मुलांची चित्रे

सुट्टी सुरू होऊन आता खूप दिवस होऊन गेले आहेत. अभ्यासाच्या धबडग्यात राहून गेलेलं खूप सगळं हुंदडून पण झालंय. आणि बाहेर पडायचं म्हटलं तरी उकाड्याने हैराण व्हायला होतंय. मग करायचं तरी काय? खूप चित्र काढायची, गाणी म्हणायची, कविता करायच्या, गोष्टी रचायच्या, नृत्य करायचं..... घरातच निवांत पसारा मांडायचा..... हा सगळा छान गोंधळ वेगवेगळा करता येतो, पण एकत्रही करता येतो. वेगवेगळा म्हणजे स्वतंत्र, ऐकट्याने आणि वेगवेगळ्या वेळीसुद्धा तर एकत्र म्हणजे मित्र-मैत्रीणींना घेऊन आणि एकाच वेळी! असं गोंधळून जाऊ नका. आपण बोलूच याच्यावर.

या सगळ्या कला आहेत ना म्हणजे चित्र, शिल्प, कविता किंवा गोष्ट रचणं, नृत्य करणं हे  सगळं ऐकमेकांना पूरक असतं. त्यांचा एकमेकांमधला संबंध आपल्याला कळला की, कलाकृती घडवायला खूप मज्जा येते. हे समजून घ्यायचं कसं? तर याचं उत्तर आहे सगळं मोकळेपणाने अनुभवायचं. काही गोष्टी तुम्हाला खूप छान जमतील, काही थोड्याश्याच जमतील तर काही खूप कमी जमतील. हरकत नाही. असं होऊ शकतं. त्यात निराश होण्यासारखं काहीच नाही. आवश्यक तिथे आपले पालक, शिक्षक आणि हक्काची मित्रमंडळी आहेतच की! त्यांची मदत मागायची. दोन पथ्य मात्र कसोशीने पाळायची एक म्हणजे ‘मला जमत नाही’ असं सारखं म्हणायचं नाही आणि दुसरं खूप महत्त्वाचं म्हणजे अनुकरण करायचं नाही. अनुकरण म्हणजे मराठीत ज्याला अलीकडे copy म्हणतात ते!

आता थोडं चित्राच्या अंगाने बोलू या. मला चित्र काढायला खूप आवडतं. लहानपणापासून चित्र काढायला आवडायचं म्हणून मी माझं महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा चित्रकलेच्या महाविद्यालयात जाऊन पूर्ण केलं. आता मी चित्रकला शिकवते! तर माझ्या छोट्या दोस्त मंडळीचे पालक त्यांच्या मुलांची म्हणजे माझ्या दोस्तांची चित्र घेऊन माझ्याकडे येतात. चित्रं छान दिसतात, पण बरेचदा मला जाणवतं की ती copy केलेली असतात. अशा copy केलेल्या चित्रांचे विषयसुद्धा बरेचदा अॅनिमेशनमधली पात्र, सुपर हिरो किंवा मग बॉलीवूडमधले हिरो, हिरोईन क्वचित गाड्या किंवा चित्रकलेच्याच पुस्तकातले copy केलेले देखावे असे असतात.

वर्गातसुद्धा चित्रकलेच्या तासाला शिक्षक निसर्गचित्रण म्हणजेच देखावा काढायला सांगतात तेव्हा आपल्यापैकी बरेचजण काय काढतात? पाच त्रिकोणी डोंगर, त्यामागून येणारा किंवा जाणारा अर्धा सूर्य, घर, नारळाची किवा आंब्याची झाडं. मराठी ४ आकड्याप्रमाणे दिसणारे पक्षी! माझी एक मैत्रीण तर डोंगरांचे आकार चुकायला नकोत म्हणून ते पट्टी वापरून काढायची! आता आपण जरा आठवून बघू या की आपण गावी जातो किंवा फिरायला दुसऱ्या प्रदेशात जातो तेव्हा असा देखावा दिसतो का? तुम्ही नॅशनल जॉग्रफी चॅनेल बघता का? त्यात अनेक प्रदेश दाखवतात, त्यात असा देखावा असतो का? विचार केला की लक्षात येईल, प्रत्येक प्रदेशाची एक संस्कृती असते, त्याप्रमाणे तिथला निसर्ग असतो. सह्याद्रीचे डोंगर आणि हिमालयाचे डोंगर यांच्यात आकार रंग यांचा किती फरक आहे? प्रत्येक प्रदेशाच्या हवामानानुसार घरं, माणसांचे कपडेलत्ते यात विविधता आहे. आपण त्याचं निरीक्षण करतो का? तो अनुभवतो का? हा अनुभवलेला निसर्ग जर आपण काढला तर ते चित्र आपलं असेल. जर तसं न करता आपण चित्र काढलं, तर ते चित्र छान दिसेल; पण दुसऱ्या कुणाच्यातरी कल्पनेवर आधारित असेल आणि तुमचं अनुकरण (copy) करण्याचं कौशल्य ऐवढयापुरतंच ते मर्यादित राहील.

आता निसर्ग देखावा हे एक उदाहरण झालं. या अनुषंगाने तुम्ही विचार करा. त्यासाठी काही पर्याय मी सुचवते आहे. त्यात तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने जरूर भर घाला.

  • तुम्हाला सुपरहिरोची चित्र काढायला आवडतात का? मग नवीन कॅरॅक्टर तुम्हालाही तयार करता येईल. त्याचं नाव आणि कर्तृत्व काय असावं याचा जरूर विचार करा.

  • निसर्गचित्रण करायला आवडतं असेल तर फिरायला जाताना अगदी बागेत जाणार असलात तरी चित्रकलेची छोटी वही आणि पेन्सील (खोडरबर नको!) किंवा पेन घेऊन जा आणि प्रत्यक्ष चित्रण करून बघा. गंमत म्हणून घरीच दहा वेगवेगळ्या प्रकारची झाडं काढून बघायला हरकत नाही. त्यात नारळाचं आणि नेहमी काढतो तसं आंब्याचं (म्हणजे मोठ्ठा ढगासारखा आकार त्याला इंग्रजी Y आकारचं खोड आणि फांद्या) झाड काढायचं नाही हे पथ्य! मित्र मंडळी जमवून हा स्वाध्याय केलात तर ही झाडं एकमेकांना दाखवून चर्चा पण करता येईल. नारळाचं झाड त्या झाडांच्या समोर बसून काढायचा प्रयत्न करा. ते करताना झाडातून दिसणारं आकाश पाहण्याचा आणि झावळ्याची सळसळ ऐकण्याचा अनुभव मात्र जरूर घ्या.

  • माणसाचं चित्र काढायला आवडत असेल तर बागेत, रेल्वे स्टेशनवर चित्रकलेची छोटी वही घेऊन जायची आणि रेखाटनं करायची. तुमच्या गावातल्या अशा थोड्या गर्दीच्या इतर जागा पण शोधता येतील अर्थात इथे घरातल्या मोठ्यांची मदत आवश्यक. मात्र चित्रकलेच्या पुस्तकातली माणसं copy करायची नाहीत. व्यक्तिचित्रण करायला म्हणजे चेहरे काढायला आवडत असतील तर आई, बाबा, दादा, ताई, आजी, आजोबा  अशी हक्काची माणसं समोर बसवायची आणि त्याची चित्र काढायची. सुरुवातीला हुबेहूब जमणार नाही कदाचित, अशा वेळी सूचनांपेक्षा प्रोत्साहनाची गरज आहे, हे मोठ्यांनी लक्षात घ्यायचं.

  • चित्र काढायला खूप आवडतं, पण माणसाचं चित्र काढायला अजिबात आवडत नाही आणि येतही नाही, त्यांनी आणि आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं की, चित्र काढणं म्हणजे फक्त हुबेहूब माणूस काढता येणं नाही. चित्रकलेचं जग खूप विस्तारित आहे आणि माणसाची चित्र हा त्यातला केवळ एक छोटा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला आवडतं ते चित्र काढणं महत्त्वाचं.

  • मग चित्रासाठी विषय कोणते शोधायचे? तर असे विषय शोधा जे तुम्हाला आवडतात आणि असे विषय पण शोधा जे शोधण्यासाठी पण कल्पनाशक्ती वापरावी लागेल. उदाहरणार्थ, वर म्हटलं तसं तुम्ही केलेल्या एखाद्या किंवा आवडत्या कवितेसाठी चित्र काढा. आधी चित्र काढून त्यावर पण कविता, गोष्ट लिहिता येईल. छानस गाणं ऐकून किंवा नृत्य करून/बघून त्यातल्या लयीचा विचार करा. त्या लयीचं चित्र काढता येईल. पांढऱ्या कागदा ऐवजी काळ्या, निळ्या कागदावर चित्र काढून बघता येईल. गव्हाचं मळलेलं पीठ किंवा रांगोळी वापरून जाड पुठ्ठ्यावर चित्र काढता येईल.

एकंदरीत काय तर विषय, माध्यम यांच्या साहाय्याने रंग-रेषांचे खूप प्रयोग करून बघणं महत्त्वाचं. असे प्रयोग करतानाच चित्र सापडत जातं जे आपलं असतं. असं स्वतःचं चित्र तुम्ही काढत असाल तर छानच आहे, पण चित्र काढायला आवडत असूनही हा विचार केला नसेल तर आता जरूर करा आणि काय मज्जा आली ते आम्हाला कळवा!

- माणिक वालावलकर

[email protected]