सेंद्रिय शेतीच्या  पुरस्कर्त्या

 

 अदिती आणि अपूर्वा संचेती या दोघी सख्या बहिणी. अदितीचे वय २६   वर्षे, तर अपूर्वाचे वय २४.  पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये या दोघी लहानाच्या मोठ्या झाल्या. या दोघींचेही शालेय शिक्षण पुण्यातील रेवाचंद भोजवानी अकादमीमध्ये झाले. पुढे अदितीने गरवारे महाविद्यालयामधून बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजी) पदवी घेतली आणि दूरशिक्षण संस्थेतून एम.एस्सी. (सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट)पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अपूर्वाने तत्त्वज्ञान विषयातील बी.. ही पदवी प्राप्त केली. त्या दोघींनाही नोकरी मिळवणे सहज शक्य असतानाही त्यांनीसेंद्रिय शेतीकरण्याचा आगळावेगळा, परंपरेला विरोध दर्शवणारा निर्णय घेतला.

घर, शाळा आणि आजूबाजूच्या व्यक्ती, परिस्थिती यांमुळे लहानपणापासूनच अदिती आणि अपूर्वा यांची चाकोरीबाहेरीचा विचार करण्याची आणि केलेला विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वैचारिक बैठक तयार होत गेली. परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचा ताण न घेता, पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळवावे, विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेता यावा, यासाठी त्यांना घरातून आणि शाळेतूनही प्रोत्साहन मिळत होते. आई- कल्पना संचेती गरवारे बालभवनमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचा शाळेतील अनेक मुलांशी, लोकांशी येणारा संपर्क, शाळेत होणाऱ्या प्रशिक्षणांमधून, शिबिरांमधून पालकत्वाच्या दृष्टीने आवश्यक वाटणाऱ्या  गोष्टी त्यासंस्कारम्हणून घरीही राबवत असत. त्यातीलच पर्यावरण संरक्षणाचा एक दृढ संस्कार अदिती आणि अपूर्वा यांच्यावर होत गेला. आपल्या दैनंदिन सवयींचा विचार करतानाच त्या दोघींना आपल्या हातून पर्यावरणाची हानी होत आहे, याची जाणीव झाली. ती टाळण्यासाठी आपण घरच्या घरी प्रयत्न करू शकतो, याचे भान त्यांना आले. आणि पर्यावरण संरक्षणाची सुरुवात झाली, ती पाणी व्यवस्थापन, कागद वाचवा मोहीम, ओला-सुका कचरा वेगळा करून खत तयार करणे, विविध वन शिबिरांमध्ये सहभागी होणे - या अनुषंगाने. यातूनच त्या दोघींची पर्यावरणविषयक जबाबदाऱ्यांची  जाणीव अधिक समृद्ध होत गेली.

दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अदितीने पर्यावरणासंबंधी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विशेषत: ‘रानवासंस्थेसोबत तिने अनेक कामे केली. त्यामुळे अदिती निसर्गाच्या अधिक जवळ जाऊ लागली आणि तिच्यामध्ये पर्यावरण संशोधनाविषयी ओढ निर्माण झाली. बी.एस्सी.ला असताना उन्हाळ्यात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणादरम्यान तिनेव्हिसलनावाच्या पक्षावर संशोधन केले. पण आपण जेसंशोधन प्रकल्पहाती घेतो, ते सरकारी निधीवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यातील तात्कालिकता ध्यानात येताच तिला खंत वाटू लागली. तिला पडणारे  प्रश्न, अनुभव यांविषयी ती आईबरोबर चर्चा करत असे. या चर्चेदरम्यान आपण पर्यावरणपूरक जीवन जगले पाहिजे, हे तिचे मत ठाम होत गेले आणि ते प्रत्यक्षात आणता येईल का? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी अदितीने शिक्षणात एक वर्ष गॅप घेण्याचे ठरवले. हेच वर्ष तिला प्रत्यक्ष दिशा देणारे ठरले.

या एका वर्षाच्या काळात ती अनेक ठिकाणी भटकली. दरम्यान जर्मनीत परिषदेला गेल्यावर ती अनेक संशोधकांना भेटली. तेथेही तिला जीवनशैली आणि संशोधन यांमध्ये कमालीचा फरक जाणवला, त्यातून तिची मनस्थिती द्विधा होत गेली. याच दरम्यान तिची भेट पर्यावरणस्नेही जीवन जगणाऱ्या  क्रिस्टन रेफल्ट या जर्मन व्यक्तीशी झाली. क्रिस्टन रेफल्ट यांचे एक छोटसे शेत होते. जीवनशैली म्हणून ते शेती करत असत आणि पैशाची गरज भागावी म्हणून हॉटेलमध्ये ते चार-पाच तास कामही करत असत. त्यांचे घर पर्यावरणपूरक साधनांनी युक्त असे होते. तिथले हे वातावरण अनुभवल्यानतर खऱ्या अर्थाने अदितीला जीवन जगण्याचा मार्ग गवसला. यातूनच प्रेरणा घेऊन पुढे तिने भारतामधील पर्यावरणासंबधित काम करणाऱ्या विविध संस्थांना भेटी दिल्या . याच भटकंतीच्या काळात अमरावतीच्या फुटाणे नावाच्या एका व्यक्तीला ती भेटली. हे कुटुंब 2 एकर जमिनीत सेंद्रिय शेती करत होते. त्यांच्या समवेत ती 8 महिने राहिली. शेतीतले एक ऋतुचक्र तिने प्रत्यक्ष काम करून अनुभवले, समजून घेतले आणि शेती करणे हीच आपली जीवनशैली आहे, या निर्णयापर्यंत ती पोहचली आणि तिच्या या निर्णयाचे घरच्यांकडूनही स्वागतच झाले.

शेती करायची म्हणजे जमीन पाहिजेच. घरात शेतीचा वारसा नसल्यामुळे जमीनही नव्हती. त्यामुळे जमीन विकत घेण्यापासून तयारी करावी लागली. अदितीच्या बाबांनी ओळखीच्या गृहस्थांकडून पुण्यापासून साधारण 40 कि.मी. अंतरावर असणार्या सणसवाडी येथे 2 एकर जमीन विकत घेतली. ही जमीन म्हणजे फक्त दगड-धोंडेयुक्त, पडीक जमीन. हीच खरी परीक्षेची वेळ होती. या पडीक जमिनीत अदितीने आपले काम सुरू केले. दरम्यानच्या काळात अदितीची लहान बहीण अपूर्वा हिनेही याच क्षेत्रात यायचे असे ठरवले होते. अपूर्वाने 10 वीनंतर एक वर्ष गॅप घेतली. तिला समाजकार्य किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचे होते. आपला निर्णय योग्य आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी ती ठिकठिकाणी फिरली, निरनिराळ्या लोकांबरोबर राहिली. या अनुभवातून तिला  जाणवले की, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या प्राथमिक गरजा अविकसित म्हणवले जाणारे गट योग्य पद्धतीने, स्वावलंबनाने भागवत होते, उलट आपल्याच गरजा आपल्याला स्वावलंबनाने भागवता येत नाहीत. अपूर्वाने शिक्षणकार्य, समाजकार्य यांचा मार्ग स्वीकारण्यापूर्वी स्वत:ची जीवनशैली निश्चित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने तिने निवडलेला पर्याय तिला अधिक योग्य वाटला आणि अदितीच्या कामाशी अपूर्वाही जोडली गेली.

येथूनच खऱ्या अर्थाने त्या दोघींची जीवन जगण्याची धडपड सुरू झाली. शेतीतले प्रयोग करण्यात त्यांच्या आयुष्यातील जवळजवळ तीन वर्षे लागली. त्यातील पहिले वर्ष तर पाणी कोठून वाहतं, कुठल्या जमिनीत पाणी जास्त आहे, माती तयार करण्यासाठी काय करता येईल याच्या निरीक्षणात गेली. जमीन पडीक असल्यामुळे ती लागवडीखाली आणणे, हेच मोठे आव्हान होते. मग त्यासाठी पुण्याहून बसने पोतीच्या पोती बायोमास आणायचा, तो स्वत: डोक्यावर घेऊन जायचा आणि एक एक पॅच लागवडीखाली आणायचा, अशी एक पद्धत, तर ग्रीन मॅन्युरिंग अशी दुसरी पद्धत त्यांनी वापरली. शेतीला पाण्याची जोड मिळावी म्हणून त्यांनी शेततळेदेखील तयार केले. ग्रामस्थांच्या कामाच्या अनुभवाचा उपयोग करून घेत वेगवेगळ्या प्रयोगातून शेताचे निरीक्षण, पिके, पाणी आणि वातावरण याचा अंदाज घेणे यामध्ये पुढील तीन वर्षे गेली. हे करत असताना रोज पुण्याहून सणसवाडीला जा-ये चालू होती. तोपर्यंत त्यांचा जीवनक्रम निश्चित झाला होता. आपल्या कामाला अधिक परिपूर्णता येण्यासाठी आपल्याच शेताचे निरीक्षण, अभ्यास या गोष्टींना अधिक वेळ देता यावा, म्हणून या दोघींनी सणसवाडीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. अदितीचा मित्र मालक सिंग याच्या मदतीने त्यांनी माती आणि दगड यांचा वापर करून पर्यावरणपूरक असे घर बांधले.

लागवडीखाली आणलेल्या जमिनीतून गहू, ज्वारी, तांदूळ, शेंगदाणा, जवस, कारळं, केळी, पपई, पेरू, सीताफळ, डाळिंब, उडीद, हुलगा, हिवाळी मूग, घेवडा, मसूर, कोरफड, ओवा, अडुळसा अशी नानाविध पिके आज त्या घेत आहेत. पिकांना कीड लागू नये म्हणून त्या अभ्यासपूर्ण पद्धतीने पिके लावतात, तसेच पारंपरिक पद्धतीने पिकांचे रक्षण करतात.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे; म्हणून अशा स्वरूपाची शेती करणाऱ्या लोकांना, मित्रमैत्रिणींना त्या बियाणे देण्याचे कामही करतात. शेतातून मिळालेल्या उत्पादनांपैकी घरासाठी आवश्यक तेवढे धान्य साठवून आज त्यांचे उत्पादन बाजारपेठेपर्यंत पोहोचले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अपूर्वा आणि अदिती इतरांच्या शेतातील पिकांवर, फळांवर प्रक्रिया करून छोटी छोटी उत्पादने तयार करून लघुउद्योगही करतात. केशतेल, कैरीचे लोणचे, आवळा क्रश, सरबते, नाचणीचे लाडू, अशी विविध घरगुती उत्पादने बनवून शुक्रवारी सायं. 4 ते 7 या वेळेत गरवारे बालभवनमध्ये त्या विकतात.

अतिशय मर्यादित गरजा असलेल्या या दोघीचे जीवन अत्यंत साधे आणि पर्यावरणपूरक असल्याचे पदोपदी जाणवते. अंगावर शेतीत काम करून मळलेले कपडे, डोक्याला साधासा रुमाल, पायात साध्याच चपला असा पेहराव. मातीपासून बनवलेले घड्याळ, शेणाने सारवलेले घर, स्वयंपाकासाठी बायोगॅसचा वापर आणि पाणी तापवण्याकरता सूर्यचूल अशा पर्यावरणपूरक साधनांनीयुक्त असलेले त्यांचे घर, त्यांची साधी परंतु जिवंत अनुभव देणारी जीवनशैली आधोरेखित करते.

अदिती आणि अपूर्वाच्या या प्रयत्नांना आई-वडील, नातेवाईक, ग्रामस्थ, मित्रमैत्रिणी यांचा पाठिंबा आहे. वेळप्रसंगी अधिकची कामे करायला मित्रमैत्रिणीही तत्काळ धावून येतात. लहानपणापासून शाळा, शिक्षक, आईवडील यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आज अदिती आणि अपूर्वा यशस्वी असे पर्यावरणस्नेही जीवनशैली जगत आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आणि त्यासाठी सेंद्रिय शेती हेकरिअरम्हणून स्वीकारणे या त्यांच्या निर्णयातूनच निसर्गाजवळ जाणारी अशी ही वेगळी वाट त्यांनी समाजासमोर ठेवली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळेल, यात शंकाच नाही.

- सायली नागदिवे, रेश्मा बाठे

 [email protected]