कोणी विचारलं, बाई गं! तुला घरातील कुठली गोष्ट जास्त भावते. तर मी म्हणेन, एक म्हणजे घराला असलेलं अंगण आणि दुसरं घराला असलेली खिडकी. मुंबईसारख्या शहरात अंगण सापडून मिळणार नाही. १० बाय १०च्या घरात बेडरूम-हॉल- किचनचा अनुभव घेत असताना अंगणाची स्वप्न कशी पाहायची! पण या १० बाय १०च्या घराला खिडक्या मात्र असतात. लहान-मोठ्या, झारोक्यासारख्या आणि विविध आकाराच्या असतात त्या. आज या खिडक्यांमुळे घरांचे भावही शहरात वाढत चालले आहेत. कारण खिडकीसमोरील सौंदर्याला आज पैसे मोजावे लागतात.

ही खिडकी आहे म्हणून या शहरात मी राहते. थोडी अतिशयोक्ती असेल कदाचित, पण या खिडकीमुळे मी शहरापासून दूर असूनही त्याच्या नकळत त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच्या अंतरंगात सतत डोकावत राहते. माझ्या रिकामटेकडेपणाचा तो एक उद्योग म्हणा हवं तर! खरंच सांगते, माणसाच्या जगण्याचा 'खिडकी' एक भाग आहे. 'खिडकी' मनामनात डोकावणारी, दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेणारी अशीच असते. मी रोज सकाळी किती वाजताही उठले तरी, पहिली नजर जाते ती खिडकीच्या बाहेर. अंथरूण उचलण्याआधी खिडकीच्या बाहेर डोकवायचे. थोडे थांबायचे, खाली नजर टाकून समोरच्या इमारतीमधल्या तळमजल्यावरच्या आजीने तीन दगडाची चूल पेटवली का ते पाहायचं आणि आजूबाजूला डोकावत इतरांच्या घरात पेटलेल्या लाईट्स पाहिल्या की, कामाला सुरुवात करायची, पण राहून राहून खिडकीकडे सतत जाणारी नजर मला कधी टाळता आली नाही. आपण सगळ्यांना पाहायचं, पण आपल्याला कोणी पाहता कामा नये असं, आजही वाटणं, थोडं विचित्रच आहे. गुलजार यांच्या 'किताब' चित्रपटातील बाबला या लहान मुलाचा असाच डायलॉग पुन्हा-पुन्हा या निमित्ताने मला आठवत राहतो.   

या निमित्ताने लहान मुलांची प्रवासात खिडकीसाठीची चाललेली धडपडही मला आठवते आहे. खिडकीत बसून पळणारी झाडी पाहत. येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर काहीबाही विकत घेण्याचा चाललेला हट्ट सगळं नजरेसमोर तरळून गेलं. नाही मिळाली खिडकी तर मुलांच्या रागाने भरलेल्या नजरा पालकांना सहन कराव्या लागतात. मांडीवर घ्यावं त्यांच्याशी गमतीजमती कराव्या पण नाही, त्यांचे चिमटे घेणं सुरूच असतं किंवा दोघे जण असतील त्यांची त्या एका खिडकीसाठी चाललेली भांडण पालकांना सोडवावी लागतात. गप्पाच्या ओघात ट्रेनमधील प्रवाशांशी ओळख झाली की, मग मिळते खिडकी आपल्याला. पण लहान जिवाला याची काही कल्पना नसते. हे तसं प्रत्येक प्रवासात होत असतं. नव्याने फक्त आपण अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण प्रवासी बदलत जातात. मात्र एक खिडकी तीच असते. त्याच आकाराची त्याच जागेत. ती नाही दुजाभाव करत. कोणीही तिच्याजवळ बसा, ती प्रत्येकाला आपल्या अंतरंगात डोकावू देते.

मला आठवलं औरंगाबादला मामांची बदली झाली असताना मामांनी मला व माझ्या छोट्या भावाला सुट्टीत त्यांच्याकडे त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. जाताना मनमाडला गाडी बदलून आम्ही औरंगाबादला निघालो होतो. मी तत्परतेने खिडकी पकडून बसली होते आणि अचानक मला खिडकीतून 'ताजमहाल' दिसला. मी मोठ्याने ओरडायला लागले मामा आग्र्याचा 'ताजमहाल' मला दिसतोय. मी मामाला आणि कुंदनला म्हणजे छोट्या भावाला दाखवायला लागले. एव्हाना ट्रेनमधील सगळेच हसायला लागले होते. मला काहीच कळले नाही. मामा तेवढ्यात म्हणाले, "अग, तो ‘बिबी का मकबरा’ आहे. ताजमहाल नाही. औरंगजेबाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला." मला तेव्हा खूप अप्रूप वाटलं होतं. त्यानंतर कित्येक वेळा औरंगाबादला जाणं झालं, पण तो क्षण काही विसरता आला नाही. सुट्टीत आईच्या आजोळी निफाडला गेल्यावर परतीची वेळ काही ठरलेली नसायची, त्यामुळे ट्रेनचं रिझर्वेशनही केलेलं नसायचं. जी गाडी मिळेल ती पकडावी लागायची. मामा आम्हाला लहान असल्यामुळे गाडी आली की, खिडकीतून जागा पकडायला आत सोडायचे आणि आम्ही धडपडत जागा शोधत बसायचो. एकीकडे भीती दुसरीकडे थ्रील अशी चलबिचल अवस्था तेव्हा असायची.

अशी खिडकी मला नेहमीच सोबत करत आली. तिच्याजवळ बसलं की, सोबतीला कोणी असलं तरी आणि नसलं तरी काही फरक पडत नाही. घरातील खिडकीचीही तीच तर खासियत आहे. पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक घेऊन आपल्याला उठवणारी, संध्याकाळी सोनेरी किरणांनी भरून राहिलेली. स्वप्न वेड्या नजरेने आतुर होऊन वाट पाहणारी! कधी गर्दीतही आपलीच सोबत करणारी अशी एकमेव 'खिडकी'. खरं ना! ...

घराचं अंगण आणि घराची खिडकी याचं पक्षांच्या विश्वात असणारं स्थान दाखवणारा लेख नक्की वाचा 

चिवचिव चिमणी...

- शारदा गांगुर्डे 

- [email protected]