कोकणातील पारंपरिक भांडीकुंडी

 

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर|

आधी हाताले चटके, तवा मियते भाकर||

बहिणाबाई चौधरी यांच्या अहिराणी बोलीतल्या या प्रसिद्ध ओव्या. स्वयंपाकघरातल्या अनेक साध्या साध्या कृतींच्या उदाहरणातून त्यांची कविता फुलत जाते. स्वयंपाकघर, तिथे होणारे दैनंदिन व्यवहार आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात आणि तिथे वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे जणू काही घरातील माणसंच. आज आपण कोकणातल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

ग्रामीण भागातल्या स्वयंपाकघराची मुख्य ओळख म्हणजे तिथली चूल. आमच्या गावी वेगवेगळ्या प्रकारच्या चुली होत्या. एक म्हणजे घरातली स्वयंपाक करायची चूल. स्वयंपाकघरातील एका भिंतीला लागून क्रमाने २-३ चुली असत. या दोन चुलींच्या मध्ये एक छोटीशी चूल असे. दुधासाठी एक वेगळी चूल असे, जिला दुधाणी किंवा थारळ म्हटलं जात असे. पूर्वीच्या काळी आतासारखे फ्रीज नव्हते. दूध हा नाशिवंत पदार्थ आहे हे आपण जाणतो. दूध व्यवस्थित तापवलं गेलं नाही, तर लवकर नासतं. ते नासू नये म्हणून साध्या चुलीवर ते पूर्ण उकळून घेतलं जाई आणि मग ते निखारे ठेवलेल्या एका चुलीवर म्हणजेच दुधाणीवर ठेवून दिलं जाई. यामुळे दूध कायम गरम राहात असे. त्यामुळे ते नासायचं नाही. आणि त्याच्यावर जाड सायही यायची. यामुळे नेहमीपेक्षा जास्त लोणी, तूप घरात तयार व्हायचं.

चुलीची मैत्रीण म्हणजे फुंकणी. फुंकणीतून फू फू करत चूल पेटवायची हे खरं कसब. एकीकडे नाकातोंडातून पाणी येत असतं, तर दुसरीकडे डोळे चुरचुरत असतात; पण चुलीवरचं जेवण हवं असेल तर याला काही पर्याय नाही. आणि तिसरी पाणचूल. न्हाणीघराच्या बाहेर पाणी तापवण्यासाठी ही वेगळी चूल असे. आजही काही घरांनी ही चूल संस्कृती जपून ठेवली आहे.

कोकणात अनेक घरांमध्ये फडताळाचं एक कपाट स्वयंपाकघरातही असे. माझ्या आत्याच्या घरी होतं. त्यात दूध -दुग्धजन्य पदार्थ, उरलंसुरलं अन्न, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, फोडणीची मिरची, पापड असे अगणित प्रकार ठेवलेले असत. तिच्याकडे गेल्यावर दोन कामांना हात लावायला मी कायम कुरकुरायचे. एक म्हणजे अलीबाबाच्या या गुहेतून, म्हणजेच संमिश्र वासाने भरलेल्या त्या कपाटातून एखादा पदार्थ काढणं आणि दुसरं म्हणजे जेवण झाल्यावर खरकट काढायला शेणाने जमीन सारवणं पहिल्या कामाने जेवणाआधी मळमळायचं आणि दुसऱ्याने जेवणानंतर. आज कपाट गेलं, शेणाची जमीनही गेली, पण ते वास अजून नाकात आणि आठवणीत भरून राहिले आहेत.

युद्धात जशी अवजारं वापरली जातात, तशीच ती स्वयंपाकघरातही वापरली जातात. हल्ली बरेचजण सुरीने भाजी चिरतात. पण पूर्वीच्या काळी स्वयंपाकाच्या युद्धात आपली पहिली गाठ पडे ती विळी आणि खोवणीशी. आपल्याकडे शहरात जी विळी वापरली जाते, तिला पुढे नारळ खोवण्यासाठी एक काटेरी, गोल चकती बसवलेली असते. कोकणात मात्र विळी आणि खोवणी वेगवेगळी असे, किंबहुना आजही आहे. विळीला नुसतंच चिरायचं पातं आणि खोवणीला नुसतीच खोवणी. पूर्वीच्या काळी कुकर नव्हते. त्यामुळे खरा कुशल तोच मानलं जायचा जो पितळेच्या किंवा तांब्याच्या तपेलीमध्ये भात आणि तत्सम पदार्थ शिजवू शकायचा. तपेली म्हणजे पाण्याच्या तांब्यासारखा आकार असलेलं मोठं भांडं. असंच तपेलं घराबाहेर पाणचुलीवर ठेवलेलं असे. त्यातून उकळणारं पाणी स्वतःच्या अंगावर सांडू न देता बादलीत काढणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नोहे.

साठवणीच्या पापड, कुरडया बनवण्याचीही काही अवजारं घरात असत. उखळात धान्य सडले जात असे. कांडणात पोहे कांडले जात असत. पडवीत पुरलेल्या वाहिनात पोह्याच्या पापडाचं, उडदाच्या पापडाचं पीठ कुटून घेतलं जात असे. घरात शेवया पाडण्याचा शेवगा असायचा. मळलेलं पीठ शेवयांच्या पाटावर म्हणजेच शेवग्यावर घासून शेवया पडल्या जात असत. तांदुळाची फेणी म्हणजेच पापड करण्यासाठी वेगळा साचा घरात असे. लोणची आणि अन्य साठवणीचे पदार्थ ठेवायला मोठाल्या चीनी मातीच्या बरण्या असत. सध्या सुरू असणारा मे महिना म्हणजे साठवणीचे पदार्थ तयार करण्याचा सुगीचा काळ. शेजारपाजारच्या अनेकजणी एकत्र मिळून वर्षभरासाठी लागणारे पापड, कुरड्या, लोणचे तयार करत असत. हा एक सोहळाच असे.

स्वयंपाकघरातील या सगळ्या वस्तू कोकणातील ग्रामजीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या अभ्यासाशिवाय कोकणाचा परिचय अपूर्ण आहे. कोकणातल्या अन्य काही गोष्टींचा आढावा घेऊच पुढच्या लेखात.

- मृदुला राजवाडे

-[email protected]