रेशमाची प्रक्रिया....

इ. स. पूर्व २६४० सालामध्ये चीनमध्ये सिल्कच्या धाग्याचा उपयोग  झाला असावा, असे आढळून  आले आहे .एका चिनी दंत कथेनुसार राजा  हु-हेंग-हि याने आपल्या  सरदाराना एक शोध घेण्यास  सांगितले. कारण त्याच्या उपवनातील मालाबारीच्या झाडांचे बरेच नुकसान होत होते.  त्याचे कारण शोधून काढण्याचा आदेश, त्याने त्याच्या सरदारांना दिले. परंतु त्याची राणी सी -लिंग-ची हिला असे आढळून आले की, काही अळ्या त्या मलाबारीच्या  झाडाची पाने खात आहेत . तिला असे  देखील आढळून आले की, या  अळ्या त्यांच्याभोवती एक प्रकारचा कोष तयार करीत आहेत .

हे  निरीक्षण करीत  असताना अनवधानाने एक कोष चहाच्या कपात पडला. त्याबरोबर एक तलम  धागा त्या कोषापासून अलग झाला. तेव्हांपासून सी –लिंग –चिने मालाबारीच्या पानावर सिल्कच्या अळीला पोसण्यास सुरूवात केली. याचबरोबर सिल्कचा धागा तयार होण्यास प्रारंभ झाला.  त्या काळी सिल्क इतके मौल्यवान होते की त्याला सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व प्राप्त झाले. सिल्क निर्मितीच्या उद्योगास प्रथम चीनमध्येच सुरुवात झाली. परंतु हे गुपित शेकडो वर्षे लोकांपासून दूर ठेवले गेले. त्यानंतर काही काळाने या उद्योगाची ओळख आशिया खंडाला झाली. दोन चिनी भिक्षुकांनी सिल्क वर्मची अंडी पोकळ बांबूंमधून अवैध मार्गांनी आणली. काही काळातच सिल्कसारखा तलम धागा आणि त्याचे उत्पादन आशियातील इतर राज्यांमध्येही होऊ लागले. अशा रीतीने सिल्कचा प्रसार जगभर झाला.

असा प्रवास करत या सिल्कच्या धाग्याचे गुपित रोमन साम्राज्यापर्यंत पोहोचले. १३०० सालापर्यंत इटलीनेदेखील सिल्क तयार करण्यात प्रगती केली. यानंतर फ्रान्सनेदेखील  उत्पादनात इटलीवर बाजी मारली. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर चीन आणि जपानने परत अव्वल क्रमांक मिळवून आपले स्थान मिळवले.

हे रेशीम कसे  तयार होते  आपण थोडक्यात पाहू.

रेशीम अळीचे जीवनचक्र हे अंडी, अळी, कोष आणि पतंग या अवस्थांमधून ४८ ते ५२ दिवसात पूर्ण होते.

१. अंडी  अवस्था    १० ते  १२  दिवस

२ . अळी अवस्था    २५ ते २६ दिवस

३. कोष अवस्था     १० ते १२ दिवस

४.  पतंग अवस्था     ३ ते ४ दिवस

अळी अवस्थेमध्ये फक्त तुतिचा पाला अळ्यांना खायला दिला जातो. अळी मोठी झाल्यावर तुतीच्या झाडाच्या फांद्या कापून आणून अळ्यांना खायला दिल्या जातात. साधारण २५ ते २६ दिवसात आळी स्वत: भोवती रेशीम कोष तयार करते.

हे कोष नंतर रेशीम कीटक संगोपनगृहात ठेवले जातात.

या अळीचे संगोपन हे मुख्यत्वे २२ ते  २८ सें.ग्रे. तापमान व ६० ते ८५ % आर्द्रता असणाऱ्या  वातावरणात केले जाते.  २६  दिवसानंतर अळीचे पाला खाण्याचे प्रमाण कमी होऊन ती  तोंडावाटे रेशमाचा धागा सोडण्यास सुरुवात करते. अशा वेळेस ही अळी बांबू किंवा प्लास्टिकवर सोडण्यात येते. अळी स्वत:भोवती धागा गुंडाळून घेते. हा  धागा जवळपास १००० ते १२०० मीटर लांबीचा असतो.

या कच्च्या रेशमाच्या धाग्यावर वाइंडीग, डबलिंग, टीन्गस्टीन्ग, सेटिंग, याकिंग, डिगमींग व ब्लीचिंग, तसेच वार्पिन्ग, बीम सांधणी, कांडी भरणे आणि विणकाम इत्यादी प्रक्रिया केल्या जातात आणि मगच आपल्याला रेशमी कापड मिळते.  

असा आहे  हा रेशमाचा इतिहास.

-सुनीती भागवत

[email protected]