योगनिद्रा : प्रभावी योग प्रकार  

योगशास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी व शक्तिशाली अशा अनेक योगप्रक्रिया आपल्या बुद्धिमान व दूरदर्शी पूर्वजांनी (ऋषीमुनींनी) आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत . त्यातील योगनिद्रा ही अशीच एक उत्तम क्रिया आहे. नियमितपणे तिचा अभ्यास केल्याने शरीर, मन, बुद्धी, भावना यांवर उत्तम परिणाम अनेक वर्षांच्या संशोधनातून अनुभवता आलेले आहेत.

विद्यार्थ्यांनाही या योगनिद्रेचे अनेक उपयोग होऊ शकतात : 

- आकलनशक्ती वाढते. 

- ग्रहणशक्ती आणि असलेल्या ज्ञानाचा योग्यवेळी उपयोग करण्याची क्षमता वाढते. 

- नैसर्गिक प्रवृत्ती जोपासली जाते. 

- लहान वयात पिनियल ग्रंथी कार्यक्षम असल्यामुळे अतिशय सहजगत्या सुंदर दृश्ये निर्माण करण्याची क्षमता असते व त्यांच्या दृष्टीने ती दृश्ये पूर्ण खरी असतात. ही निर्माणशक्ती (सृजनशीलता) कायम राहते/वाढते. 

- बल्गेरियामध्ये डॉक्टर गॉर्गी लोझोनॉव्ह यांनी या पद्धतीचा उपयोग करून परदेशी भाषा पाचपट वेगाने शिकता येतात हे दाखवून दिले आहे.

- ‘बिहार स्कूल ऑफ योग’ या भारतातील अतिशय प्राचीन व विश्वविख्यात योगसंस्थेचे संस्थापक ‘स्वामी सत्यानंद सरस्वती’ यांनी २५ वर्षांहून अधिक काळ योगनिद्रेवर सखोल संशोधन केले आहे.

- योगानिद्रेच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेली एक घटना आहे. एखाद्या व्यक्तीला काही कारणाने आपला एखादा अवयव अनपेक्षितपणे गमवावा लागतो. अशा वेळी हा धक्का त्या व्यक्तीच्या सहनशक्तीच्या पलीकडे असतो. त्यातून एक प्रकारची मनोशारीरिक व्याधी निर्माण होते. एका माणसाला एका जीवघेण्या अपघातात आपला संपूर्ण पाय गमवावा लागला; पण आपला एक पाय कापला आहे हे वास्तव त्याच्या मनाला सहन न झाल्याने त्याला त्या कापलेल्या पायात असह्य वेदना होऊ लागल्या. वैद्यकीय परिभाषेत या व्याधीला फॅँटम पेन असे म्हणतात. एरवी आपल्याला शरीरात वेदना होत असतील तर डॉक्टर आपल्याला वेदनाशामक औषध देतात व तो भाग दुखण्याचे थांबते. पण या घटनेत जो पाय कापलेला होता, जो अस्तित्वातच नव्हता तो पाय दुखत होता. या विचित्र व अवघड समस्येवर अनेक डॉक्टर्स व मानसउपचारतज्ज्ञांनी अनेक उपाय केले; पण वेदना थांबेनात. शेवटी योगावर श्रद्धा असणारे एक डॉक्टर त्या रुग्णाला घेऊन स्वामी सत्यानंदांकडे आले. स्वामीजींनी त्या रुग्णाला दररोज दिवसातून तीनदा योगनिद्रा देण्यास सुरुवात केली. योगानिद्रेमध्ये आपली जाणीव हळुवारपणे सुप्त मनापर्यंत पोहोचते. अपघातामुळे सुप्त मनात निर्माण झालेला, गुंता त्यामुळे सोडवता आला. आपला पाय कापला आहे व तो अस्तित्त्वात नाही हे वास्तव त्याच्या सुप्त मनातून जागृत मनात नीट उतरले व उमजले. आठ दिवसांनी त्याच्या वेदना हळूहळू कमी होत एक महिन्यांनी पूर्ण थांबल्या. आधुनिक वैद्यकशास्त्र (अॅलोपथी व सायकीअॅट्री) हे मानवजातीला वरदान आहेच. पण त्यासोबतीनेच जर योगशास्त्राचा आधार आपण सगळ्यांनीच घेतला तर त्याचाही नक्कीच फायदा होऊ शकतो. 

एका लहान मुलाला त्याच्या आई-वडिलांनी या संस्थेत आणले. अगदी व्याकूळ होऊन ते सत्यानंदाना म्हणाले, “स्वामीजी, हा मुलगा अतिशय हुशार पण तितकाच वांड आहे. त्याच्या हुडपणाला आवर घालणे आमच्या आवाक्याबाहेरच आहे. तुम्हीच याच्याबाबतीत काहीतरी करू शकाल." योगनिद्रेचे गाढे अभ्यासक असणाऱ्या स्वामी सत्यानंद यांनी त्या मुलाला एक वर्षभर रात्री झोपेत योगनिद्रेच्या तंत्राचा वापर करून गीता, वेद, उपनिषदे इत्यादींचे ज्ञान दिले. हा मुलगा म्हणजेच या संस्थेचे सध्याचे प्रमुख असलेले स्वामी निरंजनानंद सरस्वती! अनेक भाषा आत्मसात करून जगभर ते यशस्वीपणे योगप्रसार करत आहेत.

लहान मुलांना योगशिक्षण द्यावे की नाही?, कोणत्या वयापासून द्यावे?, त्याचे काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना? अशा अनेक शंकावर फक्त चर्चा होते. पण ही लेखमाला वाचल्यावर लहान मुलांना योगशिक्षण देण्याविषयी दुमत राहणार नाही.

अशी ही बहुमोली बहुगुणी योगनिद्रा (powernap) लहान मुलांना (वय ५ ते १० वर्षे आणि वय १० ते १५ वर्षे) कशी देता येईल, हे आपण पुढील दोन भागात पाहणार आहोत.

 

लहान मुलांना साध्या सोप्या पद्धतीने शिकवता येतो योग. कसा ते वाचा इथे.

हसत खेळत 'निसर्गयोग'

पॉपकॉर्न योग

 

मनोज पटवर्धन