मुक्ताई

दिंनाक: 21 May 2017 15:09:28
मुक्ताई तुझी किती रूपे चितारली बाई....  

पुस्तकातील पाठांमधून असो, चित्रपटांमधून असो किंवा कीर्तन-प्रवचने कानावर पडलीच असतील तर त्यातूनही असेल कदाचित.., मुक्ताई आपल्या सगळ्यांच्या ओळखीची झाली आहे, ती संत ज्ञानेश्‍वरांची बहीण म्हणूनच.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पोरक्या झालेल्या, लोकांकडून वाळीत टाकल्या गेलेल्या, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या चार भावंडांना आधार होता तो ङ्गक्त एकमेकांचा! मांडे करण्यासाठी कुंभाराकडून भांडेही मिळत नाही म्हणून मुक्ताईला घरी परतावं लागलं, तेही अपमानित होऊन. अंगी योगसामर्थ्याची शक्ती असलेल्या ज्ञानदेवांच्या पाठीवर तिने मांडे भाजलेे नि निवृत्तीनाथांना प्रेमाने खाऊ घातलेे. अशी ही सोशिक, समंजस, प्रेमळ बहीण - मुक्ताई...!

जग ज्यांना माऊली म्हणून ओळखते, ते ज्ञानदेवच जगावर रागावून ताटीचं दार लावून घेतात त्या वेळी त्यांना आईच्या मायेने समजावणारी, ‘ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा!’ म्हणणारी विचारी मुक्ताई.

योगी पुरुषाचं वागणं कसं असावं, त्याने इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर रुसता कामा नये हे समजावताना, आपण ज्याला उपदेश करत आहोत, तो आपला मोठा भाऊ आहे. वयाने, ज्ञानाने, अधिकारानेही आपण त्याच्यापेक्षा लहान आहोत, हेही ती विसरत नाही.

‘कोणी कोणा शिकवावे?

सार शोधूनिया घ्यावे!

लडिवाळ मुक्ताबाई!

जीव मुद्दल ठायी ठायी!

तुम्ही तरोनी विश्‍व तारा!

ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा!’

असा आर्त संवाद साधण्यासाठी मुक्ताईने केलेल्या रचना पुढे ‘ताटीचे अभंग’ म्हणून लोकप्रिय झाल्या.

शके 1201 मध्ये विष्णुपंत-रुक्मिणी कुळकर्णी यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मुक्ताईला आयुष्य लाभलं ते केवळ 17-18 वर्षांचं!  अल्पायुष्य लाभलेल्या लहान वयाच्या मुक्ताईने नामभक्तीचे महत्व सांगणारे अभंगही रचलेले आहेत. नामदेव चांगदेव यांच्यासारख्या संतांना उपदेश करण्याची पात्रता मिळवलेल्या मुक्ताईने -

‘मुंगी उडाली आकाशी!

तिने गिळीले सुर्यासी!

थोर नवलाव झाला!

वांझे पुत्र प्रसवला!

माशी व्याली घार झाली!

पाहुनी मुक्ताई हासली!’

अशा प्रकारच्या कूटरचना केल्या. या कूटरचनेतील वास्तवापलीकडच्या कल्पना पाहिल्या की थक्कच व्हायला होतं. आपल्या वयाच्या, काळाच्या पुढचे विचार ती आपल्या रचनांमधून मांडते, तेव्हा तिच्यातील प्रगल्भतेचा प्रत्यय येतो. संत ज्ञानेश्‍वरांंच्या चरित्रातून मुक्ताईच्या कितीतरी कथा वाचायला मिळतात, ज्या वाचताना मुक्ताईची मूर्ती लहान पण किर्ती महान होती, याची खात्रीच पटते.

संन्याशाची पोरं म्हणून समाजाकडूनही अव्हेरली गेलेली ही भावंडं, जन्मतःच दुर्दैवी ठरलेली. आई-वडील निवर्तले तेव्हा मुक्ताई असेल साधारण तीन-चार वर्षांची. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या असामान्य म्हणून गणल्या गेलेल्या भावांच्या सहवासात, त्यांची धाकटी बहीण म्हणून ती वाढली. त्यांच्या सहवासात ती ज्ञानाने मोठी होत गेली, पण मुळातच आपल्याठायी असलेल्या तीक्ष्ण बुद्धीमुळे मुक्ताई, आपल्या अलौकिक तेजाच्या भावंडांपुढे झाकोळली गेली नाही.

वयाने लहान असलेली मुक्ताई, एक बहीण म्हणून, एक स्त्री म्हणून, तसेच एक माणूस म्हणूनही अतिशय तेजःपुंज आयुष्य जगली. अशा या मुक्ताईला तिच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करू या!

- चित्रा नातू

-[email protected]