थोडक्यात सारांश आलेला निबंध म्हणजे चांगला निबंध का ?

मित्रमैत्रिणींनो,

इयत्ता कोणतीही असो भाषा विषयात तुम्हाला निबंध लिहावेच लागतात. अगदी लहानपणी ५ ओळींचे ते मोठे झाल्यावर २५ ओळींचे. हे लेखनकाम काहींना आनंददायी वाटतं, तर काहींना कंटाळवाणं! निबंध, पत्र, गोष्ट, वृत्तांत बातमी, कल्पनाविस्तार हे सारे लेखiiiन प्रकार हाताळताना त्यात गंमत कशी येईल, आनंद कसा वाटेल हे आपण पाहिलं पाहिजे.

महत्त्वाचं म्हणजे आजच्या या धावत्या आणि संगणकाचा जगात शब्दांचं महत्त्व कमी होत चाललंय की काय असं काहीसं वाटू लागलंय. या नव्या पिढीतील मुलांचा कल खूप थोडक्यात लिहिण्याकडे जाणवतो आहे. फोनवर मात्र तासनतास गप्पा मारायला आवडतं. अर्थात त्या बोलण्यात सर्व भाषांची सरमिसळ शॉर्टफॉर्मस हेच जास्त असतात. उदा., ए आज हिस्ट्रीच्या तासाला खूप बोअर झालं यार, मग बसलो टीपी करत! (टाईमपास) बघा, जरी तुम्ही तुमचं मन मोकळं करत असलात तरी निबंधात ते सुसंगत योग्य भाषेत असावं लागतं. आज आपण निबंधासंबधीच थोडी चर्चा करू. निबंध लेखनासाठी तुमच्याकडे पुढे दिलेल्या काही गोष्टींची आवश्यकता असते.

१)    शब्दसंग्रह (नाम, विशेषणं, क्रियापदे इ)

२)    चांगल्या म्हणी, सुविचार, सुभाषिते, काव्यपंक्ती इ.

३)    विषयानुसार माहिती, ताज्या घडामोडी वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे इ.

४)    आवांतर वाचन, उत्तम भाषणं ऐकणं, रेडिओ-टीव्हीवरील उपयुक्त चर्चा, बातम्या, कार्यक्रम ऐकणं, पाहणं इ.

५)    आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहणे,

६)    संवेदनशील असणं.

- निबंध लिहिताना आपल्याला त्या विषयाचे मुद्दे काढावे लागतील. पेपरमध्ये निबंधाच्या विषयासाठी एका पानावर कच्चे काम जरूर करावे.

- निबंधाला कोणते शब्द, काव्यपंक्ती लागणार आहेत  त्याची नोंद त्या कच्च्या पानावर करून ठेवावी. लिहिताना पटकन सुचत नाही, तेव्हा त्या पानावर पाहता येते.

- आपल्याला कोणत्या प्रकारचा निबंध जास्त चांगला लिहिता येईल ते ठरवून त्याची चांगली तयारी करावी.

- निबंधाची सुरुवात वेगळी, आकर्षक एखाद्या प्रसंगाने उल्लेखाने, काव्यपंक्तीने, सुविचाराने, संस्कृत सुभाषिताने अशी कोणत्याही प्रकारे करता येते.

- योग्य परिच्छेद, समास सोडून सुस्पष्ट चांगल्या अक्षरात, सुसंगत असं लेखन असावं,

- निबंधाचा शेवटही काही ठराविक विचार मांडणारा काव्यपंक्ती सुविचाराने होणारा किंवा अन्य आकर्षक पद्धतीने केलेला असावा.

- माहिती देताना ती खरी असावी वर्तमानपत्रांतील बातम्यांचा उल्लेख असेल तर तसे लिहावे.

- काल्पनिक निबंधात कल्पनेला वाव द्यावा.

- त्या विषयाबाबत तुमचं स्वतःचं मत अवश्य मांडवं.

- खूप शब्दबंबाळ लेखन असू नये.

- उदा., दुष्काळाशी संबधित निबंधासाठी तुम्हाला रखरखीत भेगाळलेली, तप्त लाही लाही होणे, शुल्क, तहान (तृषा), दीनवाणे बिकट, अवस्था सुकणे खडखडाट, कोरडे, इ. काही शब्द आवश्यक असतात, त्यांची नोंद करावी. 

वाक्प्रचार – ऊन मी म्हणणे, लाही लाही होणे, कंठशोष होणे, उपासमार होणे, शुल्क पडणे, रया जाणे, इ. वाक्प्रचार आपल्या लेखनात यावेत म्हणून निबंधाची तयारी करताना हे कच्चे काम केले पाहिजे.

निबंध लिहिताना निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, वर्णनशैली, अचूक शब्दयोजना, स्वतःचे अनुभव, दैनंदिन घडामोडीची माहिती, हे सारं असावं लागतं आणि ते तुम्हा सगळ्याकडे असतंच, पण फक्त त्यांची मांडणी योग्यप्रकारे करता आली की झालं! आता उदा., पावसाशी संबधित निबंध लिहिताना तुम्ही कधीतरी अनुभवलेला पाऊस कवितेत, धड्यात वाचलेलं पावसाचं वर्णन, पावसाची गाणी, पावसाचे फायदे तोटे पुराच्या बातम्या दुष्काळाच्या बातम्या, पावसातले पर्यटन असे अनेक पैलू विचारात घ्यावे लागतील.

    एखाद्या प्रसंगाने सुरुवात करावी लागेल, जेव्हा अचानक पाऊस येतो...

असा विषय असेल तर अचानक पाऊस येतो, तेव्हा काय गडबड उडते, सभोतालच्या वातावरणात काय बदल होतात, पक्षी, प्राणी, झाडे, माणसं, घरं, फेरीवाले, दुकानदार, रस्ते वाहनं या सगळ्यावर पावसाचे काय परिणाम होतात याचा विचार करून वर्णनात्मक शैलीने लिहावं लागेल. अचानक पाऊस आला की काय काय होतं हे वर्तमानकाळातच लिहावं लागेल मात्र मी अनुभवलेला पाऊस या विषयात भूतकाळी वर्णन करावे लागेल.

एखादा व्यक्तिचित्रणात्मक निबंध असेल तर, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व बाह्य व आंतरिक असे दोन्ही वर्णन करावे. व्यक्तीचे गुण व दोष किंवा त्रुटीही लिहाव्या. माणूस काही नेहमी फक्त चांगल्याच गुणांनी युक्त नसतो, तर त्या व्यक्तीच्या स्वभावात काही त्रुटी असतात. त्याही, निरीक्षण असेल तर लिहिता येतात किंवा काल्पनिक लिहिल्यातरी चालतील

उदा. माझी आई/वडील/मित्र/आदर्श व्यक्ती/आजी/आजोबा हे लिहिताना फक्त चांगले चांगले न लिहिता दोषही वर्णन करावेत

उदा., माझा मित्र गुणी आहे, समंजस आहे; त्याचे हस्ताक्षर म्हणजे अगदी मोतीच!

ह. पण... तो थोडासा धांदरट आहे आणि एक नंबरचा विसराळू. तंद्रीत असला की समोरचा काय बोलतोय हे लक्षात येत नाही. थोडासा लहरी असल्याने कधी रागावेल नेम नाही! 

निबंध सर्वसाधारणपणे खालील प्रकारचे असतात –

१.    आत्मकथनात्मक उदा., मी वृक्ष बोलतोय.

२.    वैचारिक उदा., जीवनात शिक्षणाचे महत्त्व 

३.    कल्पनात्मक उदा., पाऊस पडला नाही तर....

४.    चरित्रात्मक / व्यक्तिचित्रणात्मक उदा., मित्र असावा असा

५.    वर्णनात्मक उदा., समुद्रकिनाऱ्यावरील सफर

६.    प्रसंगावरून निबंध उदा., मला जेव्हा राग येतो..

७.    कल्पनाविस्तारात्मक निबंध उदा., एकी हेच बळ...

तुमच्या मराठी, हिंदी, इंग्लिश या पाठ्यपुस्तकांतील धडे, कवितांच्या खाली लेखनासाठी जे विषय दिलेले असतील त्यांचा सराव करा.

 निबंध लिहूनच पाहावा लागेल. नुसती तोंडी चर्चा किंवा चिंतन न राहता तो हाती लिहावा. तपासून घ्यावा. मित्रांबरोबर सरावासाठी वरील प्रत्येक प्रकारचा एक विषय लिहून पहावा.

अशा प्रकारे, निबंधाची तयारी केलीत तर तुम्हीच असाल तुमच्या निबंधाचे शिल्पकार!

श्रवण, वाचन, भाषण, लेखन संभाषण या सर्व कौशल्याचा उत्तम परिपाक म्हणजे निबंध! असा निबंध पाहावा लिहून!

- चारुता शरद प्रभुदेसाई

[email protected]