पुस्तकांची जादू 


सगळ्याच मुलांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते. ती ऊर्जा कशी सत्कारणी कशी लावायची हे मात्र डोळसपणे पाहिलं पाहिजे. त्यांच्यातली ऊर्जा नेमकेपणाने कळली की तिला वळण लावणंही तितकंच सोपं होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या घडण्यावर आजूबाजूच्या परिस्थितीचा एक परिणाम दिसतो. पण तरीही त्यांना एका चाकोरीबद्ध शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकण जास्त आवडतं. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी नवीन शिकायची किंवा वेगळं काही करण्याची धडपड असतेच असते. पण योग्य ती दिशा त्यांना दाखवणं हेही तितकचं महत्त्वाचं असतं.
जेव्हापासून मी मुलांबरोबर काम करायला लागले. तेव्हापासून मी एका गोष्टीच निरीक्षण केलं, की मुलांना आपल्या मातृभाषेतून शिकायला, बोलायला किंवा लिहायला खूप आवडतं. मातृभाषेतून ती मुक्तपणे व्यक्त होतात. खरं तरं एखादी भाषा शिकवताना त्या भाषेची रचना, त्यातील गमंतीजमंती,  कल्पना, विविध रस या गोष्टी वेगवेगळ्या उदाहरणांमार्फत स्पष्ट करून त्यांच्यासमोर मांडल्या तरच त्या त्यांच्या चांगल्या पचनी पडू शकतात. याचा अनुभव मी शिकवताना घेतंच होते. पण माझ्या या अनुभवाला अजून एक घटना कारणीभूत ठरली. ती घटना अशी - 
जेव्हा माझ्या वाचनात ‘तोत्तोचान’ हे पुस्तक आले, अगदी त्या क्षणापासून मी मनाशी पक्क केलं होतं, की आपणही आपल्या परीने आपल्या पुरती का होईना ‘तोमाई’ निर्माण करायची. हा विचार मनाशी पक्का करूनच मी शाळेत वाचन उपक्रम चालू राहावा, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी इ ३री. व ४थीच्या वर्गात वारानुसार ‘तोत्तोचान’ या पुस्तकाचे वाचन करायला सुरुवात केली. पुस्तक वाचनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मुलांना ‘तोत्तोचान’ आवडू लागली, त्यांना ती आपली मैत्रीणच वाटू लागली व त्यांना तिला भेटायची खरोखरंच उत्सुकता निर्माण झाली. पुस्तक वाचनाचा वार येण्याआधीच एक दिवस मुलंच मला आठवण करून देऊ लागली की, "बाई, उद्या ‘तोत्तोचान’ नक्की येणार आहे ना भेटायला आम्हाला?" अर्थात त्यांचा हा प्रश्न माझ्या मनात एक आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करत होता. त्यांना थोडी का होईना वाचनाची गोडी लागत होती. अगदी थोडी का होईना माझीही इच्छा पूर्ण होत होती. 
या घटनेनंतर मला वाटू लागलं की, योग्य त्या पुस्तकांची निवड करून त्यांच्यापर्यंत ती पोहचवली तर नक्कीच त्यांच्यात वाचनाची किंवा चांगल्या गोष्टी ऐकायची आवड निर्माण होते. पुस्तक वाचनाच्या उपक्रमानंतर मी आणि मुलांनी मिळून इ. ४थीच्या वर्गासाठी ‘गोष्टलेखन’ हा उपक्रम घेण्याचं ठरवलं. हा उपक्रम वर्गाबाहेरील मोकळ्या जागेत बसवून गट करून घेतला. प्रत्येक गटाला चित्रांचा संच दिला व गोष्ट तयार करायला २५ मिनिटे असा वेळ दिला. त्यांना असंही सांगितलं की, तुमच्या समन्वयालाही गुण आहेत. सुरुवात, मध्य, शेवट असा त्यांना वाटून दिला. त्यानंतर जेव्हा गोष्ट लेखनाला सुरुवात झाली, तेव्हा ते चित्र विलक्षण पाहण्यासारखे होते. यावरून मला एकच जाणवले की, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र दिलं, तर त्यामधून सुंदर गोष्टी घडू शकतात.
आपण थोडा मुलांवर विश्वास दाखवला आणि योग्य तो मार्ग निवडला त्यांना दाखवला की, ती स्वतःच छान आकार घेऊ लागतात व त्यांच्यात आपोआप अभ्यासाची गोडी निर्माण होतेच. अर्थात, तोत्तोचानसारख्या शाळेचा अनुभव सर्वानाच अनुभवता नाही आला तरी मी माझ्यामार्फत शक्य तेवढी ‘तोमाई’ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गंमत उपक्रमांची नक्की वाचा 

गंमत विशेषणांची

- प्रतिमा पाठक 

-[email protected]

(लेखिका  प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. )