हिमानीचं ध्येय आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचं.
हिमानीला मुलाखतीला बोलावलं, तेव्हा १० वी  झालेली हिमानी एकटीच आली होती. तेही दिलेल्या वेळेत. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपल्या आसपास असल्याने कसं छान वाटतं, उत्साही वाटतं, तसं वाटलं होतं, हे नमूद करावंसं वाटतं आहे. तिचा हसरा चेहरा, तिच्यातला आत्मविश्वास, आईवडिलांवरची श्रद्धा, आपल्या खेळावरचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तरीही तिच्यातली एक छोटी मुलगीही कुठेतरी डोकावत होती.
 
अलीकडे आलेल्या 'दंगल' चित्रपटामुळे पालकांना गीता-बबिताचं  उदाहरण आपल्या पाल्यांना देता येतंय. गीता-बबिता तयार कशा झाल्या, त्यांच्या कुटुंबाने; विशेषतः गुरू असलेल्या वडिलांनी त्यांच्यासाठी काय काय केलं असं बरंच काही लक्षात ठेवलं जातंय. मीही हा चित्रपट पाहिला. मलाही पालक म्हणून असंच वाटलं आणि त्यानंतर मला भेटलेली हिमानी पाहून, तिची जडणघडण पाहून जणू काही पुढची गीता-बबिता तयार होतेय असंही जाणवलं.
 
कोण आहे ही हिमानी?
 
यंदा १० वीची परीक्षा दिलेली शालेय विद्यार्थीनी हिमानी चौंधे ही पुण्याजवळील छोट्याशा भूगावमधली रहिवासी आहे. हिमानी ही एक रायफल शूटर आहे. रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात तिने आजवर ४० हून बक्षिसे पटकावली आहेत. ती या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. केवळ रायफल शूटिंगच नाही, तर तिला वक्तृत्व स्पर्धेतही अनेक बक्षिसे मिळाली आहेत. हे सगळं कसं काय शक्य आहे? कसं  साधलं तिने हे सगळं? का बरं मला वाटलं, की ही गीता-बबिता होऊ शकते?
 
 
हिमानीची जडणघडण
 
मिलिटरीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आजोबांची ही नात आणि प्रत्यक्ष शाळा-कॉलेजात न शिकता जगाच्या बाजारात शिकलेल्या, पण  शिक्षणाचं महत्त्व जाणलेल्या आई-वडिलांची, वाचन असणाऱ्या बाबांची ती लेक.  हिमानी भूगावमध्ये वाढली. तिथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत ७ वीपर्यंत शिकली. तिथल्या शिक्षकांमुळे आणि वडिलांमुळे  ती चांगली चांगली पुस्तकं वाचू लागली. (तोत्तोचान, मृत्युंजय, श्यामची आई ही पुस्तकं तिला आवडू लागली.)  जे समजलं नाही, ते शिक्षक समजावू लागले. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त हिमानीला वक्तृत्व कलेत रस वाटला. त्यात  शिवाजी, महिला, सामाजिक विषय यात तिचा हातखंडा झाला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही ती सहभागी झाली. हे सगळं तिने केलं, कारण आई-बाबा काही करायला नाही म्हणत नव्हते. तिच्या बाबांनी तिला एकच सांगितलं होतं, "जे करते आहेस, त्यातून काय साध्य होणार आहे याचा पूर्ण  विचार कर आणि मगच ते कर आणि ते पूर्णही कर." 
 
लहान वयापासूनच आई-बाबांच्या प्रोत्साहनामुळे ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकली. तिने प्रत्येक गोष्ट सजगपणे, विचारपूर्वक केली. त्यातलीच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायफल शूटिंग. तिला ८वीत असताना रायफल शूटिंगसारखा खेळ तिच्या समोर आला. त्यात प्राविण्य मिळवण्याचा विचार तिने केला. त्यांचे एक ग्रामस्थ फडके सर यांनी या खेळासाठी जागा उपलब्ध करून दिली. शिंदे सरांनी मदत केली आणि तिचा सराव सुरू झाला. १० मीटर मधल्या ओपन साईटवर इंडियन वेपन घेऊन हिमानी खेळू लागली. खेळायला लागल्यावर तिने मागे पाहिलं नाही. खेळात पूर्ण लक्ष देण्यासाठी तिने मोठयांच्या सल्ल्याप्रमाणे प्राणायाम, मेडिटेशन सुरू केलं. पहिल्या स्पर्धेपासूनच म्हणजे २०१४ मध्ये ओपन साईट १० मीटर स्पर्धा झाल्या, तेव्हापासून त्यातल्या जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर या सर्व स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला. भूगावमध्ये असलेल्या छोट्याशा शूटिंग रेंजमध्ये सराव करून ती पुढचं यश पादाक्रांत करत गेली. केवळ स्वतंत्र नाही, तर रायफल शूटिंग सांघिक खेळातही तिने कौशल्य दाखवलं. महाराष्ट्रातसोबतच अन्य राज्यातल्या स्पर्धामध्येही ती खेळली.
 
भूगावमधून चांगली शूटिंग रेंज मिळण्यासाठी ती ९ वीत असताना पुण्यातल्या 'रेणुका स्वरूप' या शाळेत आली. इथे एम.इ.एस. संस्थेने सुरू केलेली सुसज्ज  शूटिंग रेंज, इथले आनंद आणि उज्वला बोर्डे हे प्रशिक्षक यामुळे ती रायफल शूटिंगच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली. त्यासाठी शाळेने तिला रोज शाळेच्या अर्ध्या वेळेत सरावाची परवानगी दिली. तास-तास केवळ रायफल एका जागी स्थिर घेऊन पोझिशन घ्यायचा सराव तिने केला. एकाग्रतेसाठी शांत संगीत ऐकलं. टीव्ही पाहण्यापेक्षा शाळा आणि सराव यांतून उरलेल्या वेळेत तिने लहान मुलांशी खेळणं, वाचन, कुटुंबामध्ये वेळ घालवणं याला नेहमीच प्राधान्य दिलं. त्यामुळे तिला कायमच कुटुंबाची साथ मिळाली. भावनिक भक्कमपणा आला. मानसिक स्थैर्यही लाभलं.
मानसिक स्थैर्याप्रमाणेच शारीरिक ताकदही तितकीच महत्त्वाची! त्यासाठी तिने जिम सुरू केलं. तेही १० वीत असताना.  
 
शालेय जीवनातलं दहावीचं वर्ष खरंतर केवळ शिक्षणासाठीच महत्त्वाचं मानलं जातं, पण हिमानीने मात्र या वर्षी सकाळी ६ ते ७ जिम, ८ ते १० शालेय अभ्यासासाठी क्लास, सव्वादहाची बस पकडून साडेअकराची शाळा , साडेतीनला शूटिंगचा सराव, संध्याकाळी ७ वाजता घरी परत अशा वेळापत्रकात आपल्याला फीट ठेवलं. याशिवाय तिने स्मार्टफोनलाही लांबच ठेवलं. स्पर्धा खेळल्या. जिंकल्या. अभ्यासातल्या संकल्पना शिक्षकांकडून समजावून घेतल्या. त्यामुळे आणि मानसिक - शारीरिक स्वास्थ्यामुळे  घरी वेगळा अभ्यास करावा लागला नाही. परीक्षा उत्तम प्रकारे दिली.
पी वी सिंधूच्या दर्शनाने प्रभावित हिमानी
 
४० हून बक्षिसे पटकावली आहेत हिमानीने
हिमानीची खेळण्याची पद्धत
 
रायफल शूटिंगमध्ये इंडियन वेपनपेक्षा जर्मन वेपनने खेळणं या खेळात पुढे जाण्यासारखे आहे. ते हिमानीने यापूर्वीच सुरू केलंय. यात अधिक एकाग्रता हवी असते. कारण या खेळात १ मिनिटालाही किंमत आहे. एक मिनिट, एक शॉट, १० पॉईंट्स  असतात. त्यासाठी ती शांत राहण्याचा प्रयत्न करते. शक्यतो सकाळची स्पर्धा निवडते. स्पर्धेच्या आदल्या दिवशी जास्त कुणाशी बोलत नाही. शांत संगीत ऐकते. फास्ट फूड ती एरवीही टाळते. पण स्पर्धेच्या काळात काटेकोरपणे टाळतेच. हे सगळे स्पर्धेचे नाही, तर तिने स्वतः साठी केलेले नियम आहेत. स्व-नियमांमुळे ते अधिक प्रभावी ठरतात. त्याचं दडपण येत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम अधिक चांगला साधला जातो.
 
 
 हिमानीच्या आगामी योजना
 
पिप साईट आणि ओपन साईट हे रायफल शूटिंगमधले  दोन प्रकार आहेत. वडील तिला ओपन साइटपेक्षा आता पिप साईट खेळ असं सांगतात. या खेळातली पिप साईटही तिनं खेळायला सुरू केली आहे. आता भारतातला पिप साईटचा सर्वोच्च स्कोअर ४२० च्या पुढे न्यायचं तिच्या मनात आहे. ओपन साईटला तिचा स्वतःचा रेकॉर्ड ३६५ आहे. तो तिला ब्रेक करायचा आहे. तिला स्वतःला टेन्शन न घेता खेळायचं आहे. कारण ती म्हणते, "टेन्शन बुद्धीला पोकळ करतं."  
 
वडिलांनी पाचवीत असतानाच आपलं ध्येय ठरवायला सांगितल्यामुळे हिमानी आज या ठिकाणी येऊन पोहोचली आहे. ती स्वतःचा विचार करते आहे, स्वतः ठरवते आहे, ध्येयनिश्चिती करते आहे. रायफल शूटिंगसारखा खर्चिक खेळ खेळवताना तिचे वडीलही राष्ट्राच्या ध्येयाप्रती ते करत आहेत. त्यांचा या इच्छेला आणि हिमानीच्या सगळ्या कष्टांना सुयश नक्कीच मिळेल, याची खात्री तिच्याशी बोलताना वारंवार वाटत होती. 
 
-पल्लवी गाडगीळ.