सामाजिकीकरण

 कधीतरी स्वतःचं लहानपण आठवतं, तेव्हा बरेचदा आठवतात ती मैत्रिणींची लुटूपुटुची भांडण. 'कट्टी बट्टी बाल बट्टी बारा महिने बोलू नको लिंबाचा पाला तोडू नको' - असं अगदी तावातावाने एकमेकांना म्हणणाऱ्या आम्ही मैत्रिणी पुढच्या काही मिनिटातच पुन्हा एकत्र येऊन खेळायलाही सुरुवात करायचो. आता हे सगळं आठवताना गंमत वाटते आणि मग उमगत जातं की, आपण इतर माणसांशिवाय राहू शकत नाही. माणूस हा समजशील प्राणी आहे हे म्हटलंय ते उगीच का?

      आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा वाटा आहे, तो सामजिक विकासाचा. आईला पाहुन केलेलं पहिलं हास्य हे त्या तान्हुल्याच पहिलं सामजिक हास्य असतं. जन्माला आलेल्या बाळाचा पहिला समाज म्हणजे त्याचं कुटुंब. कुटुंब या समाजाकडून स्वीकारलं जाणं हा पुढील वाटचालीतील खूप आवश्यक टप्पा आहे.

            कुटुंबाच्या बरोबरीनेच ओळख होते, ती शेजारच्या व्यक्तींशी. शेजारील ताई, दादा, मावशी, काकू घरी येतात आणि बाळाला आपल्या घरी घेऊन जातात, तिथेही त्याच्याशी मायेने वागलं जातं, काही शेजार तर मुलांचं दुसरं घरच होतं.

              त्या नंतरचा पुढचा समाज असतो तो शाळा. शाळेत जाताना खऱ्या अर्थानं मुलं आईपासून थोड्यावेळासाठी का होईना लांब जाणार असतं. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण्याची मोठेपणीची बेगमी या लहान गटापासून सुरू होते. सुरुवातीला बरीचशी मुलं शाळेत गेल्यावर पहिल्या काही दिवसात रडतात. पण जशी सवय होईल आणि जसं त्यांना सुरक्षित वाटेल तसं त्याचं रडण कमी होतं. 

           ५ वर्षाच्या नेहाच्या घरी ती आणि तिचे आई-बाबा. मुळचं मुंबईचं हे कुटुंब वडिलांच्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालं. पण मुळातच कोणाच्यात फारसं न मिसळणं, यामुळे इथल्या वातावरणाशी त्यांना जुळवून घेण्यात अडचणी आल्या. अशा कौटुंबिक वातावरणातील नेहा जेव्हा शाळेत गेली तेव्हा ती देखील कोणाशी जुळवून घेईना. परिणामी वर्गातल्या मुलांबरोबर तिची वरचेवर भांडण होऊ लागली. या उलट अथर्वच उदाहरण बघू या. लहानपणापसून घरचे, शेजारी, नातेवाईक यांच्याबरोबर राहिलेला अथर्व शाळेत पटकन रमला. मित्र-मैत्रिणींबरोबर खेळणं, रुसवे, फुगवे, पुन्हा बट्टी घेणं आणि परत एकत्र खेळणं अशा सर्व अनुभवातून तो सामाजिकदृष्ट्या अधिक परिपक्व होईल यात शंका नाही .

समाजात वावरताना जबाबदारीने वागणं हा घटकही सामजिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. आरोही बागेत खेळताना आपली वेळ येईपर्यंत रांगेत उभी राहते, राधेय वर्गात बाईंना नेहमी मदत करतो, अनिश वेफर्सच पाकीट कधीही रत्यावर टाकून देत नाही, ही काही जबाबदार सामाजिक विकासाची उदाहरणं. 

आपल्या मुलांमधील सामाजिक विकास चांगल्या प्रकारे वाढीला लागण्यासाठी आपण पालक त्यांना नक्की मदत करू शकतो .

० ते दीड वर्ष : मुलांशी भरपूर गप्पा मारा. शेजार, नातेवाईक, समारंभ या ठिकाणी आवर्जून घेऊन जा.

दीड ते चार वर्ष : शाळेत जाण्यासाठीची त्यांची मानसिक पूर्वतयारी करून घ्या. बागेत घेऊन गेलात तरी त्यांचं त्यांना खेळू द्या. आपल्या वस्तू दुसऱ्यांशी वाटून घ्यायला शिकवा.

चार ते आठ वर्ष : लहान मुलांच्या भांडणात पडू नका, ते भांडण त्यांचं त्यांना सोडवायला प्रोत्साहित करा. घरी एकटं खेळण्याऐवजी गटात खेळण्यास प्रेरित करा. ग्राउंड, संस्कार वर्ग, मैदानी खेळ यापैकी एखाद्या ठिकाणी त्याला पाठवा .

या व अशासारख्या काही प्रयत्नातून आपण मुलांचा सामाजिक विकास घडवून आणू शकतो. शेवटी समाजाशी गट्टी करता येणं ही आजच्या काळाची गरज आहे. आपले आजचे लहान मूल उद्याचा जबाबदार नागरिक होणार आहे यासाठी आपण सगळे मिळून मनपासून प्रयत्न करू या.

 

घडण पालकत्वाची या सदरातील आणखीन एक लेख 

घडण पालकत्वाची: शारीरिक विकास

 - रश्मी पटवर्धन 

[email protected]

( लेखिका समुपदेशक आहेत.) 

 

-