वनोटे गावातल्या वीटभट्टी कुटुंबांतील मुलांसाठीची शाळा आणि सुरवसे सर

शिक्षकाचे नाव – विनोद रावसाहेब सुरवसे.

शिक्षण – एम . ए. डी. एड .

शाळेचे नाव :  जि. प. प्राथमिक शाळा वनोटे, केंद्र- वेळूक, ता. मुरबाड, जि. ठाणे.

आदिवासी-कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी झटणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे विनोद रावसाहेब सुरवसे. वनोटे गावातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापनाचं काम करताना त्यांच्यासमोर प्रश्न होता तो तेथील कुटुंबांच्या स्थलांतराचा. वीटभट्टीच्या कामानिमित्त अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. हे स्थलांतर म्हणजे या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणातील अडसरच. मात्र मुलांना शाळेची गोडी लागली तर पालकांचे स्थलांतर होऊनसुद्धा मुले त्याच गावात नातेवाइकांकडे राहून शिक्षण पूर्ण करतात, हे विनोद सुरवसे यांनी जाणलं. म्हणून त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून मुलांची संगणकांशी दाट मैत्री करून दिली.

विनोद सुरवसे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांची शोधक वृत्ती वाढीस लागली.  शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर सुरू झाला. लाजरी-बुजरी मुले संगणकावर अभ्यास करू लागली आणि खेळही खेळू लागली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे त्यांचे  नियमित शाळेत येण्याचे प्रमाण वाढले. स्थानिक कलाकार, कारागीर यांची अध्यापनात वेळोवेळी मदत घेतली. याच बरोबर जीवन कौशल्य विकसनासाठी वेतकाम, सुतारकाम, गवंडीकाम यांची ओळख व्हावी;  म्हणून शालेय वेळापत्रकात त्यासंबंधीची योजना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत टोपल्या, परड्या, शोभेच्या वस्तू तयार केल्या. श्रमप्रतिष्ठा व नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये पालकांच्या मदतीने शाळेचे कम्पाउंड बांधणे, शालेय साहित्य वाटून वाढदिवस साजरा करणे, भाषाविकास कार्यशाळा आयोजित करणे, असे एक ना अनेक उपक्रम शाळेसाठी राबवले गेले.

 हस्तकला, मातीकला, चित्रकला अशा कलाप्रकारातून आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत आहे. हे विद्यार्थी  वर्तमानपत्रांचा कल्पकतेने वापर करतात. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये जिल्हापातळीपर्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ग्रामीण आदिवासी भागातील मुलांना या उपक्रमांविषयी उत्सुकता असल्यामुळे मुलांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढले. त्यांचे स्थलांतर थांबले. हे विद्यार्थी शिक्षणप्रवाहात सामील होऊन आत्मविश्वासाने शिकू लागले आहेत. शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थी स्वयंअध्ययन करतात.  

स्वयंअध्ययनाच्या समाधानामुळे पालकांचे स्थलांतर झाले तरी विद्यार्थी याच शाळेत टिकून आहेत. ही ‘स्थलांतरितांची शाळा’ वनोटे येथील आदर्श शाळा आहे. विनोद सुरवसे यांना ‘स्मार्ट टीचर’ हा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय शिक्षणविवेक व टी.बी. लुल्ला चारिटेबल  फौंडेशन तर्फे विशेष विभागातील शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. खरोखरच टिकणाऱ्या आणि वाढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येला आनंददायी शिक्षण देणारे विनोद सुरवसे हे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

[email protected]