वीणा सहस्रबुद्धे यांच्या शिष्या अपर्णा गुरव यांचे शास्त्रीय संगीत सादरीकरण .
 
माझ्या मित्रांनो,
   गेल्या लेखात मी तुम्हाला सांगितलं, की शाळेत असल्यापासून संगीत शिकायला सुरुवात केलीत, म्हणजे दहावी होईपर्यंत तालासुरांचा बेस पक्का होतो आणि पुढील उच्च (ॲडव्हान्स) शिक्षण घेण्याची पात्रता निर्माण होते.
जर तुम्ही शिकता शिकता, गांधर्व महाविद्यालयाच्या तीन परीक्षांचा सखोल अभ्यास केलात (परीक्षा देणं किंवा न देणं तुमच्या मनावर आहे) तर तुमचा बेसिक कोर्स पूर्ण होतो. तुम्हाला निरनिराळे राग, ताल, गीतप्रकार यांची माहिती होते. आलाप, तानांमुळे गायनासाठी गळा तयार होऊ लागतो किंवा एखाद्या वाद्य वादनात हात तयार होतो. दहावीनंतर आपल्या महाविद्यालयीन शिक्षणात जसे अनेक पर्याय असतात, तसेच संगीतात करिअर करण्यासाठी पुढे शिकताना कोणत्या दृष्टीने अभ्यास करायचा याचे अनेक पर्याय मी तुम्हाला आता सांगणार आहे.
     सुरुवातीला, आपण संगीत शिकलो की, आपल्याला कार्यक्रम करता येतील एवढी एकच गोष्ट माहीत असते. तुम्ही गायन किंवा वादन काहीही शिकत असाल, तर करिअर म्हणून किती वेगवेगळ्या प्रकारे आपण गायन वादनाचा उपयोग करू शकतो ते पाहू.
    ख्याल गायन/ वादन म्हणजे राग संगीत आवडू लागले, असेल तर पुढे शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करून मैफलीचे कलाकार होऊ शकता आणि त्याच्या जोडीला उपशास्त्रीय संगीताचाही अभ्यास करू शकता. उपशास्त्रीय संगीत म्हणजे ठुमरी, टप्प्या, होरी, गझल असे गीतप्रकार, ज्यांना रागसंगीताचा अभ्यास आवश्यक असतो. अशा प्रकारे मैफलीचे गायक किंवा वादक कलाकार म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकता.
गायक समीर अभ्यंकर.आजोबांपासून संगीत घरात असल्याने ९ व्या वर्षांपासून गाणे शिकून हाच व्यवसाय म्हणून स्वीकारला. गाण्याचे सादरीकरण करणे आणि आरोही संगीत अकादामीच्या माध्यमातून संगीत शिकवणे ह्या दोन्ही क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
     पण जर ख्यालगायनात रुची वाटत नसेल, तर केवळ निरनिराळ्या नवीन रागांचा अभ्यास चालू ठेवून (जो गायन वादनाच्या रियाजासाठी आवश्यक असतो)  सुगम संगीतातही पुढील वाटचाल करू शकता. यांत भक्तिगीत, भावगीत, चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत यांचा अभ्यास करून, त्याच्या सादरीकरणाचं तंत्र आत्मसात करून घेऊन, सुगम संगीत गायनाचे कार्यक्रम करू शकता. त्याचप्रमाणे नाटकात भूमिका करायची आवड असेल, तर संगीत नाटकांत गायक नटाची भूमिका करू शकता. सिंथेसाइजर, हार्मोनिअम, व्हायोलीन, तबलावादनाचा अभ्यास करणारे कलाकार सुगम संगीताच्या कार्यक्रमात साथसंगत करू शकतात.
     पहिल्या तीन परीक्षांचा अभ्यास करताना स्वरलिपींचा परिचय होतो. त्यात अधिक मेहनत घेतली, तर स्वरलिपी वाचता येणं आणि करता येणं हे सहज यायला लागते. या स्वरलिपीच्या ज्ञानाचा उपयोग, संगीत दिग्दर्शक (म्युझिक डिरेक्टर), संगीत संयोजक (म्युझिक ॲरेंजर), साहाय्यक संगीत दिग्दर्शक (असिस्टंट म्युझिक डिरेक्टर - जो मुख्य कलाकाराव्यतिरिक्त इतर कोरस गाणारे आणि वादक यांच्या रिहर्सल्स घेतो) अशा निरनिराळ्या प्रकारे काम करताना होतो.
       संगीताचा अभ्यास केलेल्यांना रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्डिस्ट म्हणूनही करिअर करता येतं. हे रेकॉर्डिंग चित्रपटातील गाणी, पार्श्वसंगीत, नाटकाचं पार्श्वसंगीत, जाहिरातींचे जिंगल्स, प्रायव्हेट अल्बम्स, गाण्यांच्या किंवा नृत्याच्या मोठ्या कार्यक्रमांसाठी ट्रॅक्स तयार करणे अशा अनेक कारणांसाठी सतत चालू असतं. तुम्हाला स्वत:चा स्टुडिओही सुरू करता येतो.
         रेडिओ, टी. व्ही. आणि अनेक मोठमोठ्या इव्हेंट्ससाठी निरनिराळे थीम बेस्ड कार्यक्रम तयार करता येऊ शकतात. स्वत: संगीताचे जाणकार असल्याने, अशा कल्पना सहज सुचतात आणि अंमलातही आणता येतात.
        आपण जसं संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं, तसं इतरांना शिकवण्याचं कामही तेव्हढंच महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही संगीत शिक्षक, गुरू म्हणूनही काम करू शकता. मग शाळेत किंवा एखाद्या संगीताच्या संस्थेत शिक्षक म्हणून काम करता येईल किंवा स्वत:चं संगीत विद्यालय सुरू करता येईल. शिकवण्यासारखं दुसरं पवित्र कार्य नाही. संगीताची काहीही माहिती नसलेल्या विद्यार्थ्याच्या मनांत संगीताविषयी गोडी निर्माण करून त्याला शिकवून तयार करणं हीसुद्धा खूप आनंददायी प्रक्रिया असते.
          शिकवण्याच्या अनुभवातूनच, संगीतावरील निरनिराळ्या विषयांवर लिहिणं किंवा सप्रयोग भाषण देऊन, कठीण विषय सोपे करून सांगणं हेसुद्धा आव्हानात्मक काम असतं.
        स्वत:ला तुम्ही सतत जर अपग्रेड करत राहिलात, तर पुढे तुम्हाला निरनिराळ्या स्पर्धांसाठी परिक्षक म्हणूनही काम करता येईल. तसेच संगीत समीक्षक, संगीत वृत्तनिवेदक, कार्यक्रमाचे निवेदक अशाही अनेक गोष्टी करता येतात.
         सध्या कलेच्या क्षेत्रातल्या या विविध कामांना खूप मागणी असल्याने, या क्षेत्रातही करिअर करायला वाव आहे. मात्र त्यासाठी शिकताना खूप मेहनत घेऊन, स्वत:ला त्यासाठी तयार करणं आवश्यक आहे.
 
                                                                                                        - मधुवंती पेठे