नर नीलगाय 

मागच्या भागात आपण अगदी सहज दृष्टिक्षेपात येणारे प्राणी-पक्षी पाहिले. आता आपण तेव्हा राहिलेली भटकंती पूर्ण करू. जंगलामध्ये कुठेही फिरताना एक प्राणी सतत आपल्याला दिसतो. तो म्हणजे लंगूर. याच्या चेहेऱ्यावर कायम एक कुतूहल दाटलेले असते. कधी कधी आपल्याच नादात ते खूप जवळपण येतात आणि मग आपण आपली मर्यादा ओलांडली आहे हे लक्षात आल्यावर दात विचकून ओरडतात.

लंगूर

काही वेळेला तर मादी लंगुराच्या कडेवर नवजात पिल्लू पण असतं. त्या वेळेला आपण फार आसपास गेलो, तर त्या पिल्लाला अजून सुरक्षित कुठे घेऊन जाऊ असं वाटून ती सैरभैर होते. अशा वेळेला तिला अजून असुरक्षित वाटू न देता आपण तिथून काढता पाय घेणंच योग्य. आधीच आपण त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्रास देत असतो. त्यामुळे ठराविक लांब अंतरावर थांबणंच योग्य. भारी भरकम प्राण्यांमध्ये अजून दोन प्रमुख प्राणी म्हणजे नीलगाय (Blue bull) आणि गौर/ रानगवा (Bison). वरकरणी नीलगाय या  नावावरून फार काही डोळ्यासमोर येत नाही, पण तेच Blue bull म्हटल्यावर एक वेगळंच व्यक्तिमत्व पुढे येत. नराचे कायम शिष्ट भाव असतात तर मादीच्या चेहेऱ्यावर जरा शामळू भाव असतात. तोच साधारण प्रकार थोड्या फार प्रमाणात रानगव्यामध्ये दिसतो. एरवी पांढरे शुभ्र पायमोजे घातलेले हे गवे शांतपणे चरताना दिसतात खरे, पण जरा जरी काही धोका आढळला की त्यातला मुख्य नर हा एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढून सर्वांना इशारा करतो आणि क्षणार्धात सगळा कळप झाडा-झुडपात गायब होतो. अंगावर शहारा आणण्यासारखा हा प्रसंग असतो. या गव्यांसमोर आपण अगदीच (अगदी जिप्सीसकट) क्षुल्लक भासतो. आला धावत आणि मारली ठोकर गाडीवर की संपलं. आपल्यासकट पूर्ण गाडी तो उलटवू शकतो.

पोपट

थोडं उन वर आल्यावर शिकारी पक्षी (Raptors) दिसू लागतात. शिक्रा, कापशी घार (Black winged kite), तिसा (White eyed buzzard), मधुबाज (Oriental honey buzzard), सर्पगरुड (Crested serpent eagle) आणि मोरघार (Crested hawk eagle) हे अगदी सहज दिसणारे. या सर्व शिकारी पक्ष्यांमध्ये एक प्रकारचा डौल असतो. शिक्रा हा तापट वाटतो तर लालबुंद डोळ्यांची कापशी घार डौलदार तर दिसतेच, पण खूप लाजाळू. जरा जरी चाहूल लागली तरी लगेच जागा बदलते. बहुतेक सर्व गरुडामध्ये राजासारखा बाणेदारपणा जाणवतो. कुठल्यातरी डोंगराच्या कड्यावर किंवा उंच झाडावर बसून सगळीकडे लक्ष ठेवत असतो. त्याला त्याच्या अणकुचीदार चोचीचा आणि भरभक्कम पायाचा खूप अभिमान असावा. मला स्वतःला Crested hawk eagle खूप आवडतो. त्याच्या डोक्यावर असणारा तुरा खूपच भाव खाऊन जातो. या Crest मुळे उगीचच त्याला बादशहाचा किताब द्यावासा वाटतो. तसं पाहिलं तर एकंदरीतच तुरा (Crest) असणारे पक्षी वेगळेच दिसतात. हुदहुद (Hoopoe), पाकोळी (Crested tree swift), भारीट (Crested bunting) , चंडोल (Crested lark ) हे सर्व पक्षी त्यांच्या तुऱ्यामुळे खूपच उठून दिसतात. ही crest खाली वर करताना बघणं हे फारच सुखद असतं.

सर्पगरुड 

पण जंगलामध्ये सर्वात जास्त तोरा हा वाघाचाचं. त्या खालोखाल बिबट्या. वाघाच्या अविर्भावाबद्दल काय लिहावे. ज्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांना याची कल्पना असेलंच. हिरव्या पार्श्वभूमीवर दिसणारे पिवळे काळे पट्टे, मजबूत बांधा अशा या राजस प्राण्याला पाहिले की धडकी भरलीच म्हणून समजा. मीच इथला राजा आहे आणि तुम्ही सगळे मलाच पाहायला तडफडत असता असेच त्याच्या चेहेऱ्यावर भाव असतात. वाघाची ही अशी तऱ्हा, तर बिबट्या हा कायमच डांबरट वाटतो. हा कधी काय करेल याचा अंदाज बांधणं जरा अवघडच. बिबट्या आणि इतर कुठलेही मांजर कुळातले प्राणी हे असेच वाटतात. एक प्रकारचा 'मी'पणा चेहेऱ्यावर ठासून भरलेला असतो. 

तर असे हे विविध लहान मोठे प्राणी कसेही भासत असले तरीही मुळात निष्पाप असतात. आपल्यापासून ते लपतात ते फक्त भीतीपोटीच, क्रौर्य करतात ते स्वतःचे आणि पिल्लांचे पोट भरण्यासाठी आणि अंगावर आलेच तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच... कोणालाही विनाकारण अपाय करण्यासाठी नव्हे. आपणही याच निसर्गातला एक घटक आहोत, या प्राण्यांमधली निरागसता १० टक्के जरी आपल्याला आचरणात आणता आली ना तर निसर्गाची साखळी अबाधित राहायला नक्कीच मदत होईल.

- अमोल बापट