शोध वक्त्यांचा! 

दिंनाक: 20 Apr 2017 12:26:48
 
वक्तृत्व : एक कला 
'एखाद्याचं बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटतं तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारं, आविष्कृत होणारं आणि प्रकट होणारं ते वक्तृत्व' अशी व्याख्या प्रा. शिवाजीराव भोसले यांनी केली आहे. खरं तर लिपीचा शोध लागण्यापूर्वी बोलणं हेच साहित्याचं प्रथम रूप होतं. महाभारतातल्या अंतिम युद्धात हतबल झालेल्या अर्जुनाला प्रोत्साहित करण्यासाठी श्रीकृष्णानं सगळी शस्त्र बाजूला ठेवून वक्तृत्वाचं शस्त्र हाती घेऊन गीतेचा बोध केला होता. यातूनच आपल्याला वक्तृत्वाचं महत्त्व लक्षात येईल. आपणही प्रत्येकजण भरपूर बोलतो, विविध विषयांवर मत मांडतो, सर्वांसमोर बोलण्याची संधी सहसा सोडत नाही. मग आपली मुलं तरी याला कशी अपवाद असतील? विद्यार्थी म्हणून आपल्या पाल्यांना चांगल्या पद्धतीनं आपले विचार मांडता आले पाहिजेत. त्यांच्यात काही प्रमाणात तरी ही गुणवत्ता विकसित केलीच पाहिजे; कारण ती काळाची गरज आहे. कदाचित स्टेज फिअरमुळे असेल किंवा मोठ्या जनसमुदायासमोर उभं राहून बोलण्याची भीती असेल, अनेक मुलं शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला घाबरतात. यासाठी पालक आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. 
 
 शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी तेच तेच विद्यार्थी स्पर्धक म्हणून पाठवले जातात अथवा निवडले जातात, हा माझ्या मुलीच्या शाळेवरून आलेला गेल्या काही वर्षांमधला अनुभव आहे. कमीअधिक प्रमाणात कदाचित तो तुमचाही अनुभव असू शकतो. वक्तृत्व गुण असलेले एक दोन विद्यार्थी निवडले की, कदाचित त्यांच्यावर फार मेहनत घ्यावी लागत नाही. वस्तुतः लहान वयात आपले अनुभव इतरांना सांगताना मुलं किती तल्लीन होऊन, हातवारे करून बोलत असतात. अशा मुलांना वक्तृत्व येत नाही किंवा जमत नाही असा गैरसमज कसा काय करून घेतला जातो, हे कोडं मला आजपर्यंत उलगडलेलं नाही. 
 
आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं आवश्यक त्या उन्हाळी  शिबिरांमध्ये बच्चेकंपनी जायला लागली असेल. या शिबिराच्याच जोडीला फक्त अर्धा तास पालकांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांच्याकडून वक्तृत्व वाढवण्यासाठी पुढील गोष्टी करून घेतल्या तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील हा विश्वास मला एक पालक आणि शिक्षक म्हणून वाटतो. अगदी सुरुवातीला ज्यावर आपल्या मुलांना बोलायला आवडेल अशा कोणत्याही विषयावर कोणत्याही भाषेत एका मिनिटात बोलायला प्रोत्साहन द्यायचं आहे. या वेळी कदाचित मुलं घाबरतील, पूर्ण वेळ बोलू शकणार नाहीत, काही वेळा काय बोलावं हेच सुचणार नाही किंवा बोलताना अडखळतील. पण अशा वेळी त्यांना न हसता, टिंगल न करता त्यांना चिअर अप करून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हा प्रयत्न पालकांनी करायचा आहे. जर शक्य झालंच तर आपल्या पाल्याच्या मित्र-मैत्रिणींनाही या उपक्रमात सहभागी करून घेता येईल. 
 
या उपक्रमाचे अनेक फायदे होतात. ज्यांना सर्वांसमोर उभं राहून बोलायचं धाडस नसतं, त्यांना ते मिळवता येतं. ज्यांच्यात असं धाडस असतं त्यांना ते विकसित करता येतं. जर गटामध्ये हा उपक्रम राबवला गेला तर त्यात सहभागी जितकी मुलं असतील, त्या प्रत्येकाचे विचार यातून इतरांना कळतील. भाषण करण्याच्या, संवाद साधण्याच्या, संभाषणाच्या विविध पद्धती बघायला मिळतील. कसं बोलायचं याच्याच जोडीला कसं बोलू नये, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचं भान मुलांना येईल. थोड्या मोठ्या म्हणजे आठवी ते दहावीच्या मुलांसाठी वृत्तपत्र वाचनाची स्पर्धा आयोजित करता येईल. यातून शब्दांचे नेमके अर्थ तर कळतीलच पण त्याच्याबरोबर समाजात काय सुरू आहे, याचं किमान भानही त्यांना येईल. 
 
याशिवाय मोठ्या वयोगटातल्या मुलांसाठी ऐनवेळी विषय देऊन त्यावर त्यांचे विचार मांडण्याची स्पर्धाही घेण्यात येईल. या स्पर्धेत मुलांचं सामान्य ज्ञान, विचार करण्याची क्षमता, भाषेची जाण, अभ्यास, वाचन अशा असंख्य गोष्टी पालकांना समजून येतील. कदाचित दिलेल्या विषयावर सहभागी प्रत्येकजण बोलेलच असं नाही. अशा वेळी नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्याला आपलं मत मांंडता आलं नाही, यावरच त्याला बोलायची संधी दिली तरी त्यातून तो आत्मपरीक्षण करायला सुरुवात करू शकेल. पालक म्हणून जेव्हा आपण या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ तेव्हा आपल्या मुलांनाही यात गोडी वाटेल. 'तू कर'  यापेक्षा 'आपण करू'  हे शब्द काय जादू करतील हे बघायला आणि या गोष्टी मुलांना समजावून सांगायला आधी आपलं वक्तृत्व पणाला लागणार आहे याची मात्र जाणीव पालकांना असायला हवी. 
पालक म्हणून आपण किती सजग असले पाहिजे हे सांगणारा लेख 
 
 
- आराधना जोशी