य हे अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्याची दखल जगाने देखील वेळोवेळी घेतलेली आहे.

पाचव्या दशकात चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडातील जगप्रसिद्ध असे गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी मांडलेला ग्रहताऱ्यांच्या संदर्भातील हिशोब आजदेखील तंतोतंत जुळताना दिसतो. सूर्य स्थिर आहे व इतर ग्रह त्याच्या सभोवती फिरतात हा सिद्धांत आर्यभट्टांनी गॅलिलिओच्या फार पूर्वीच सांगितला होता.

जेव्हा जग कालगणनेच्या विचारातसुद्धा नव्हते, तेव्हा भारतीयांनी चंद्राच्या स्थिती बदलानुसार दिनदर्शिका तयार करून ठेवलेली होती, आणि आज देखील ही दिनदर्शिका जिला आपण कॅलेंडर म्हणतो ते वापरत आहोत. ऋग्वेदात देखील ३६० दिवस, १२ महिने ३० दिवस यांची रचना करून दिग्दर्शिका केल्याचे आढळून येते. म्हणजेच कालबाह्य ठरणार नाही, अशा प्रकारचे ज्ञान जगासमोर मांडण्यात भारत नेहमी यशस्वी ठरल्याचे दिसते.

शातपथ नावाच्या खगोलशास्त्राच्या अभ्यासकाने तर सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतरदेखील सांगितले, पृथ्वी व सूर्य यांच्या व्यासाच्या १०८ वेळा ते आहे, असे तो म्हणतो. जे आजच्या मोजमापानाशी साधर्म्य दर्शवते.

आर्यभट्टांच्या सर्व ग्रंथसंपदा तेराव्या शतकातच लॅटिन (latin) भाषेत भाषांतर केली गेली, असा उल्लेख आहे. त्या आधारे युरोपियन लोकांना घनफळ काढण्याच्या पद्धती कळल्या.

न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्यापूर्वी ‘विराहमिहीर’ (इ.स.पूर्व ४७६) या खगोलशास्त्रज्ञाने वस्तू व स्वतःची जागा बदलत नाही, कारण वस्तूवर इतर बल कार्य करत असतात, असा सिद्धांत मांडला होता.

‘बम्ह्गुप्त’ या भारतीय खगोलशास्त्रज्ञाने (इ.स.पूर्व ५९८ मध्ये) पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो ३६,००० कि.मी. आहे, असे सांगितले. जे मूळ मोजमापाच्या अगदी जवळ जाते.

भारतीय खगोलशास्त्रज्ञांचा प्रभाव जगावर नेहमीच राहिलेला आहे. याच गौरवशाली वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या देशात सध्या कार्यरत असणारी आपली ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (ISRO). ज्याची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली आणि ज्याचे मुख्यालय सध्या अंतरीक्ष भवन, नवीन बेल, बंगलोर येथे आहे.

मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे ब्रीद वाक्य असणाऱ्या आपल्या ISROने जगातील सर्वच अवकाश संशोधन संस्थाचे विक्रम मोडले व स्वतःचा नवीन विक्रम रचला, तो म्हणजे १०४ उपग्रह एकाच अवकाशयानातून एकाचवेळी प्रक्षेपित करण्याचा १५ फेब्रुवारी २०१७ हा दिवस जगाला त्यासाठी नेहमीच स्मरणात राहील.

‘गरज ही शोधाची जननी’ या उक्तीला सार्थ करण्याचे काम पुन्हा एकदा भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी केले. १०४ उपग्रह अतिशय माफक खर्चात पृथ्वीच्या कक्षेत स्थिर करण्याचे काम ISROने केले. या पूर्वी रशियाने ३७ उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित केले होते.

मित्रांनो, ही फक्त आकडेवारी किंवा सांख्यिकी माहिती असून याचं विचार न करता आपल्या खगोलशास्त्रातील दैदीप्यमान इतिहास व अभिमान वाटावा असा वर्तमान म्हणून याकडे पहिले पाहिजे, कारण असे म्हणतात की, ‘जे स्वतःचा इतिहास विसरतात, ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत.’

अपूर्वा अग्रवालसारख्या एका ग्रामीण भागातील व सामान्य घरातील मुलीने जर ४०,००० विद्यार्थ्यांमधून उत्तीर्ण होऊन स्वतःचे स्थान ISROमध्ये वैज्ञानिक म्हणून निश्चित केले, असेल तर आपणही असे ध्येय मनाशी बाळगून राष्ट्र उभारणीस तत्पर होऊ या, चला तर मग!!! उत्तुंग भरारी घेऊ या!!!

     - गोपाळ रा. गरुड 

[email protected]