महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

बहु असोत सुंदर संपन्न कीं महा |

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदी गीरीविन अनु नच जिथे उणे|

आकांक्षा पुढती जेथे गगने ठेंगणे

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केलेलं हे महाराष्ट्राचं वर्णन खरोखरच सार्थ आहे. माझ्या महाराष्ट्राला अश्मयुगीन कालखंडापासूनचा इतिहास आहे. शूरवीरांप्रमाणे कलाकारांनीही माझा महाराष्ट्र समृद्ध केला. वाकाटक आणि राष्ट्रकुटांच्या काळात सुमारे १५०० वर्षापूर्वी अजंठा-वेरुळसारख्या स्वप्नवत कलाकृती निर्माण झाल्या. काळाकभिन्न दगड फोडून त्यातून नाजूक शिल्पकृती उभ्या राहिल्या. शूरवीरांनी या महाराष्ट्राचं रक्षण केलं, तर कलाकारांनी या महाराष्ट्राला सजवलं, नटवलं. चित्रकार आणि शिल्पकारांनी दगडी भिंती जिवंत केल्या. डोंगरामधून मंदिरे निर्मिली. त्यांच्याच प्रमाणे लेखक आणि कवींनी आपल्या शब्दांमधून महाराष्ट्राचं कौतुक गायलं. ८०० वर्षापूर्वी ज्ञानेश्वरसुद्धा या महाराष्ट्राच्या मराठी भाषेचं वर्णन करताना म्हणतात -

       माझा मराठीचिये बोल कवतुके

       परी अमृताचेनि पैजा जिंके

       ऐसी अक्षरे रसिके मेळविण |

भारतभूमीच्या मध्यभागाच्या जवळ असणारा आमचा महाराष्ट्र इथं हिमालयातला बर्फ नाही, राजस्थानमधलं वाळवंट नाही, पंजाबमधली समृद्धता नाही; तरीही कणखरपणाच्या बाबतीत हिमालयातला मागे टाकणारा सह्याद्री आहे. म्हणूनच राम गणेश गडकरी १०० वर्षापूर्वी म्हणतात-

‘राकट देश, कणखर देशा, दगडांच्या देशा |

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा |

प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ||

मग इथल्या कवींना महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरा आठवतात इथले गड-किल्ले दिसतात. ज्ञानोबा – तुकारामांची अभंगवाणी त्यातून वाहणारी भक्ती गंगा शिवरायांचा पेशव्याचा पराक्रम हे सारं सारं आठवतं. इथली माती टिळ्याप्रमाणे कपाळावर अशी कवी कुसुमाग्रज या मातीबद्दल लिहितात-

माझ्या मातीचा लाव लालाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यांतील शिळा |

हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात

ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन-दीन

स्वर्गलोकांहून थोर मला हिचे महिमान ||

आमची अस्मिता फक्त महाराष्ट्रापुरती सीमित नाही. संपूर्ण देशावर संकट आलं, तर सह्याद्रीचे कडे हिमालयाच्या मदतीला धावून जातात.

 कवी सोपानदेव चौधरी म्हणतात –

‘संकट येता लढलो आम्ही, धाव घेत उत्तरेकडे

भारतदेश संरक्षाया सैन्य आमचे सदा खडे’

म्हणूनच सेनापती बापट म्हणतात-

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले

खर वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा

महाराष्ट्र तेजस्विता नाही मेली

महाराष्ट्र तेजस्विता हि निजेली |

महाराष्ट्रा तेजस्विता जागवाया चला या बंधुंनो! या चला या

अनेक स्री कवयित्री सह्याद्रीला आई म्हणतात आणि स्वत:ला महाराष्ट्र कन्या म्हणवून घेतात. प्रसिध्द कवियत्री पद्मा गोळे म्हणतात-

‘ आम्ही महाराष्ट्र कन्या मायमराठी  आमुची;

स्वर्गाहूनी हि आम्हाला माया मराठी भूमीची

काळा सह्याद्रीचा कडा कळसुबाईचे  शिखर

कृष्ण-भीमा-गोडोसंगे आहे अमुचे माहेर

मुक्ता, जना, जागविती भोळ्या भक्तीने पहाटे

जिजा,लक्ष्मी, शिकवती आम्हा स्वातंत्र्याची कीर्ती’

संत अभंग आणि ओव्यांनी महाराष्ट्राची स्तुती करतात. तर शाहीर गोंधळ मांडून भारतमातेला आवाहन करतात. कवी कुंजविहारी गोंधळात म्हणतात-

स्वतंत्रते भगवती उदो गे भारत भू माये |

शिवा भवानी विभव शालीनी गोंधळास ये

महाराष्ट्र- चौरांगावरती रंग तुझा भरीला |

स्वयंप्रकाशित आत्मज्योतीचा पोत पाजळीला

शिवरायांची आठवण झाली की रायगडही आठवणार वसंत बापट म्हणतात-

भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ केवळ माझा सह्यकडा

गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा”

आधुनिक मराठी भाषेच्या इतिहासातील बालकवींपासून अनेक कवी आणि कवयित्रीना या महाराष्ट्राची महती शब्दातुन व्यक्त करावीशी वाटली बालकवी अर्थात त्र्यंबक बापुजी ठोमरे लिहितात-

महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा निनाद अंबर भरी,

महाराष्ट्र- यश दिव्य गाइले आनंत लोकेश्वरी

थोर थोर नरवीर धैर्यधर- संत- सन्मनी गुणी

तुझ्याच चरणी लीन जाहले माय विश्व पावनी

कविवर्य बा.भ.बोरकर महाराष्ट्रातल्या कुशीतल्या गोव्याचे पुत्र कोकणी ही मातृभाषा तरीही मराठीचा आणि महाराष्ट्राचा त्यांना विलक्षण आभिमान त्यांनी लिहिले-

‘काना भारताचा असा सह्य येथे

कधी मेरू मंदार द्रोणागिरी |

महाराष्ट्र माझा असा हा वज्रदेही

उभ्या भारताचा पहारेकरी

अशी ही आमची कलाकारांचीही भूमी कलावंतातील कळेल स्फूर्ती देणारी माता, गंगाधर महाम्बरे लिहितात-

महाराष्ट्रा! तुझ्या गीती मला डे निशिदिनी स्फूर्ती |

तुझी विश्वात पसरू दे कला शास्त्रातील कीर्ती

अशा या महाराष्ट्रभूमीचा आम्हाला अभिमानाच आहे. शांत शेळके लिहितात-

‘माय मराठी, नाव मराठी, मराठमोळा प्राण

महाराष्ट्र भूमीत जन्मलो हा माझा अभिमान’

ही भूमी सर्वांची आहे. शाहीर आण्णाभाऊ साठे असे लिहितात

हि अवनी आदिवाशांची | कोळी भिल्लांची|

मंग रामोशांची | कैक जातींची |

प्राणाहूनी प्यार | परंपरा ज्यांची असे अपार

पुढे शाहीर तीच गाणार | जी जी जी |

शेवटी या महाराष्ट्रापाशी साने गुरुजी एकच प्रार्थना करतात

“माझ्या महाराष्ट्र भूमीत मोठे

प्रतापी पुन्हा वीर निर्मी निभो

शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, वागीश, शिल्पी,

कालाविद खरे थोर मिर्मी प्रभो ||

हि नीती, संपत्ति, सद्बुद्धी, सहकार्य,

आरोग्य, ऐक्यादि येथे रुजो

धावो याशोगंध देवा ! दिगंतात

माझा महाराष्ट्र भाग्यें सजो ||

 

-मिलेंद्र प्रभाकर सबनीस

 [email protected]