खेळ गणिताचा  

शिक्षकाचे नाव : संजय दत्ताराम शेळगे  

शिक्षण :   एम. एस्सी.एम.एड.

शाळेचे नाव :  जिल्हा परिषद हायस्कूल, कन्या नायगाव;  ता. नायगाव. जि. नांदेड  

१७ वर्षे नांदेड जिल्ह्यातील झेड.पी.च्या शाळेत कार्यरत असलेल्या संजय दत्ताराम शेळगे यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मागे पडू नये, गणित विषय त्यांना सोपा व्हावा, स्पर्धात्मक जगात त्यांनी पुढे यावं यासाठी प्रयत्न केले. स्वतः घेत असलेल्या प्रशिक्षणादरम्यान समजलेल्या अनेक खेळांचा आधार घेत त्यांनी विनाखर्च, उपलब्ध साधनांमधून 'मॅथंबोला' हा  खेळ तयार केला. गणित सोडवण्याची सवय लावणं, अवांतर गणितं  सोडवणं, गणिती क्रियेतील अचूकता आणि तर्कशुद्धता वाढवणं, पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं, यांसाठी त्यांनी 'मॅथंबोला' हा खेळ प्रकल्प सुरू केला. जादा तासामध्ये मनोरंजनातून स्पर्धा परीक्षेच्या गणिताची तयारी करवून घेण्यासाठी हा नवोपक्रम घेण्याचे संजय शेळगे यांनी ठरवले.

हा खेळ नियमितपणे शाळेत, विविध शिबिरांत आणि विशेष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना खेळायला दिला. खेळ खेळताना सर्व विद्यार्थ्यांना रांगेत बसवण्यात आले. सुरुवातीला सर्व नियम समजावून सांगितले. वेळेचे नियोजन समजावून सांगितले. सुरुवातीस ३० सेकंद व ६० सेकंद या वेळेत उत्तरे मिळण्यासारखी उदाहरणे सांगण्यात आली. सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी तिकिटावर खोडत आहेत, हे पाहण्यासाठी शिक्षक नेमण्यात आले. पहिले पाच खेळ जिंकण्यासाठी ३० सेकंद व ६० सेकंद या वेळेत उत्तरे मिळणारी उदाहरणे होती. चार कॉर्नरच्या खेळासाठी ९० सेकंदाची उदाहरणे सांगितली. फुल हाउसच्या खेळासाठी १२० सेकंदाची उदाहरणे सांगितली. विद्यार्थ्यांना सराव झाल्यावर तत्काळ उदाहरणे सोडवून तिकीटावरील उत्तरे खोडू लागले.  त्यातून गणिती अचूकता प्राप्त झाली, गणितासह इतर विषयांचीही गोडी लागली, शाळेविषयी ओढ निर्माण झाली, बौद्धिक विकास साधण्यासाठी मदत झाली, स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळू लागलं, समाजाचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक झाला, विद्यार्थ्यांचा शहरी शाळेकडे जाण्याचा वेग मंदावला. या यशस्वी उपक्रमासाठी संजय दत्ताराम शेळगे यांना शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

शैक्षणिक उपक्रम कसे वेगळे असतात ते वाचा. 

स्मार्टटीचर -विनोद सुरवसे

- [email protected]